पेरलेल्या 'गौरी'च्या मध्यभागी वाळूचे व ओल्या हळदीचे 'शिवलिंग' ठेवून धूप-उदबत्तीच्या सुगंधी वातावरणात गौरीची मन:पूर्वक पूजा बांधली जाते. माझ्या संसारात आनंदाचा सुंगध असाच दरवळू दे असे स्त्रीमन हरितालिकेकडे साकडे घालत असते. यानंतर पिवळे वस्त्र, बांगडी, कुंकू आरसा अशा सौभाग्याचे प्रतिक असलेल्या वस्तूंनी हरितालिकेची ओटी भरी जाते. श्रावणातील पर्णसंभाराने लदलदलेल्या विविध पानांच्या प्रत्येकी सोळा अशा सोळा जातीच्या पानांनी हरितालिकेला सुशोभित केले जाते. या हिरव्या पत्र्यांच्या रुपाने माझा संसार वेलींप्रमाणे बहरू दे अशी आराधना करून देवीची आरती केली जाते. या दिवशी पूर्ण उपवास करून रात्री जागरण केले जाते.