आली गौराई अंगणी

श्रावण महिना संपतासंपताच वेध लागतात ते भाद्रपदात येणार्‍या गौरी गणपतीचे! गणपतीच्या आगमनानंतर तीन दिवसांनी येणारी ही गौराई (कधी कधी तिथीच्या बदलाने मागेपुढे) ही पण निसर्गाचेच रूप आहे. तिचीही रूपे वेगवेगळी आहेत. गणपतीच्या आदल्या दिवशी हरितालीका पूजनाने शंकराला प्रसन्न करणारी उमा गणपतीच्या आगमनानंतर लगेचच आपल्या मुलाचा विरह सहन न होऊन की काय तीही आपल्या भेटीला येते.

पण तिच्या येण्याची वाट प्रत्येक स्त्री पाहते कारण ती माहेरवाशिण असते ना! रुणुझुणुच्या पाखरा, जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी, घाली लिंबलोण सडा अशी अनेक गाणी म्हणूनच तिच्यावर रचली गेली आहेत.

तिची स्थापना वेगवेगळ्या प्रकारे करतात, कुणी विहीरींवरून (किंवा जवळपासच्या पाणवठ्यावरून) तिला वाजत गाजत घरी आणतात. घराच्या सर्व भागात तिला फिरवतात जिथे जिथे पावलं काढली असतील त्या सर्व जागी ही गौर फिरते असे मानतात. ही पावले घरात येणारी मंगलमय असतात. गौराई जणू तिच्या पायांनी घरात मंगलमय वातावरण घेऊन येते. पाणवठ्‍यावरून कोणी गौरीचे (तिला महालक्ष्मी म्हणण्याची प्रथा आहे) मुखवटे आणतात (पितळी, मातीचे किंवा हल्ली सॉफ्ट टॉईजच्या मटेरियलचेही) काही घरात पाण्याचा भरलेला कलश (घागर) आंब्याच्या पानांसह आणतात व त्यावर एखाद्या वाटीत पाच किंवा सात खडे आणतात व त्याची गौराई म्हणून पूजा करतात. या खड्यांच्या गौरीपेक्षा महालक्ष्म्या म्हणून उभ्या करण्यात येणार्‍या गौराईंचा थाट मोठा आहे.

चैत्रागौरीसारखी आरास यांच्यापुढेही करतात. लाडू, चकल्या, करंज्या यांसारख्या दिवाळीत्या पदार्थांचीही या काळात रेलचेल असते. काही ठिकाणी नुसते मुखवटे ठेवतात काहींच्या घरी बैठ्या गौरी असतात तर काहींच्या उभ्या. उभ्या महालक्ष्म्यांना पितळी किंवा लाकडी स्टॅन्डही असतात किंवा कोणी कोठ्यांना साड्या नेसवून त्यावर मुखवटे बसवतात. काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे तर काही पितळी तर काही लाकडाचे असतात. (ज्या प्रमाणे स्टॅन्ड त्याप्रमाणे) कोठ्यांना साड्या नेसवताना त्या कोठ्या लाडू, करंज्या सारख्या मिष्टांनांनी भरूनही ठेवण्याची पद्धत काही लोकांकडे आहे.

  WD
त्या दोन गौरींना ज्येष्ठा व कनिष्ठा असे संबोधतात. दोघींच्या मध्ये एक बाळही ठेवण्याची पद्धत आहे. गव्हाच्या व तांदळाच्या राशी तिच्यापुढे मांडतात. त्यांना अलंकारांनी मढवतात. त्यांच्या साड्याही नवीन घेतात. त्यांचे मुकूट, गळ्यातील अलंकार, बांगड्या साड्या असा सर्व थाट पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. काही घरात एक सासुरवाशीण व एक माहेरवाशीण (विवाहीत किंवा कुमारिका) अशा दोघी जणी गौराई आणतात. तर काही घरात दोघी ही सवाष्ण असतात. त्यांना साड्या नेसवण्याचे काम ही घरच्या दोन सुना करतात. (काही ठिकाणी) गव्हा तांदळाची रास, ओटी, फराळाचे पदार्थ, फळ-फळावर अशा समृद्धीनी सजलेली गौराई आलेल्या दिवशी मात्र भाजी भाकरीच्या नैवेद्यांनेच तृप्त होते.

दुसर्‍या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. आरती करतात पुरण पोळीचा बेत असतो. (शक्य नसल्यास नैवेद्यापुरते तरी पुरण घालतातच) व तिसर्‍या दिवशी पानावर दहीभातचा नैवेद्य देऊन त्यांचे विसर्जन होते. काही लोकांकडे या दिवशी चौसष्ठ योगिनींचीही पूजा करतात. एका घागरीत पाणी भरून ती घागर कर्दळीच्या पानावर गव्हाच्या राशीवर काकडीच्या फोडी ठेवून त्यावर ठेवतात तिच्यावर गंधाने चौसष्ठ योगिनी काढून (आकृती) त्यावर कलश ठेवला जातो. कोणी 64 योगिनीच्या फोटोचीही पूजा करतात.

नोकरीच्या निमित्ताने विभागलेले कुटुंबही या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येते व सणांचा आनंद लुटते म्हणून ही हे सण सारखे यावेसे वाटतात.