बाप्परे, ४० वर्षानंतर चित्रपटांवरची बंदी उठली

शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (15:22 IST)
सौदी अरेबिया या देशात तब्बल चाळीस वर्षानंतर चित्रपटांवर असलेली बंदी उठविण्यात आली.  या देशातील पहिल्या चित्रपटगृहात बुधवारी चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटगृहात सध्या फक्त व्हीआयपींसाठीच चित्रपट दाखवले जात असून सामान्य नागरिकांना अजून महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. सध्या गाजत असलेला ब्लॅक पँथर हा चित्रपट यावेळी दाखविण्यात आला. 

सौदी अरेबियामध्ये १९८० साली चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. चित्रपट पाहणे इस्लामविरोधी असल्याचे सांगत ही बंदी घालण्यात आली होती. मात्र आता तब्बल ४० वर्षांनी ही बंदी उठविण्यात आली असून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटगृहे बांधण्याचे काम सुरू आहे. २०३० पर्यंत सौदी अरेबियात ३५० चित्रपटगृहे बांधण्यात येणार असून यात २५०० स्क्रीन असणार आहेत. सौदी अरेबियाचे राजे प्रिन्स सलमान यांनी देशाला आर्थिक फायदा व्हावा म्हणून ही बंदी उठविल्याचे बोलले जात आहे. 

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती