बॉलीवूड म्हणजे प्रेमकथांचा बाजार. अशीच 'रिव्हॉल्व्हर रानी' ही एक प्रेमकथा आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे रानीच्या आयुष्यात रिव्हॉल्व्हर महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट रानी बंदुकीच्या गोळीने मिळवत असते. ती चंबळची रानी आहे अलका सिंग (कंगना राणावत). तिने आपल्या हिरोला रोहन मेहरालाही (वीर दास) आपल्या बंदुकीच्या धाकात ठेवले आहे. त्याचे उद्दिष्ट मुंबईला जाऊन फिल्ममध्ये करिअर करायचे आहे. आपण जर रानीच्या मनाप्रमाणे वागलो तर रानी आपल्याला नक्की मदत करेल, अशी आशा बाळगून आहे. म्हणून तो रानीचा गुलामच होऊन जातो व त्यापुढेही जातो. सोबतच त्याचे एक लफडे बॉलिवड्मध्ये चालू आहे. रानी एकेकाळी त्या एरियातून निवडून आलेली आहे; पण आता पडलेली आहे. तिला जिंकून देण्यासाठी तिचा मामाही प्रयत्नशील आहे. विरोधी पार्टीहे बंदूकशाही जाणते. प्रत्येकाचा स्वार्थ रानी, तिची प्रसिध्दी, तिची संपत्ती यामध्ये गुंतलेला आहे, सर्वकाही मजेत चालू असताना अचानक रानी गर्भवती असल्याचे जाहीर होते आणि सर्वांचे स्वार्थ बदलतात. इतरांना रानीचे मूल नको आहे; पण फक्त रानीला ते हवं आहे. त्यासाठी ती रोहनशी लग्न करायला तयार आहे. लग्न ताजमहालच्या परिसरात थाटाने झाले पाहिजे, अशी तिची महंमदी इच्छा आहे. रानीच्या इच्छेपुढे कुणाचे काय चालणार? रोहनला सिनेमा काढायचाय म्हटल्यावर तिने त्याच्यासाठी संपूर्ण चित्रनगरी उभी केलेली आहे इतकी ती हौशी आहे; पण हिंसाचार हा पाया असलेल्या गोष्टीचा शेवट कसा होणार? हे रहस्य आपल्याला शेवटपर्यंत खुर्चीला किळवून ठेवते.
चांदोबा मासिकात शोभेल अशी ही गोष्ट आहे. वरवर पाहता चित्रपट जर मारधाड चित्रपट वाटला तरी कंगनाने मात्र कमाल केलेली आहे. 'क्वीन'च्या तिच्या यशानंतर पुन्हा एकदा फक्त तिच्यासाठी पहावा असा हा चित्रपट आहे. या वर्षात अजून एखादा हिट मिळाला तर ती यंदाची सुपरस्टार आहे. पारंपरिक पध्दतीच्या हिरोंना मागे टाकून ती स्वतःच्या चित्रपटाचा 'हीमॅन' होते. आई होतानाच्या बाहुलीशी खेळतानाच्या तिच्या मुद्रा अप्रतिम आहेत व चापलुस भुमिकेत वीर दास चांगलं काम करतो. त्याचे विनोदाचे टायमिंगही चांगले आहे. साई कबीर श्रीवस्तव यांचे दिग्दर्शन व स्क्रीनप्ले उत्तम आहे. 'हम है अलका सिंग! आय लव्ह पॅशन, फन और गन! 'कडक नाथ, मुर्गा खाया करो सब कुछ कडक रहेगा!' 'मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है जो मंजुरे अलका होता है!' असे सणसणीत डायलॉग, कंगना कानाखाली वाजवल्यागत म्हणते. 'राम नाम सबने राम राम, सुबहकी राम नगद, शामकी राम अडव्हांस!' या डायलॉगमधला कंगनाचा ग्रामीण उत्तरप्रदेशी ढंग अमिताभची आठवण देणार आहे. कधी विनोदाने हसवणारा कधी गुदगुल्या करणार तर कधी राजकारणावर उपहासपूर्ण भाष्य करणारा हा चित्रपट आहे. एकदा जरूर पाहावा असा हा चित्रपट.