कोरोनाग्रस्त मातेने स्तनपान करावे का?

शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (09:20 IST)
सध्या सर्वांनाच कोरोनासंदर्भातील विविध प्रश्नांनी, शंकांनी ग्रासले आहे. असाच एक प्रश्न म्हणजे, कोरोना पॉझिटिव्ह मातेने तिच्या बाळाला स्तनपान करावे की नाही? याचे उत्तर हो असे आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच याबाबत खुलासा केलेला आहे. त्यानुसार, कोरोना पॉझिटिव्ह मातांनी आपल्या नवजात बाळाचे स्तनपान चालूत ठेवले पाहिजे. कारण स्तनपान देण्याचे फायदे मुलांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या जोखमीपेक्षा कितीतरी जास्त असतात.
 
कोरोनाचा धोका लहान मुलांमध्ये खूपच कमी आहे. पण आज अस्तित्वात असलेले असे बरेच रोग आहेत, ज्यामुळे नवजात मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. जन्मानंतरचे सहा महिने स्तनपान करून मुलांना या आजारांपासून दूर ठेवता येते. अर्थातच यासाठी आईने कोविडसंदर्भातील सर्व काळजी घेऊन मगच स्तनपान करावे. कोरोनाबाधित आईची प्रकृती गंभीर असेल आणि तिला रुग्णालयात दाखल केले असेल आणि तिला योग्य स्तनपान होत असेल, पण तिचे दूध मुलासाठी पुरेसे असेल, तर ते दूध काढून बाळापर्यंत सुरक्षितपणे पोहचवले पाहिजे.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. अंशू बॅनर्जी यांच्या मते, आईच दुधात थेट व्हायरस  पडल्याचे उदाहरण समोर आलेले नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात स्तनपानामध्ये विषाणूचे आरएनएचे तुकडे आढळले आहेत; परंतु, अद्यापपर्यंत स्तनपानामध्ये जिवंत विषाणू आढळला नाही. त्यामुळे आईपासून मुलाला कोरोना संसर्ग होण्याचा धोका सिद्ध झालेला नाही.
 
आयसीएमआरच्या मते, कोरोना पॉझिटिव्ह मातांनी प्रथम आपले हात साबणाने चांगले धुवावे आणि नवजात मुलाला स्तनपान देताना तोंडावर एन95चा मास्क लावावा. स्तनपान दिल्यानंतर, जे सदस्य पॉझिटिव्ह नाहीत किंवा कोणतीही लक्षणे नाहीत, अशा सदस्यांनी  बाळाची काळजी घ्यावी.
विधिषा देशपांडे  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती