दिलासा, आरक्षित तिकीट धारक प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार

बुधवार, 16 डिसेंबर 2020 (17:22 IST)
मुंबईत रेल्वेने प्रवेश करणाऱ्या सामान्य प्रवाशांना आता लोकलमधूनही प्रवास करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मुंबईतील लोकलच्या प्रवासातील अडचणी दूर झाल्या आहेत. यासंबंधीचे पत्र राज्य शासनाला प्राप्त झाले असून राज्य शासनाने, सामान्य प्रवाशांना पुढील स्थानकापर्यंत जाण्यासाठी मुंबई लोकलमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. या मागणीला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. यामुळे आरक्षित तिकीट धारक प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमध्ये सामान्य प्रवाशांना प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे बाहेरून मुंबईत रेल्वेने आरक्षित तिकीटाने येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या पुढील स्थानकापर्यंत जाण्यात अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने रेल्वे मंत्रालयाला यासंदर्भात तोडगा काढावा आणि अशा प्रवाशांना मुंबई लोकलने प्रवाश करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणारे पत्र लिहिले होते. त्याप्रमाणे राज्य शासनाची विनंती मान्य झाली असून आरक्षित तिकीटाने मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आता लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती