"कम्फर्ट झोन"

सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (12:51 IST)
"अरे, किती पसारा आहे हा ? जरा खोल्या आवरा." माझा आवाज टिपेला पोचलेला असतो. आज घरात पाहुणे येणार असल्याने, घर जरा आवरलेलं असावं अशी माफक अपेक्षा.
    मुलांनी नाकं मुरडत, लॅपटॉपला घडी घालत, हेडफोन्सच्या वायरी गुंडाळत कामाला सुरुवात केली. "कोण कोण येणार आहे ?" मुलांचा नेहमीचा प्रश्न.
    "कोण येणार आहेत ते महत्वाचं नाही. घर आवरा . ते महत्वाचं आहे." माझं उत्तर.
     "अरे पण ते कुठे आमच्या खोल्या बघणार आहेत ?"  इति मुलगा.
    "हो ना, आणि अभ्यासाच्या टेबलावर पुस्तकं असली की कसं जरा स्कॉलर असल्याचं फिलिंग येतं. ठेऊ का थोडी ?" शेंडेफळाची युक्ती, पसारा न आवरण्याची. 
    "ते काही नाही. त्या निमित्ताने जरा पसारा हलेल. धुळ झटकली जाईल." माझ्या फतव्याने सगळ्यांना कामाला लागावं लागलं. 
     दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी घराचा कायापालट झाला. बिछान्यावरती झुळझुळीत चादरी पसरल्या. दिवाणखान्यात गालिचा अंथरला. मंद वासाच्या फुलांनी फुलदाण्या सजल्या. पांढऱ्या शुभ्र कट वर्कच्या टेबलक्लाथने टेबल झाकलं. किणकिण आवाज करत काचेच्या डिनर सेटने डायनिंग टेबलावर जम बसवला. रोजच्या भाजीपोळीला आज आराम होता. मानाच्या पुरी,पुलाव, श्रीखंडाला खास प्राधान्य मिळालं.
     "आपलं घर आपलं वाटतंच नाहीये." शेंडेफळ चिवचिवलं. "कसलं भारी दिसतंय. अगदी चित्रातल्या घरासारखं." मला तिच्या डोळ्यातले भाव खूपच आवडले.
   "हो नं, मग रोज आवरलत तर असंच दिसेल." मी म्हंटलं.
    "हो,पण मग रोज घर आवरावं लागेल. आपलं घर आपलं वाटायला थोडं तर पसरलेलं हवं नं."
    तिच्या वाक्यावर दादोजी म्हणाले, " खरंय, ह्या सुळसुळीत चादरीवर झोपायचं कसं ? परत कुठला डाग पडला तर ?"
     माझ्या मनात आलं, काय म्हणावं ह्या पोरांना? छान चित्रातल्या सारखं घर सजवलं तर ह्यांना कौतुक कमी आणि प्रॉब्लेम्स जास्ती.
     मित्रमंडळी आली, घराचं कौतुक झालं. मनसोक्त गप्पा, खाणं म्हणजे सगळं अगदी मनासारखं झालं. सगळा कार्यक्रम झाल्यावर मंडळी 'परत भेटूया'च्या वाद्यावर आपापल्या घरी रवाना झाली.
     "आत्ता बरं वाटलं." मुलाने त्याच्या स्टीलच्या पेल्यातून पाणी पिऊन ढेकर देत म्हंटलं. बहुतेक पाहुणे बाहेर पडतायत कधी ह्याचीच वाट बघत होता. "काचेच्या ग्लासमधून पाणी पिऊन तहानच भागत नाही."
    मी जरा रागावूनच म्हंटलं, "काहीही हं. म्हणे तहान भागत नाही."
     "अरे, असू शकतो ना एकेकाचा कम्फर्ट झोन." 
    आतल्या खोलीत डोकावले, तर धाकटी सुळसुळीत चादरीची नीट गुंडाळून घडी घालत होती. "काय गं, किती छान आहे ती चादर. कशाला काढतेस ?" मी जवळ जवळ ओरडलेच.
    "नको, मी आपली माझी जुनी म्हणजे रोजची चादर घालते. खूप मऊ आहे ती. छान वाटतं त्या चादरीवर झोपायला." 
    मिस्टरांनी जीन्सचं खोगीर उतरवून ट्रॅक पॅन्ट चढवली. "छान झाला होता हं आजचा बेत. श्रीखंड उरलंय का गं थोडं?" त्याच्या आवाजातलं कौतुक आणि आर्जव दोन्ही जाणवलं. "असेल तर देतेस का थोडं? पण साध्या स्टीलच्या वाटीत दे. आणि चमचा नको देऊस. बोटाने चाटून खातो. म्हणजे श्रीखंड चापल्याचं समाधान मिळेल." 
    मी श्रीखंड आणायला स्वयंपाकघरात गेले आणि नाजूक काचेच्या डिनर सेटकडे बघून विचार आला, ह्यांना वेळेतच धुऊन पुसून जागेवर ठेवावं.
    श्रीखंडाची वाटी नवऱ्याच्या हातात देत मी मोर्चा किचनकडे वळवला. पण नव्या ड्रेसच्या जरीकाठाच्या ओढणीने पाय मागे ओढला गेला. स्वच्छ धुतलेला सुती गाऊन अंगात चढवून त्या काचेच्या नाजुकांना मी विसळायला सुरवात केली.
     शेवटी काय, कम्फर्ट झोन मध्ये शिरल्याशिवाय मन शांत होत नाही हेच खरं. चार दिवस छान बाहेर गावची ट्रिप करून आल्यावर घरचा वरण भात खाल्ल्यावर मन तृप्त होतं, तसंच जेवायला येणाऱ्या लोकांनी साधा पिठलं भात करा म्हणलं कि खरोखर कम्फर्ट झोन मध्ये शिरल्यासारखं वाटतं. 
     जन्मभर साड्या नेसणारी आजी ट्रिपसाठी भले पंजाबी ड्रेस घालेल, पण ट्रीपहून घरी  आल्यावर परत साडी नेसल्यावर कम्फर्ट झोनमध्ये शिरल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागेलं.
   या उलट एखादी तरुणी, सणासाठी साडी नेसेल पण तासा दोन तासांनी तिने परत जीन्स डकवली, कि ती कम्फर्ट झोनमधे शिरेल.
     मित्रांच्या बाबतीत, आवरलेल्या खोलीच्या बाबतीत किंवा पसरलेल्या खोलीच्या बाबतीत, ऑफिसच्या खुर्चीच्या बाबतीत, मोबाईलच्या बाबतीत, कपड्यांच्या बाबतीत, एक ना अनेक. प्रत्येकाचा कम्फर्ट असतोच.
   चला, आज आपणच शोधुया आपला कम्फर्ट झोन.
 
 - वर्षा पानसरे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती