कलकत्त्यातील एका उच्च मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात 8 जुलै 1914 साली एक मूल जन्माला आले. ज्योती बसू असे या मुलाचे नाव. कुटुंबीयांनी दिलेले ज्योतिरींद्र बसू असे नाव शाळेत गेल्यानंतर कधी ज्योती बसू झाले ते कळलेच नाही.
मुलाने भरपूर शिकावे अशी इच्छा त्यांच्या वडिलांची होती. या दृष्टिकोनातून ज्योती बसू यांच्यावर संस्कारही सुरू झाले. पण लहानपणापासून या मुलात विलक्षण वेगळेपण होते. जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही, तोपर्यंत ती करायचीच नाही असा बसू यांचा होरा असत.
ढाका जिल्ह्यातील (आता बांगलादेशची राजधानी) बोर्डी गावात त्यांचे वडील निशिकांत बसू डॉक्टरकी करत. बसू यांनीही डॉक्टर बनावे असे निशिकांत यांना कधीही वाटले नाही. त्यांनी आपल्या मुलाला आपले करियर ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले होते.
बसू यांनी प्रेसीडेंसी कॉलेजमधून आपले पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर कायदे विषयाचा अभ्यास करण्यासाठी ते ब्रिटनला रवाना झाले. इथेच भूपेश गुप्ता यांच्या माध्यमातून ते प्रथम ब्रिटनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात आले.
1940 चा काळ असेल. बसू पुन्हा भारतात परतल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात सर्व प्रथम सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. या काळात ते पूर्णवेळ कम्युनिस्ट पक्षाचेच काम करत.
1944 मध्ये ते ट्रेड युनियनच्या चळवळीत उतरले. यानंतर अवघ्या दोन वर्षातच ते बंगाल विधिमंडळावर प्रथम निवडून आले आणि आमदार झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या नऊ पोलित ब्युरो सदस्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता.
1967 आणि यानंतर 1969 मध्ये ते संयुक्त आघाडीच्या माध्यमातून पश्चिम बंगालचे उप मुख्यमंत्री बनले. 21 जून 1977 ते 6 नोव्हेंबर 2000 पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. सर्वाधीकाळ मुख्यमंत्री पदावर राहणारे ते देशातील एकमेव नेते आहेत. त्यांचा हा विक्रम अद्याप कोणताही नेता मोडू शकला नाही.
1996 मध्ये तर केंद्रात नवीन आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान म्हणून त्यांचेही नाव चर्चेत होते, पोलित ब्युरोने संयुक्त आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने जनता दलाचे एच डी देवेगौडा या काळात पंतप्रधान झाले. पोलित ब्युरोची मोठी घोडचूक असल्याचे नंतर पक्षाने मान्य केले.
WD
WD
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर तब्येत साथ देत नसल्याने बसू यांनी 2000 मध्ये आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
पक्षातील त्यांची जागा त्यांनी केव्हाच भक्कम केली होती. कम्युनिस्ट पक्ष आणि बसू असे समीकरणच बनले होते. आरोग्य साथ देत नसल्याने त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची विनंती पक्षाला केली होती, परंतु ही विनंती पक्षाने अमान्य करत पुन्हा 2005 मध्ये पोलिस ब्युरोत त्यांची नियुक्ती केली. 13 सप्टेंबर 2006 रोजी पुन्हा बसू यांनी पक्षापुढे निवृत्तीचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु बसू यांनी 2008 पर्यंत काम करावे अशी विनंती त्यांना पक्षातर्फे करण्यात आली.