धर्मयात्रेत यावेळी आम्ही आपल्याला सूर्यपुत्र शनी देवाचा निवास असलेल्या शनी शिंगणापूर येथे घेऊन जाणार आहोत. शनी म्हटलं की त्याचा कोप आठवतो. शनी महाराज प्रसन्न असले तर ठीक. पण एकदा का चिडले की 'साडेसाती' ठरलेली. तर अशा या शनीचा महिमा जाणून घेण्यासाठी आम्ही शनी शिंगणापूरला कुच केले.
WD
WD
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभ म्हणजे शनिदेवाची मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.
WD
येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. कोणीही चोर गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनिदेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.
WD
येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तिळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.
कसे पोहचाल? हवाई मार्ग : शनी शिंगणापूरपासून सर्वांत जवळचे विमानतळ असलेले शहर पुणे येथून 160 किमी अंतरावर आहे. रेल्वेमार्ग : येथील सर्वांत जवळील रेल्वे स्टेशन श्रीरामपूर आहे. रस्ता मार्ग : नाशिकहून या ठिकाणासाठी बस, टॅक्सी या सुविधा आहेत. मुंबई, पुणे, अहमदाबाद येथूनही या सुविधा आहेत. शिर्डीला गेल्यानंतर शनी शिंगणापूरला जाणे उत्तम.