आपला विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. बिहारमध्ये 98 वर्षे वयाच्या पण मनाने तरुण असणार्या राज कुमार वैश्य यांनी आता अर्थशास्त्रातील एम.ए. ही पदवी मिळवली आहे. त्यांनी त्यासाठी नालंदा मुक्त विद्यापीठात परीक्षार्थी म्हणून नाव नोंदवले होते. त्यांचा हा शिक्षणातला उत्साह बघून त्यांच्या मानाने तरुण असलेल्या 70 आणि 80 वर्षांच्या वृद्धांनीही आश्चर्यांने तोंडात बोट घातली आहेत.
वैश्य हे 1980 साली एका मोठ्या कंपनीचे सरव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले तेव्हापासून त्यांनी आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेचा विचार करायला सुरूवात केली होती. भारतातली गरिबी हटवायची असेल तर काय करावे लागेल यावर त्यांचे चिंतन सुरु झाले होते. त्यांना हा विचार करताना काही गोष्टींचा खुलासा होत नव्हता. तेव्हा आपण अर्थशास्त्रातली उच्च पदवी घेतली पाहिजे या निष्कर्षाप्रत ते आले. ते उत्तरप्रदेशातल्या बरेलीचे राहणारे आहेत आणि त्यांनी आपल्या तरुण वयात उत्तरप्रदेशातून बी.ए. ही पदवी मिळवली होती. त्यांचा विषय अर्थशास्त्र हाच होता. आता आपण याच विषयातली पदव्युत्तर पदवी मिळवायची असे त्यांनी ठरवले.