‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या कंपनीत इंटर्न म्हणून कामाला येणाऱ्या तरुणांना कंपनीने हार्ले डेव्हिडसन बाईक देणार असल्याचे म्हटले आहे. ही बाईक घेऊन ते कुठेही साहसी ट्रीपसाठी जाऊ शकतात. या तरुणांच्या त्या ट्रीपचा सर्व खर्च देखील कंपनीच करणार असून त्यांना पगार देखील देणार आहे. पण या इंटर्नशिपमध्ये ‘सोने पे सुहागा’ म्हणजे इंटर्नशीप संपल्यानंतर इंटर्न्सना त्यांची बाईक कायमची घरी घेऊन जाता येणार आहे.
हार्ले डेव्हिडसन या कंपनीने सध्या महाविद्यालयीन मुलांना व नुकतेच पदवीधर झालेल्यांना इंटर्नशिपसाठी बोलावले आहे. या इंटर्नशिपसाठी ज्या आठ जणांची निवड होईल त्यांना १२ आठवडे कंपनीत इंटर्नशिप करावी लागणार आहे. या इंटर्न्सना कंपनीकडून प्रत्येकी एक बाईक मिळणार आहे. त्या बाईकवरून इंटर्न्सना साहसी ट्रीपवर जायचे आहे व त्यांचा हार्ले डेव्हिडसनचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करायचा आहे. या ट्रीपसाठी त्यांचा खर्च देखील कंपनीच करणार आहे. तसेच या आठवड्यांचा त्यांना पगार देखील मिळणार आहे. तसेच इंटर्नशिप संपल्यानंतर हे इंटर्न्स त्यांची बाईक घरी घेऊन जाता येणार आहे.