जय हो कोविड मैय्या की!

सोमवार, 1 जून 2020 (15:01 IST)
8 तारखे पासून गंमतच येणार आहे भाऊ. लोक मॉल मध्ये जाणार. जाणते अजाणतेपणी खोकणार. मग रॅकमधल्या वस्तू हाताळून बघणार. मग मागून येणारे लोकसुद्धा त्याच वस्तूंना हात लावणार. मग त्यांच्या आसपास सॅनिटायझर नसणार. आसपास बेसिन देखील नसणार. मग बिल करून बाहेर पडेपर्यंत कमीत कमी 5-6 वेळा आपल्या चेहऱ्याला हात लावणार. कधीतरी आपल्या "बाबा मला हेच पाहिजे" असं कार्ट मध्ये बसून बोंबलणाऱ्या आपल्या कारट्याला त्याच हातांनी गालावर सटकन ठेऊन देणार. पोरगं गाल चोळीत डोळे चोळीत रडणार. मग ते इवलेसे हात कार्टच्या दांड्याला लागणार. त्या कुटुंबाचा कोरोना प्रसाद घेऊन झाला की तीच कार्ट कुणीतरी दुसरं घेणार. पुन्हा सर्कल चालू.
 
मग काही लोक आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या सिनेमाला गर्दी करणार. 500 ठिकाणच्या पैशांना हात लावून तिकीट काउंटर वाल्याची अलरेडी वाट लागली असणार. मग तो इतरांनाही ती वाट मोकळी करून देणार.सिनेमा हॉल मध्ये गेल्यावर आमच्या खुर्च्यांना हात ठेवण्यासाठी कॉमन दांडे आहेत. दांडे पुसून नाक पुसण्यात अडीच तास कसे निघुन जातील ते कळणार देखील नाही.
 
इतक्या महिन्यांचा कडकडीत उपास घडलाय की च्यायला आता हाटेलात गेलंच पाहिजे. आत 10-15 वेगवेगळे कूक 10-15 वेटर्स आणि 100 कस्टमर्स एकमेकांशी  कोरोनाचा गोविंद घ्या गोपाळ घ्या करणारच. कूकने बनवलेल्या स्वादिष्ट जेवणाचा बोटं चाटून आस्वाद जो घ्यायचा आहे. जेवण झाल्यावर आपले चाटून पुसून झालेले भांडे वेटर घेऊन जाणार. मग पगारी भांडवली भांडे धुवुन तिचं काम उरकणार. की झाले ते भांडे दुसऱ्यांच्या सेवेत जाण्यासाठी तय्यार!
 
आणि अशाप्रकारे दिवसभर मोक्कार देवाण-घेवाण करून आम्ही सगळे आपापल्या घरी जाणार. आणि 4 दिवसांत पेपर मध्ये वाचणार "शहरात रुग्णांची विक्रमी वाढ." आणि मग आम्ही सरकारला शिव्या द्यायला मोकळे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती