राम मंदिर प्रश्नावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ''सत्तेसाठी असंख्य वाल्यांना तुम्ही पवित्र केले, पण ज्या रामाने तुम्हाला राजकीय वैभव दिले तो राम वनवासातच आहे. महाभारत फक्त पाच गावांसाठी झाले, पण अयोध्येतील ‘महाभारत’हे एका राममंदिरासाठी सुरू आहे'', अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
सामना संपादकीयमधल ठळक मुद्दे
- राममंदिराची उशी करून जे झोपले होते त्यांचे डोळे उघडण्याचे काम शिवसेनेने नक्कीच केले आहे.
- निवडणुका आल्या आहेत म्हणून जागे होऊ नका. राममंदिर उभारणीसाठी जागे व्हा! प्रत्येक हिंदूची आता एकच गर्जना आहे, ‘‘आधी मंदिर, मग सरकार!’’
- तेव्हा झोपलेल्या कुंभकर्णांनो उठा, आता उठला नाहीत तर कायमचे झोपून जाल.
- निवडणुका आल्या की, राम आठवतो. मग अयोध्येत राममंदिर का बांधत नाही? हा सरळ प्रश्न आहे. ‘‘राम की रोटी?’’असा प्रश्न विचारला जातो. रोटी महत्त्वाची आहेच, पण रामाच्या नावाने सत्ता मिळवली ती ‘रोटी’देण्यासाठी.