कर्करोगग्रस्त मुलीला पेशी उपचाराने जीवदान

मंगळवार, 17 नोव्हेंबर 2015 (10:31 IST)
अजूनही पुरेसा इलाज न सापडलेला कर्करोग हा रोग आहे. असे असतानाच एका लहान मुलीला ती कर्करोगाने मृत्यूपंथाला असताना वाचविण्यात यश आले आहे. 
 
त्यासाठी कुणावरही चाचणी न केलेली पेशी उपचार पद्धत (मनोवांच्छित पेशी) वापरण्यात आली व ती यशस्वी होऊन या मुलीचे प्राण वाचले आहेत. पेशी उपचारांनी कर्करोगाच्या उपचारात एक नवे क्षेत्र निर्माण झाले असून ते आश्वासक ठरू शकते, असे संकेत यातून मिळाले आहेत. 
 
अनेक रुग्णांसाठी ही पेशी उपचारपद्धत वापरण्यात येऊ शकते व त्यामुळे रुग्णाचे प्राण तर वाचतील शिवाय वेळ व पैसाही वाचेल. जगात पहिल्यांदा जनुकीय संपादनाने रुग्णाचे प्राण वाचविण्यात आल्याची ही पहिलीच घटना असून फ्रान्सच्या सेलेक्टिस या जैवतंत्रज्ञान कंपनीने ही उपचार पद्धती विकसित केली आहे. सध्या ही पद्धत एकाच रुग्णावर यशस्वी झाली आहे तरी त्याची व्यापकता वाढविता येईल. गेल्या काही महिन्यात लयला रिचर्डस या मुलीला कर्करोग झाला होता व तिला लंडन येथे ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ती मरणार असे डॉक्टरांनी जवळपास जाहीर केले होते. 
 
कारण तिला पारंपरिक उपचार पद्धतीने काहीच फायदा होत नव्हता, असे डॉ. वसीम कासीम यांनी सांगितले. कर्करोगात आता नवीन उपचार पद्धती आली असून त्यात रुग्णाच्या टी पेशी ज्या प्रतिकारशक्ती प्रणालीच्या भाग असतात, त्यात जनुकीय बदल घडवून आणण्यात आले. टी पेशींना प्रतिरक्षा प्रणालीतील सैनिकी पेशी म्हणतात व त्या कर्करोगाविरोधात लढत असतात. यात रुग्णाच्या शरीरातून टी पेशी काढून त्या चक्क दुरुस्त कराव्या लागतात व नंतर पुन्हा रुग्णाच्या शरीरात टाकाव्या लागतात. 
 
एखाद्या यंत्राचा सुटा भाग जसा आपण काढून दुरुस्त करतो तसेच येथे केले जाते. या पद्धतीला सेलेक्टिस उपचार पद्धती म्हटले जाते. विशेष प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगावर ही पद्धत उपयोगी आहे. यातील लयला नावाची मुलगी या कर्करोगातून पूर्ण बरी झाली व आता हा सर्व शोध किंवा नवीन उपचार पद्धत अमेरिकन सोसायटी ऑफ हेमॅटोलॉजी या संस्थेच्या ऑरलँडो येथील वार्षिक अधिवेशनात पुढील महिन्यात मांडली जाणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा