नववर्षात ८७ लग्न मुहूर्त

WD
या वर्षी शास्त्रीय पंचांगानुसार तसेच विविध महाराज, बुवांच्या (भटजी) अंदाजावरून लग्न कार्यासाठी तब्बल ८७ मुहूर्त असल्याने वधूवर पित्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय या वर्षी वरुणराजाने बर्‍यापैकी कृपा केल्याने खरीप हंगाम काही प्रमाणात कमी झाला असला तरी रब्बीने मात्र चांगलाच जोर धरल्याने पिके जोमात आहेत. त्यामुळे लग्न कार्याची चांगलीच लगबग सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी मुलगी किंवा मुलगा पसंत करण्यासाठी थेट त्यांच्या घरी जावे लागत होते,मात्र आता विज्ञान युगातही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत नवीन युक्ती काहींनी शोधून काढली आहे. बाहेरगावी नोकरीनिमित्त असलेल्या मुलांना किंवा मुलींना व्हिडीओ कॉलिंगद्वारे ही सुविधा प्राप्त झाली आहे. त्यामुळे थ्री-जी सेवेचा असाही लाभ घेताना नागरिक दिसून येत आहेत. यात व्हॉट्सअँपचाही लाभ मोठय़ा प्रमाणात घेतला जात आहे. लग्न म्हणजेच दोन वेगवेगळ्या जीवांचे मीलन, असा त्याचा ढोबळ अर्थ असला तरी लग्न जुळवताना मात्र तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे अनेक अडचणी येतात. मुलगी किंवा मुलगा पसंत पडल्यामुळे घरदार, जमीन-जुमला, नाती-गोती, मानपान, देवाण-घेवाण यानंतरही पत्रिका जुळवण्याचा खटाटोप असतो. या सर्व घडामोडींमध्येच बरेच दिवस निघून जातात.

आता मात्र स्पर्धांच्या व विज्ञान युगात 'चट मंगनी पट ब्याह'च्या पद्धतीकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळे मुलगा व मुलीची पसंती होताच सगळ्या बाबी झटपट जुळवल्या जातात. नोकरी-व्यवसाय किंवा आणखी काही कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या उपवर मुलामुलीस घरी बोलवणे आणि नंतर दाखवण्याचा कार्यक्रम करावा लागत होता. आता मात्र मोबाईलने यात भर घालत सोपा मार्ग निवडला आहे. आता व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून मोबाईलवर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पाहुन पसंती दशवत आहे. शिवाय नातेवाईकांना देखील व्हॉट्सअँपद्वारे क्षणार्धात मुलीचा किंवा मुलाचा फोटो अपलोड करून अवघ्या काही मिनिटांमध्येच सर्वांकडून होकार मिळण्याचीही नवी पद्धत सध्या सर्वप्रिय व जोमात आहे. थ्री-जी सेवेचा असा सकारात्मक उपयोग विवाह संबंधांसाठी दीर्घकाळ चालणारे गुर्‍हाळ संपुष्टात आणून अवघ्या काही मिनिटांमध्येच निर्णय घेण्यासाठी होत आहे. विशेष करून भारतीय सेना, सी.एस.एफ., पोलीस, बीएसएफ, सैनिक तसेच परजिल्ह्यात कार्यरत असलेले जि.प. शिक्षक व इतर कर्मचार्‍यांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची व लाभदायक ठरत आहे. पाहिजे तेव्हा सुट्टी मिळणे कठीण असल्याने यापूर्वी मुलगी पाहण्यासाठी ठरावीकची सुट्टी घ्यावी लागत असे. त्यातही मनासारखी मुलगी नाही मिळाली नाही तर ती सुट्टी नाहक व्यर्थ गेली असा मन:स्ताप कर्मचार्‍यांना तसेच जवानांना करावा लागत होता. मात्र, आता व्हिडीओ कॉलिंग आणि व्हॉट्सअँपने त्यांची ही अडचण दूर केली आहे. थेट मोबाईलद्वारे मुलगी पाहण्याची आणि एकमेकांना पसंती देण्याची सुविधा आता निर्माण झाली आहे. मोबाईलचे दुरुपयोग असले तरी विवाहयोग जुळवण्यास अनेकांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी मात्र हा मोबाईल लाभदायक ठरत असल्याचे चित्र आहे.

वेबदुनिया वर वाचा