महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते अनेक दैवी पुरुष, संत, महात्मे यांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली आहे. तसेच महाराष्ट्रात पावलोपावली अनेक भाषा तसेच बोली भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्रात अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कानबाई रोट उत्सव हा देखील मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रातील खान्देश मधील लोकांचे श्रद्धास्थान असलेली कानबाई उत्सव हा श्रावणात येतो. कानबाई या उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली असून हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा करण्यात येतो.
कानबाई स्थापना-
अनेक भाविकांच्या घरी कानबाई बसवली जाते. श्रावणातल्या नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी कानबाईचे स्थापना करण्यात येते. ततपूर्वी घर घरातील मंडळी घर स्वच्छ करतात. घराच्या दाराला आंब्याचे किंवा फुलांचे तोरण बांधले जाते. तसेच कानबाई ज्या ठिकाणी स्थापित होणार आहे तिथे स्वच्छ पाण्याने पुसून घेतले जाते. तसेच त्याठिकाणी मखमलीचे पडदे किंवा साड्या लावून डेकोरेशन केले जाते. त्यानंतर चौरंग मांडला जातो त्या चौरंगच्या आजूबाजूला केळीचे घड लावले जातात. तसेच सुंदर चमकदार कापड चौरंगावर घालून त्यावर कलशात नारळ ठेऊन त्याला अलंकार, म्हणजेच दागदागिने घालून सजवले जाते. फुले हार यांनी कानबाई सजवली जाते. कोणाकोणाकडे पूर्व पिढींपासून चालत असलेले नंतर कानबाई म्ह्णून पूजले जाते. तर कोणी देवीचा मुखवटा बसवून कानबाई म्हणून तिची स्थापना करतात. कानबाईची ओटी भरण्यात येते. तिच्यापुढे फळे, चणे, लाह्या, फुटाणे, पंचामृत असा नैवेद्य ठेवण्यात येतो.
कानबाईचा नैवेद्य-
कानबाईला दाखवला जाणारा नैवेद्याला हा खूप खास असतो. यादिवशी चण्याच्या डाळीला महत्व असते. तसेच पुरणाच्या पोळीला ''रोट'' असे संबोधले जाते. तसेच कानबाईला विशेष नैवेद्य हा रोट म्हणजेच पुरणपोळी, भोपळ्याची भाजी आणि खीर असा असतो. हे रोट बनवण्यापुर्वी घरातील मुख्य महिला ही हाताच्या मुठीने गहू मोजते. घरातील जेवढे सदस्य असतील तेव्हड्यांच्या नावाने या मुठा मोजल्या जातात आणि मग हे गहू दळण्यात येतात. तसेच विशेष म्हणजे हा नैवेद्य घरातली म्हणजे कुटुंबातील सदस्यच ग्रहण करू शकतात. तसेच श्रावणातील पौर्णिमा येण्याअगोदर हे रोट वाढवावे लागतात म्हणजेच गहू दळून आणलेली ही कणिक संपवावी लागते. हा सण अनेक समाज साजरा करतो त्यामुळे प्रत्येक समाजातील लोक आपल्या परीने कानबाईचा रोट आणि इतर पदार्थांचा नैवेद्य बनवतात.
विसर्जन-
कानबाई स्थापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लागलीच विसर्जन केले जाते. कुटुंबातील मंडळी सकाळी लवकर उठतात. तसेच कानबाई स्थापन असलेला चौरंगावर अक्षता टाकून तिला अगदीच थोडे हलवतात. व विसर्जन करतात. तर काही समाजामध्ये आरती करून चौरंग अंगणात आणला जातो. त्यावेळेस ज्या ज्या घरात कानबाई बसली आहे तिथून सर्व कानबाई एकत्र येतात. व वाद्यांच्या गजरात कुटुंबातील प्रमुख महिला ही कानबाई डोक्यावर घेऊन नदीवर विसर्जित करायला जातात. मुली, महिला फुगड्या खेळतात, नामस्मरण करतात, जयजयकार करतात. हा सण ब्राह्मण समाजात साजरा तर करतात पण सोनार, शिंपी, चौधरी, माळी इत्यादी समाजात देखील प्रामुख्यने साजरा करतात.