मारियो नावाचा हा रोबोट डिमेन्शियाग्रस्त रूग्णाशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी घटना लक्षात ठेवेल आणि गरज भासेल तेव्हा ती त्याला आठवणीत आ़णून देईल. एवढेच नाही तर हा रोबोट रूग्णासोबत एखाद्या सहकार्याप्रमाणे गप्पाही मारेल. 18 हजार डॉलर अथार्त सुमारे 12.24 लाख रूपये किमतीच्या या रोबोटच्या सध्या ब्रिटनमध्ये चाचण्या घेतल्या जात आहेत. हा रोबोट सामान्य माहिती लक्षात ठेवण्यासोबत रूग्णासोबत मैत्रीपूर्ण वर्तन करेल. रूग्णाशी संबंधित व त्यामागची कहाणी त्यामध्ये साठविली जाऊ शकेल.
ज्यावेळी रूग्णही छायाचित्रे पाहील तेव्हा रोबोट त्याला छायाचित्राबाबत माहिती देईल. त्यामुळे रूग्णाला जुन्या गोष्टी आठवणीत ठेवण्यासाठी मदत मिळेल. या रोबोटच्या डोळ्यामध्ये बसविलेला थ्रीडी सेन्सर चष्मा, पर्स, चावी आणि रिमोट कंट्रोलसह रूग्णाला आवश्यकता असेल अशा सगळ्या वस्तूंवर नजर ठेवेल. त्याच्या मागच्या भागात बसविलेल्या घमेल्यामध्ये रूग्ण आपल्या खासगी वस्तू ठेवू शकतो, त्यामुळे त्या घरात अन्यत्र शोधाव्या लागणार नाहीत.
या रोबोटच्या समोर एक स्क्रीन असून त्यावर रूग्णाच्या सांगण्यावरून वा स्पर्शाच्या माध्यमातून गाणी, चित्रपट वा एखादा टीव्ही कार्यक्रम पाहता येऊ शकेल. आपतकालिन स्थितीत रोबोटवर बसविलेले लाल बटण दाबून मदत बोलाविली जाऊ शकते.