जगभर लाखो प्रकारचे पक्षी असून त्यापैकी काही पक्षी विषारीही आहेत. हूडॅड पितोहुई हा अशाच विषारी पक्षंपैकी एक आहे. दक्षिण प्रशांत महासागराच्या न्यू गिनी बेटावरील जंगलामध्ये हा पक्षी आढळतो. पितोहुई या पक्ष्याच्या सहा प्रजाती असून त्यापैकी हूडॅड पितोहुई सर्वात जास्त धोकादायक आहे. ज्याबाबत अधिकृतपणे अभ्यास करण्यात आला असा हा पहिला विषारी पक्षी आहे. हा पक्षी दिसायला फार सुंंदर असतो. त्याचं पोट लाल तर डोकं काळ्या रंगाचं असतं. त्याचे पाय खूप मजबूत असून चोच शक्तिशाली असते. त्याच्यापासून अन्य प्राण्यांना धोका असल्याचे संकेत देण्यासाठी निसर्गाने या पक्ष्याला गहिरा रंग प्रदान केला आहे. या पक्ष्याची त्वचा तसंच पंखांमध्ये होमोबात्राचोटोक्सिन नावाचं एक न्यूरोटॉक्सिन असतं. त्याची चोच तसंच पंखांनी झालेली जखम माणसाला सहन होत नाही. त्यामध्ये असणारं विष जास्त प्रमाणात शरीरात गेलं तर माणसाला त्यामुळे अर्धागवायू होऊन मृत्यूही होऊ शकतो. या पक्ष्याच्या गळून पडलेल्या पिसांपासूनही इतर पक्षी दूर राहतात. कारण, त्या पंखांमध्ये असणारं विष प्राणघातक ठरतं.
सर्वात जास्त विषारी पक्षी म्हणून या पक्ष्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या पक्ष्याचा शोध 1989 मध्ये लागला. जॅक डमबैखर हे न्यू गिनीमध्ये पक्ष्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना तेथे हा पक्षी आढळला. त्यांनी या पक्ष्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथील एका हूडॅड पितोहुईने जॅक डमबैखर यांच्या एका बोटाला चावा घेऊन ते कापलं. त्यावेळी जॅक यांनी बोटातून निघणारं रक्त थांबवण्यासाठी बोट चोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची जीभ आणि ओठ सुन्न झाले. त्यावेळी हा पक्षी विषारी असल्याचं लक्षात आलं. माणसांसाठी प्राणघातक असणारा हा जगातील पहिला पक्षी आहे.
हे पक्षी न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, भोजनाची फारच कमतरता असेल तेव्हा न्यू गिनीवरील लोक हा पक्षी खातात. हा पक्षी खाण्यासाठी शिजवत असताना फार दुर्र्गध येतो. त्यामुळे न्यू गिनीवरील लोक या पक्ष्याला गाब्रेज बर्ड असं म्हणतात.