एका श्रीमंत माणसाजवळ एक पोपट होता. त्या पोपटास त्याने एका मोठय़ा व सुंदर पिंजर्यात ठेवले होते. तो त्याला चांगली फळे खायला घालीत असे. त्या पोपटाला तेथे सर्व सुखे अनुकूल होती, तरी ही तो मनात नेहमी झुरत असे. 'माझे जातभाई जसे मोकळेपणे या जंगलातून त्या जंगलात जातात अन् या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात. तसे मला करायला मिळाले तर किती बरे होईल.'
एके दिवशी चुकून पिंर्जयाचे दार उघडे राहिल्याने त्या पोपटाची इच्छा पूर्ण झाली. या पिंजर्यातून पोपट घाईने बाहेर पडून लांबच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने त्याला भूक लागली. तेव्हा इकडे तिकडे पाहू लागला. चमचमाट, ढगांचा आवाज होऊन पाऊस पडायला लागला. त्या बिचार्या पोपटाचे फारच हाल झाले. अशा गोष्टीची त्याला कधीच सवय नव्हती. शेवटी पावसात भिजून व थंडीने काकडून त्याचे तेथेच प्राण गेले. मरता मरता तो म्हणाला. 'मला जर पुन्हा त्या पिंजर्यात जाता आले, तर त्यातून बाहेर पडण्याची मी पुन्हा इच्छा कधीही करणार नाही.'