न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानात एका विद्यार्थ्याने आपल्या सहप्रवाशावर लघवी केल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीच्या दिशेने स्थानिक प्रमाणवेळेनुसार रात्री 9 वाजून 16 मिनिटांनी निघालं होतं. हे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री 10 वाचून 12 मिनिटांनी उतरलं.
पीटीआय वृत्तसंस्थेला एअरपोर्टमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी विद्यार्थी हा अमेरिकन विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तो प्रवासादरम्यान नशेत होता. त्याने झोपेतच लघवी केली. शेजारी बसलेल्या प्रवाशापर्यंत ती पोहोचली. यानंतर त्याची तक्रार केबिन क्रूकडे करण्यात आली.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, "इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या पोलीस उपायुक्तांनी म्हटलं की अमेरिकन एअरलाईन्सच्या एका प्रवाशाने याबाबत तक्रार केली आहे. आरोपीची ओळख पटवण्यात आली असून कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे."