लंडनमधे एका तरूण स्त्रीने मला विचारले, ''तुम्ही हिंदू लोकांनी काय केले आहे? तुम्ही कधीही एक देशसुध्दा जिंकला नाही.'' शूर, साहसी, क्षत्रिय इंग्रजांच्या दृष्टीकोनातून हे सर्व बरोबर आहे, एखाद्या मनुष्याने दुसर्यावर विजय मिळविणे हेच त्यांच्या दृष्टीने गौरवास्पद कार्य आहे. त्यांच्या दृष्टीने हेच ठीक आहे. पण आमच्या दृष्टीकोनातून ते अगदी चुकीचे आहे. भारताच्या महत्तेचे कारण कोणते, असे मी स्वत:स विचारले तर उत्तर येईल की आपण कधीही कोणाला जिंकले नाही हेच आपल्या महत्तेचे कारण आहे. त्यातच आपला गौरव आहे. आपला धर्म जयिष्णू नाही अशी निंदा तुम्ही प्रतिदिनी ऐकता आणि मला खेद वाटतो की ज्यांना अधिक कळावयास हवे असे लोकही कधीकधी अशी निंदा करताना आढळतात. मला वाटते की नेमका हाच युक्तीवाद, आपला धर्म अन्य कोणत्याही धर्मापेक्षा अधिक सत्य आहे हे सिध्द करण्याकरिता योग्य ठरेल. आपल्या धर्माने दुसर्याला कधीही जिंकले नाही. कधी रक्तपात केला नाही, उलट त्याने सर्वांवर आशीर्वचनांचा, शांततेच्या, प्रेमाच्या व सहानुभूतीच्या शब्दांचाच नेहमी वर्षाव केलेला आहे.