विराली मोदी : 'मी काही सामान आहे का उचलून न्यायला? लग्नादिवशी मला अशी वागणूक का मिळावी?'

शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (18:59 IST)
दिपाली जगताप
 “विवाह नोंदणी कार्यालयात जाण्यापूर्वी आम्ही दोघं आणि आमचे कुटुंबिय, मित्र परिवार आम्ही खूप आनंदात होतो. मी आणि क्षितिज दोघंही खूप खूश होतो कारण आम्ही लग्न करणार होतो. सगळे नाचत होते, गाणी गात होते. पण विवाह नोंदणी कार्यालयात पोहचल्यावर मात्र माझी खूप निराशा झाली.
 
कारण तिकडे माझ्यासाठी काही सुविधाच नव्हती. सामान असल्याप्रमाणे मला उचलावं लागलं असं मला वाटलं. मी काही लगेज किंवा बॅग आहे का? अत्यंत वाईट वाटत होतं.”
 
32 वर्षीय विराली मोदी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
 
16 ऑक्टोबर 2023 हा दिवास विराली मोदी आणि त्यांचा जोडीदार क्षितिज नायक यांच्यासाठी खास होता. कारण दीड वर्षांच्या ओळखीनंतर दोघांनी एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं होतं. यासाठी त्यांनी मुंबईतील खार येथील विवाह नोंदणी कार्यालयात अर्ज दाखल केला होता.
 
लग्न करण्यासाठी 16 ऑक्टोबर ही तारीख ठरली. विराली आणि क्षितिज दोघांचेही कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. दोघांचा मित्र परिवारही या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजर झाला.
 
दोन्ही पायांनी अपंग असलेल्या विराली व्हिलचेअरवर बसून विवाह नोंदणी कार्यालयात पोहचल्या. पण इथे त्यांच्या आनंदावर काहीसं विरजण पडलं.
 
‘लग्नाच्या दिवशी मी खाली पडले असते तर कोण जबाबदार?’
पश्चिम मुंबईतील खार येथे असलेल्या या विवाह नोंदणी कार्यालयात पोहचण्यापूर्वी विराली आणि तिच्यासोबत असलेले सर्वजण खूप आनंदी होते. पण तिथे पोहचल्यावर मात्र विरालीची निराशा झाली.
 
विराली यांना लग्न करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर जावं लागणार होतं. पण विवाह नोंदणी कार्यालयाच्या सरकारी इमारतीत लिफ्टची सुविधाच नव्हती. आता व्हिलचेअरवर बसून दुसऱ्या मजल्यावर जायचं कसं हा प्रश्न त्यांच्यापुढे होता.
 
विरालींच्या कुटुंबीयांनी संबंधितांना कागदपत्रांवर सही घेण्यासाठी खाली येण्याची विनंती केली, पण त्यांनी ती नाकारल्याचं विराली सांगतात.
 
“आम्ही खार रेजिस्ट्रार ऑफीसला गेलो होतो. लग्नासाठीची अपॉइंटमेंट घेतानाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की, मी अपंग आहे. व्हिलचेअर वापरते. त्यावेळी त्यांनी मला हे सांगितलं नाही की रजिस्ट्रार कार्यालय दुसऱ्या मजल्यावर आहे आणि लिफ्ट नाही.
 
माझ्यासोबत माझे कुटुंबिय, मित्र परिवार सगळ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला विनंती केली की तुम्ही कागदपत्रावरील सहीसाठी इमारती खाली या. त्यांना मदत करण्याचीही विनंतीही केली. पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. आम्ही खाली येणार नाही तुम्हाला त्यांना उचलून वरती घेऊन यावं लागेल असं ते म्हणाले,” असं विराली मोदी यांनी सांगितलं.
 
अखेर विराली यांचे पती क्षितिज आणि काही मित्रांनी विराली यांना व्हिलचेअरसकट उचलून दुसऱ्या मजल्यावर नेण्याचं ठरलं. विराली यांचे काका पुढे गेले आणि त्यांनी जिने चढत असताना समोरून येणाऱ्यांना बाजूला सरकण्याची विनंती केली. असं करत दोन मजले प्रत्येक पायरी चढत विराली विवाह नोंदणीच्या कार्यालयात पोहचल्या. व्हिलचेअरसकट विराली यांना उचलल्याने वर पोहचेपर्यंत त्यांच्या मनात धाकधूक सुरू होती.
 
त्या सांगतात, “मी खूप घाबरले होते. कारण इमारत जुनी होती आणि पायऱ्या उंच होत्या. पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या साखळ्या गंजलेल्या होत्या. मला पकडलेल्यांपैकी कोणचा पाय घसरेल किंवा कोणाचा पाय अडकेल, पाठीला लागेल अशी भीती वाटत होती. मी माझ्या जीवासाठी हात पकडून बसले होते की, मी खाली पडू नये.
 
मला सांगा लग्नादिवशी वधूला यातून का जावं लागावं? मी क्षितिजचा हात पकडून सांगत होते की मला भीती वाटत आहे. लग्नादिवशीच मी पडले असते, कोणाला काही दुखापत झाली असती तर कोण जबाबदार आहे याला?” असाही प्रश्न विराली विचारतात.
 
विवाह नोंदणी कार्यालयात पोहचल्यानंतरही त्यांना चांगला अनुभव आला नाही असं त्या सांगतात.
 
“तिकडे पोहचल्यावर कोणाला काय विचारणार, ते अखडून बोलत होते. तिकडचे एजंट चांगले होते, त्यांनाही कळत होतं की किती त्रास होत आहे. पण त्यांचा नाईलाज होता.
 
मला वाटतं की सरकारी कर्माचाऱ्यांमध्येही अवेरनेस नाही. आम्हाला दया नोकय पण सहानुभूतीही नाही याचं वाईट वाटतं. कार्यालयात सगळेच माझ्याकडे पाहत होते पण कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही.”
 
सरकारी इमारत असून त्याठिकाणी व्हिलचेअरसाठी रॅम्प किंवा इतर काही सुविधा नव्हती का? यावर बोलताना विराली म्हणाल्या, “तिकडे एक पायरी तुटलेली होती. रॅम्प होता पण लिफ्ट नव्हती. मग रॅम्पचा उपयोग काय? लिफ्ट नसेल तर व्हिलचेअरवरती असलेले किंवा ज्येष्ठ नागरिकही पायऱ्या चढून कसे जाणार?”
 
‘कायद्याची आणि नियमांची अंमलबजावणी का होत नाही?’
विराली मोदी यांचा जन्म भारतात झाला पण त्यांचं शिक्षण अमेरिकेत झालं आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी विराली यांना अर्धांगवायू झाला. उपचारासाठी आपल्या आईसह त्या भारतात परतल्या. 2019 मध्ये त्यांच्या आईचं निधन झालं. आजही विराली यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
खरं तर अपंगांना सोयी-सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याचा हा विराली यांचा पहिलाच अनुभव नाही. घराबाहेर पडल्यावर अनेक ठिकाणी वारंवार असे अनुभव यापूर्वी आल्याचं त्या सांगतात. यामुळेच त्यांनी यापूर्वी अपंगांसाठी रेल्वे सुरक्षा मोहीम राबवली होती.
 
विराली यांना एकदा मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकावर वाईट अनुभव आला होता. त्यानंतर त्यांनी अपंगांसाठी रेल्वे सुरक्षा मोहीम राबवायचं ठरवलं. त्यांच्या या प्रयत्नांनंतर केरळमध्ये हमालांना याबद्दलचं प्रशिक्षणही दिलं गेलं. परंतु आजही अपंगांना समान वागणूक, त्यांच्या हक्काच्या सुविधा पुरवण्याकडे लक्ष दिलं जात नाही असं त्या सांगतात.
 
2016 मध्ये अपंगांच्या हक्कासाठी कायदा अस्तित्त्वात आला. तर 2015 मध्ये केंद्र सरकारच्या समाज कल्याण मंत्रालयाअंतर्गत अपंगांसाठी 'अॅक्सेसीबल इंडिया','सुगम्य भारत अभियान' हे कॅम्पेन राबवण्यास सुरूवात करण्यात आली.
 
या अभियानानुसार, सरकारी इमारतींमध्ये अपंग व्यक्तींना प्रवेश करताना आणि सरकारी सुविधा वापरताना कोणतीही अडचण यायला नको. याअंतर्गत जीने, रॅम्प्स, काॅरिडोअर्स प्रवेशद्वार, आपत्कालीन एक्झीट्स, पार्किंग अशा सोयी, सुविधा अपेक्षित आहेत.
यासोबतच सरकारी इमारतीच्या आतमध्ये आणि बाहेर पुरेसा प्रकाश, चिन्ह, आलार्म सिस्टम आणि स्वच्छतागृह अशा उपाययोजनांचा समावेश असावा.
या सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत का हे पाहण्यासाठी सरकारी इमारतींचं वार्षिक आॅडिट केलं जावं असंही अभियानात म्हटलं आहे. तसंच अपंगांसाठी सुरक्षित वातावरण आणि जनजागृती केली जावी असंही सुचवण्यात आलं आहे.
‘अक्षम्य’ दुर्लक्ष झाल्याचं मान्य
विराली मोदी यांच्यासोबत घडलेल्या या प्रकाराबाबत आम्ही खार येथील विवाह रेजिस्ट्रार कार्यालयाचे जॉईंट डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार भरत गरुड यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ही घटना खरी असल्याचं सांगत याबाबत संबंधितांचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचंही त्यांनी मान्य केलं.
 
ते म्हणाले, “दहा वर्षांपासून ऑफिस दुसऱ्या मजल्यावर आहे. प्राधान्याने अपंगांना इमारतीखाली येऊन सेवा द्यायची अशा सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. आपण घरी येऊन सुद्धा सेवा देतो.
 
या केसमध्ये दुर्देवाने त्यांनी वैयक्तिक विनंती करूनही संबंधित कर्मचारी खाली आला नाही. याचं दु:ख आमच्या विभागालाही आहे. आम्ही यासंदर्भात कारवाई करत आहोत. या केसमध्ये अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे.”
 
लग्नाच्या दोन दिवसांनंतर विराली यांनी समाज माध्यमांवरील आपल्या अकाऊंटवरून आपला अनुभव मांडला. विराली यांच्या या पोस्टला शेअर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली.
 
आपल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात, “सर्वप्रथम लग्नासाठी तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्हाला जी गैरसोय झाली त्याबाबत मी दिलगीर आहे. मी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि याबाबत योग्य ती कारवाई करू.” असं आश्वासन त्यांनी दिलं.
 
तर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या घटनेची दखल घेतली. याबाबत त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहिलं आहे.
 
विराली सांगतात, “2011 च्या जनगणनेनुसार भारतात 1.2 टक्के लोक व्हिलचेअरवरती आहेत. आता 2023 पर्यंत निश्चितच हा आकडा वाढला असेल. देशात बदल झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही म्हणतोय की तुम्ही वेळेत काम करा.
 
आम्ही आवाज उचलल्यानंतरच तुम्ही काम करणार आहात का? किंवा काही घटना घडल्यावरच बदल होणार का? तुम्ही आतापासूनच काम करा ही विनंती आहे.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती