जगभरातील काही देशांमध्ये कोव्हिड-19 ची रुग्णसंख्या वाढत असल्याने भारतात चिंतेचं वातावरण आहे.
चीनमध्ये कोव्हिड-19 चा सबव्हेरियंट BF.7 च्या संसर्गात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. भारतातही या व्हेरियंटचे 4 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.
दरम्यान, देशातील कोरोना स्थिती आणि त्यासंदर्भात यंत्रणेची तयारी यांचा आढावा घेण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांचं बैठकांचं सत्र सुरू आहे.
शिवाय, अनेक राज्यांनीही यासंदर्भात आणीबाणीच्या बैठका बोलावल्या. कोरोना संदर्भात सगळेच जण सक्रिय झाले आहेत.
भारतातील कोरोना आकडेवारीबाबत बोलायचं झाल्यास भारत सरकारच्या माय गव्हर्नमेंट या वेबसाईटवरील माहितीनुसार गुरुवारी (22 डिसेंबर) एकूण 1 लाख 25 हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 185 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं.
सध्या देशात एकूण 3402 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. कोरोनामुळे गुरुवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 190 जण यादिवशी बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
लसीकरणाचा विचार केल्यास गुरुवारी देशात 66 हजार 197 नागरिकांना कोरोना लस टोचण्यात आली. यासोबत देशातील एकूण लसीकरणाचा आकडा 2 अब्ज 20 कोटींपेक्षाही पुढे गेला आहे.