विकीलीक्सचे ज्युलियन असांज अखेर 14 वर्षांनंतर मायभूमीत परतले
गुरूवार, 27 जून 2024 (00:11 IST)
विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज हे मायदेशी, अर्थात ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. विमानातून उतरताच त्यानं पत्नी आणि वडिलांना मिठी मारली.ज्युलियन असांज ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर त्यांची पत्नी स्टेला असांजने पत्रकारांशी संवाद साधला. ज्युलियन पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
स्टेला म्हणाल्या की, ज्युलियनला सार्वजनिकपणे बोलण्यापूर्वी काही वेळ हवाय.
स्टेला म्हणाल्या, "ज्युलियनला बरे होण्यासाठी आणि त्याला 'स्वातंत्र्याची' सवय होण्यासाठी वेळ हवा आहे. तो कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल."
ज्युलियन तत्त्वनिष्ठ आणि निर्भय असल्याचंही स्टेला यांनी नमूद केलं.
स्टेला पुन्हा एकदा म्हणाल्या की, "ज्युलियनला अमेरिकेच्या अध्यक्षांकडून माफी मिळेल अशी आशा आहे. मला वाटतं की, जर पत्रकारांनी या विरोधात एकत्र आंदोलन केलं तर त्यांना माफ केलं जाईल."
वर्षभराच्या कायदेशीर लढाईनंतर विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज आणि अमेरिकन प्रशासनामध्ये समझोता झाल्याचं विकीलीक्सने म्हटलंय.
यानुसार असां युकेतून रवाना झाले असून ते अमेरिकेतील त्यांच्यावरील गुन्हेगारीच्या आरोपांमध्ये आपण दोषी असल्याचं स्वीकारल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात येईल.
राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीची माहिती मिळवण्यासाठी कारस्थान रचून, ती माहिती उघड केल्याचा आरोप 52 वर्षांच्या असांज यांच्यावर आहे.
इराक आणि अफगाणिस्तानातील युद्धाबद्दलची माहिती असणाऱ्या विकीलीक्स फाईल्स जगजाहीर केल्याने अनेकांची आयुष्यं धोक्यात आली, असा दावा अमेरिकेने गेली अनेक वर्षं केलाय.
गेली 5 वर्षं ब्रिटीश तुरुंगात घालवलेल्या असांज यांनी अमेरिकेत प्रत्यापर्णाचं प्रकरण तुरुंगातूनच लढवलं होतं.
बीबीसीची अमेरिकेतील सहयोगी वृत्तसंस्था सीबीएस (CBS) च्या माहितीनुसार, असांज यांना अमेरिकेत तुरुंगवास होणार नाही आणि त्यांनी युकेमध्ये तुरुंगवासात घालवलेल्या कालावधीच्या बदल्यात त्यांना 'क्रेडिट' मिळेल. (म्हणजे भविष्यात एखाद्या प्रकरणी तुरुंगवास झाल्यास त्यांनी युकेत तुरुंगात घालवलेल्या कालावधीचा काळ त्या शिक्षेतून वजा होईल.)
1901 दिवस लहानशा कोठडीत घालवल्यानंतर मंगळवारी असांज बेलमार्श तुरुंगातून बाहेर पडल्याचं विकीलीक्सने एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर म्हटलंय.
विकीलीक्सने ऑनलाईन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जीन्स-निळ्या टीशर्टमधल्या असांज यांना स्टॅनस्टेड विमानतळाकडे नेताना दिसत असून त्यानंतर विमानात चढताना दिसतात.
बीबीसीने हा व्हिडीओ पडताळलेला नाही.
ज्युलियन यांची पत्नी स्टेला असांज यांनी 'हा दिवस प्रत्यक्षात यावा यासाठी इतकी वर्षं प्रयत्न करत राहणाऱ्यांचे' आभार मानले आहेत.
असान्ज यांच्यावरील कारवाई थांबवावी या ऑस्ट्रेलियाच्या विनंतीचा आपण विचार करत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एप्रिल महिन्यात म्हटलं होतं.
तर त्याच्या पुढच्याच महिन्यात असान्ज यांना युके हायकोर्टाकडून दिलासा मिळाला होता. अमेरिकेत प्रत्यापर्ण करण्यात येण्याच्या विरोधात नवीन अपील करण्याला या कोर्टाने मान्यता दिली. यामुळे भविष्यात अमेरिकेत हा खटला कसा चालवला जाईल आणि असान्ज यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल का, या मुद्द्यांवर असान्ज यांना अमेरिकेला आव्हान देता आलं.
'बायडन प्रशासनाने या लाजीरवाण्या कारवाईपासून स्वतःला दूर ठेवावं' असं या निर्णयानंतर स्टेला असान्ज यांनी पत्रकार आणि समर्थकांशी बोलताना म्हटलं.
अमेरिकन प्रशासनाला सुरुवातील विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांच्यावर 18 आरोपांसाठीचा खटला चालवायचा होता. हेरगिरी, अमेरिकन सैन्याचे गुप्त रेकॉर्ड्स, अफगाणिस्तान आणि इराक युद्धांसंबंधीचे परराष्ट्र संबंध विषयक गोपनीय कागदपत्रं प्रसिद्ध करण्याविषयीचे हे आरोप होते.
ज्युलियन असांज यांनी 2006 मध्ये विकीलीक्सची स्थापना केली. याद्वारे 1 कोटी कागदपत्रं जगजाहीर केल्याचा दावा त्यांनी केलाय. ' गोपनीय कागदपत्रं फुटण्याचं अमेरिकन सरकारच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं प्रकरण' असल्याचं अमेरिकन सरकारने नंतर म्हटलं होतं.
अमेरिकन लष्करी हेलिकॉप्टरमधून चित्रित करण्यात आलेला एक व्हीडिओ 2010 मध्ये या वेबसाईटने प्रसिद्ध केला. यामध्ये रॉयटर्सच्या दोन बातमीदारांसोबत डझभरापेक्षा जास्त इराकी सामान्य नागरिक बगदादमध्ये मारले जात असल्याचं दिसत होतं.
असांज यांच्या एक सहकारी, अमेरिकन लष्कराच्या विश्लेषक चेल्सी मॅनिंग यांना 35 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर 2017 मध्ये बराक ओबामा प्रशासनाने ही शिक्षा रद्द केली.
असांज यांच्यावरही बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या वेगळ्या प्रकरणांत स्वीडनमध्ये आरोप करण्यात आले होते, जे त्यांनी फेटाळले.
असांज यांनी 7 वर्षं इक्वाडोरच्या लंडन दूतावासात लपून घालवली. स्वीडीश केसमुळे त्यांना अमेरिकेत पाठवलं जाईल, असं त्यांचं त्यावेळी म्हणणं होतं.
मूळ तक्रारीला बराच काळ उलटून गेल्याचं म्हणत 2019 मध्ये स्वीडिश प्रशासनाने ही केस बंद केली आणि नंतर युके प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतलं. स्वीडनमध्ये प्रत्यापर्णासाठी कोर्टासमोर शरण न आल्याने त्यांच्यावर खटला चालवला गेला.
या सगळ्या कायदेशीर लढायांच्यादरम्यान असान्ज सार्वजनिकरित्या कुठेही फारसे दिसले नाहीत आणि गेली अनेक वर्षं त्यांची तब्येत बरी नसल्याच्या बातम्या येत होत्या. 2021 मध्ये तुरुंगात असताना त्यांना स्ट्रोकही येऊन गेला.