मराठा आरक्षण: कुणबी दाखले मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही : मनोज जरांगे पाटील

सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (20:35 IST)
मराठा आरक्षण: मराठा आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी जनजागृती मोहिमेवर असलेल्या मनोज जरांगे  पाटील यांची येवल्यात  सभा पार पडली. यावेळी  शहरातील विंचूर चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत जरांगेपाटील यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. आम्ही तुम्हाला आपले मानले पण तुम्ही आम्हाला आपले मानायला तयार नाही असा टोला भुजबळाना देत गेल्या 70 वर्षात भुजबळ यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना मराठा समाजाने मोठे केले आहे.

त्यांची मान कधीही खाली जाऊ दिली नाही. याची जाणीव ठेऊन आमच्या आरक्षणाला होणारा विरोध करू नका असे सांगत राज्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा इशारही त्यांनी सरकारला दिला.
 
येत्या 14 तारखेला अंतरवेली सराटी येथे मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला असून मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले. मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्हाला आमचे आरक्षण द्या, तुमचे तुम्हाला ठेवा. इतर कोणाचाही वाटा आम्ही मागत नाही, गरीब मराठा समाजाला त्यांचे हक्काचे व टिकणारे आरक्षण द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी येवला येथे झालेल्या सभेत सांगितले.
 
सुमारे चार तास उशीर होऊनही हजारोंच्या संख्येने नागरिक थांबून होते.यावेळी  जरांगे पाटील म्हणाले आमचे उपोषण वास्तव मागणीसाठी आहे. मराठा आणि कुंणबी एकच आहे. महाराष्ट्रातील सबंध मराठा समाज शेती करतो. त्याचा नोंदी सर्वत्र आहे. मराठवाड्यात उर्दू, फारशी, मोडी अशा विविध भाषेतील कागदपत्रात या पाच हजार नोंदी आम्ही संकलित केलेले आहेत. त्यामुळे उपोषणाबाबत चर्चेला आलेल्या शिष्टमंडळाला आम्ही चार दिवसाचा कालावधी देण्याबाबत ठाम होतो. यावेळी सातत्याने टिकणारे आरक्षण हवे तर एक महिन्याच्या कालावधी द्या

असे राज्य शासन वारंवार सांगत होते. खरे तर मंत्रिमंडळ एक ठराव करून देखील आरक्षण देऊ शकत होते. मात्र, त्यांनी दिलेल्या आरक्षण टिकले नाही, तर ते पुन्हा महिन्याच्या कालावधी दिला नाही असे म्हटले असते. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एक महिन्याच्या कालावधी देण्याचा ठराव करावा, तशी विनंती सर्वपक्षी नेत्यांनी केल्यावर आम्ही तीस, नव्हे तर 40 दिवसाचा कालावधी दिला आहे.
 
मात्र, यापुढे हा कालावधी संपल्यावर हा समाज स्वस्त बसणार नाही, असा इशारा त्यांनी त्यांना दिला. जरांगे पाटील म्हणाले, यापुढे आरक्षणासाठी मराठा समाजाच्या कोणत्याही मुलाला आत्महत्या करावी लागणार नाही. आंदोलन आमचे, मागणी आमची, अभ्यास आमचा, आरक्षण देखील आमचे ते आम्ही मिळेल शिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.






Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती