चीन-पाकिस्तानच्या सीमेजवळ विमान कोसळलं, भारतानं म्हटलं की, विमान आमचं नाही

सोमवार, 22 जानेवारी 2024 (10:51 IST)
अफगाणिस्तानच्या बदखशां प्रांतात एक विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे.बदखशां प्रांतांच्या तालिबान प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार हे विमान कोणत्या प्रकारचं आहे, त्यात कोणते प्रवासी होते याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.तालिबानकडून माध्यमांना देण्यात आलेल्या निवेदनात विमान त्याच्या मार्गावरून भरकटलं होतं आणि त्यानंतर बदखशां प्रांताच्या जिबाक जिल्ह्याच्या उंच डोंगररांगांमध्ये कोसळलं.विमान कुठलं होतं, कुठे जात होतं आणि त्यात कोण प्रवासी होते याबाबत काहीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

सुरुवातीला अफगाणिस्तानच्या माध्यमांनी विमान भारतीय असल्याचा दावा केला होता. हे विमान दिल्लीहून मॉस्कोच्या दिशेनं जात होतं असं सांगण्यात आलं. पण भारत सरकारनं हे विमान भारतीय नसल्याचं स्पष्ट केलं.
भारतीय हवाई नागरी उड्डयण मंत्रालयानं एक्स या सोशल साइटवर दिलेल्या माहितीमध्ये अफगाणिस्तानात अपघातग्रस्त झालेलं विमान भारतीय हद्दीतील शेड्यूलचं नव्हतं किंवा नॉन शेड्यूल चार्टर एअरक्राफ्टही नव्हतं. हे विमान मोरक्कोमधील नोंदणी असलेलं होतं. याबाबत अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार मोरक्कोमध्ये नोंदणी असेलेलं हे डीएफ-10 विमान होतं.

चीन, ताजिकिस्तान आणि पाकिस्तानी सीमेवरील अपघात
दरम्यान बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी त्यांना माध्यमांमधून विमान अपघाताची माहिती मिळाली, असं सांगितलं. तेही अजून माहितीच्या प्रतिक्षेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
त्यापूर्वी अफगाणिस्तानमधील टिव्ही नेटवर्क तोलो न्यूजनं याबाबत ट्विट केलं होतं. त्यात विमान तोपखाना डोंगररांगांमध्ये अपघातग्रस्त झाल्याचं म्हटलं होतं. तसंच हे विमान दिल्लीहून मॉस्कोला जात होतं असंही म्हटलं होतं.
 
मात्र रशियातील विमान अधिकाऱ्यांनी रशियात रजिस्टर्ड असलेलं एक विमान त्याचठिकाणी रडार स्क्रीनवरून गायब झालं होतं असं सांगितलं. ते विमान अफगाणिस्तानच्या वरच उड्डाण घेत होतं.रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार रशियाच्या अधिकाऱ्यांनीही हे विमान एक एअर अॅम्ब्युलन्स असल्याचं सांगितलं होतं. ते दिल्लीमार्गे उझ्बेकिस्तान आणि नंतर मॉस्कोला जाणार होतं. 1978 मध्ये निर्मित हे दसॉ फाल्कन 10 (डीएफ-10) विमान होतं. विमानचा अपघात ज्याठिकाणी झाला ती जागा चीन, ताजिकिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर आहे. पण विमान नेमकं कुठं कोसळलं याबाबत नेमकी माहिती नाही.
 
बदखशां प्रांताच्या माहिती विभागाचे प्रमुख जबीउल्लाह अमिरी यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना विमान कोसळल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. पण विमान कुठं कोसळलं हे त्यांनी सांगितलं नाही. ती माहिती घेण्यासाठी पथक पाठवल्याचं ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती