श्री कोकिळा माहात्म्य अध्याय सव्वीसावा
बुधवार, 19 जून 2024 (11:39 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
श्रीकृष्ण म्हणे धर्माप्रती ॥ कथा ऐका पुढती ॥ विप्र आणि बाळीं विचार करिती ॥ तंव विघ्न ओढवले ॥१॥
तंव तो पुत्र सुलक्षण ॥ पावता झाला मरण ॥ पित्यानें तयासी देखोन ॥ शोका लांगीं प्रवर्तला ॥२॥
पिता माता दोघेजणी ॥ रडती आक्रोशें करुनी ॥ म्हणती अंधाची येष्टी हिरोनी ॥ कोणें नेली तत्वतां ॥३॥
सांवळ्या राजसा बाळा ॥ कोठें पाहूं तूं तें डोळा ॥ ऐसी ते परम अबला ॥ स्फुंदस्फुंदोनी रडतसे ॥४॥
माता म्हणे पुत्रातें ॥ कोणत्या वनीं पाहूं तूंतें ॥ तूं टाकोनी गेलास आम्हातें ॥ आतां आम्ही काय करुं ॥५॥
पित्यानें बाळ उचलून ॥ घेतलें उत्संगा लागून ॥ देता झाला चुंबन ॥ परम घाबरा होऊनी ॥६॥
पिता म्हणे पुत्रासी ॥ कोणत्या कामा गुंतलासी ॥ बाळें की तुज खेळावयासी ॥ बोलविती चालवेगीं ॥७॥
त्या पुत्राची माता पिता ॥ अत्यंत शोक करिती तत्वतां ॥ सतस्तासी व्याकूळता ॥ परम घाबरे होवोनी ॥८॥
सकळ जन म्हणती तयाप्रती ॥ ऋषीचा कमंडलू निश्चितीं ॥ तेणें आणिला गृहाप्रती ॥ तेणें परत्र पावला ॥९॥
आतां तुह्मी जावोन ॥ ऋषीचे धरावे चरण ॥ मग तो करील शापमोचन ॥ तुम्ही या पुत्राचे जाणपां ॥१०॥
ऐसा विचार करुनी सकळीं ॥ जाते झाले ऋषी जवळी ॥ सकळ वर्तमान तयेवेळीं ॥ ऋषीलागीं श्रुत केलें ॥११॥
ऋषी म्हणे स्त्रियेप्रती ॥ म्यां ब्राह्मणाच्या पुत्राप्रती ॥ श्राप दिधला निश्चितीं ॥ कमंडलू कारणें ॥१२॥
कोणीएक ब्राह्मण सुत येवोनी ॥ कमंडलू नेला चोरुनी ॥ मी तया शापशस्त्रें करुनी ॥ ताडिता झालों साक्षेपें ॥१३॥
पतीचें वाक्य ऐकोन ॥ मानसीं खेद करी जाण ॥ कमंडलू करितां शाप पूर्ण ॥ विप्रपुत्रा कां दिधला ॥१४॥
त्या पुत्राकरितां ॥ शोक करिती मातापिता ॥ ऐसा शाप तत्वतां ॥ कोणालागीं देऊन नये ॥१५॥
तंव ते सकळ जनासहित ॥ ब्राह्मण आला शोक करीत ॥ ऋषीलागीं म्हण्दत ॥ आमुचा शोक दूर करावा ॥१६॥
विप्रपत्नी म्हणे ऋषीलागून ॥ तुम्ही शाप दिधला तया राग येऊन ॥ याचा वृध्दापकाळ जाणून ॥ उश्राप घ्यावा शीघ्रात्वें ॥१७॥
ऐसें ऋषीपत्नीचें वचन ॥ तेणें केलें यथार्थ श्रवण ॥ ऋषी म्हणे तिजलागून ॥ शाप माझा मिथ्या नव्हे ॥१८॥
ऋषीवचन निश्चितीं ॥ ब्राह्मणें श्रुत झाल्यावरती ॥ जैशा चपळा आगी आदळती ॥ कडकडोनी शीघ्रत्वें ॥१९॥
पर्म आक्रोशें रडत ॥ मस्तल अवनीवरी पिटित ॥ ऐसा शोक पाहूनी निश्चित ॥ ऋषीपत्नी घाबरली ॥२०॥
ऋषी म्हणे कौशिकालागुन ॥ बाळालागीं वेचावें पुण्य ॥ एकएकानें वेचावें पुण्य ॥ तरी बाळ उठे पैं ॥२१॥
ऐसें कौतुक पाहून ॥ पित्यानेंही वेचिलें पुण्य ॥ तथापि बाळ जाण ॥ उठला नाहीं तयाचा ॥२२॥
ब्राह्मणपत्नीसी गहिंवर पूर्ण ॥ येता झाला परम दारूण ॥ मी कांही केलें नाही पुण्य ॥ एक पुण्य सबळ असे ॥२३॥
कोकिळा देवीचें पूजन ॥ मी केलें मास भरी जाण ॥ त्यापुण्येकरुन ॥ माझा बाळ सजीव हो ॥२४॥
मग हातीं उदक घेवोनी ॥ कोकिळेचें केलें स्मरण ॥ पुत्राचे हातीं घालून ॥ तेणें पुत्र सजीव झाला ॥२५॥
पुत्र होता सजीव जाण ॥ लोक झाले आनंदधन ॥ शर्करादक्षिणा देऊन ॥ ब्राह्मण तृप्त केले पैं ॥२६॥
पुत्र देखोनी आनंदधन ॥ मातापित्यासी समाधान ॥ पुत्रा देती चंदन ॥ परम हर्ष जाहला ॥२७॥
कृष्ण म्हणे धर्माप्रती ॥ ऐसें कोकिळाव्रताचें महात्म्य निश्चितीं ॥ कथिलें म्यां तुजनिगुती ॥ परम सादर होवोनियां ॥२८॥
हें व्रत ज्या स्त्रिया करिती ॥ त्यांचे मनोरथ पूर्ण होती ॥ मग कन्या प्रसवती ॥ निश्चयेसी जाणिजे ॥२९॥
ऐसें व्रत सांगोनी धर्माला ॥ करितां प्राप्त तुम्हाला ॥ पावाल बहुत सुखाला ॥ व्रत हें द्रौपदीनें करावें ॥३०॥
इति इतिश्रीभविष्योत्तर पुराणें ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ षडविंशतिंतमोऽध्याय: अध्याय ॥२६॥
ओव्या ॥३०॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ अध्याय २६ वा समाप्त: ॥