जेव्हा बॉबीसाठी राज कपूर यांनी आरके स्टुडियो गहाण ठेवला होता
गुरूवार, 28 सप्टेंबर 2023 (14:19 IST)
-वंदना
ते साल होतं 1973 चं. त्यावेळी नवखे कलाकार घेऊन बनवलेला 'बॉबी' नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता.
यात अभिनेत्री होती डिंपल कपाडिया. तिचं साधं नाव कोणी ऐकलं नव्हतं. चित्रपटाचे दिग्दर्शक राज कपूर यांचा मागचा चित्रपट दणकून आपटला होता.
पण बॉबी प्रदर्शित झाल्यानंतर त्याची लोकप्रियता एवढ्या शिगेला पोहोचली होती की, 'बॉबी बस' नावाच्या विशेष बसेस खेड्यापाड्यातून शहरांच्या दिशेने धावू लागल्या होत्या. ही बस खास चित्रपट दाखवायला लोकांना घेऊन जात होती.
डिंपल कपाडियाने चित्रपटात घातलेला तो पोल्का डॉट ड्रेस 'बॉबी ड्रेस' म्हणून प्रसिद्ध झाला. तर हिरो ऋषी कपूरच्या मोटरसायकलला लोक 'बॉबी मोटरसायकल' म्हणू लागले होते.
या 'बॉबी' चित्रपटाला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. 28 सप्टेंबर 1973 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉबी इतका लोकप्रिय झाला होता की, राजकारणासाठीही चित्रपटाचा वापर करण्यात आला होता. 1977 मध्ये बाबू जगजीवन राम यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर निवडणूक रॅली काढण्याचा निर्णय घेतला.
ते इंदिरा गांधींपासून वेगळे झाले होते. असं म्हटलं जातं की, लोक रॅलीला जाऊ नयेत म्हणून मुद्दाम संध्याकाळी दूरदर्शनवर बॉबी हा चित्रपट दाखविण्यात आला होता. पण तसं घडलं नाही, आणि दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात 'बाबू बीट्स बॉबी' अशी हेडलाईन छापून आली होती.
त्यावेळी हिंदीत परिपक्व प्रेमकथा तयार होत होत्या. पण 'बॉबी' ही कदाचित पहिलीच हिंदी प्रेमकथा होती ज्यात तरुणाईचा उत्साह, बंडखोरी, निरागसता आणि बेफिकीर प्रेम यांचा मिलाफ होता.
चित्रपटासाठी वितरक मिळत नव्हते
मात्र, बॉबीच्या यशामागे मोठा संघर्ष होता. प्रसिद्ध चित्रपट तज्ञ जयप्रकाश चौकसे हे राज कपूर यांचे जिवलग होते. निधनाच्या काही वर्ष आधी त्यांनी बॉबी चित्रपटासाठी राज कपूर यांनी जो संघर्ष केला होता त्याविषयी सांगितलं होतं.
जयप्रकाश चौकसे म्हणाले होते की, "राज कपूर यांच्या ऑफिस मध्ये कायम आर्ची नामक कॉमिक बुक असायची. त्या पुस्तकात एका पात्राला प्रेम होतं. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात की, 'हे तुझं वय आहे का प्रेमात पडायचं? प्रेमात पडण्यासाठी तू खूप लहान आहेस.'
तिथूनच अशा पद्धतीचा चित्रपट तयार करण्याची कल्पना सुचली. 1970 मध्ये राज कपूर यांचा 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट फ्लॉप झाला होता. एका वर्षानंतर राज कपूर निर्मित आणि रणधीर कपूर दिग्दर्शित 'कल आज कल' हा चित्रपटही फ्लॉप झाला. त्याच दरम्यान, राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आईचंही निधन झालं. त्यांच्या जवळचे संगीतकार जयकिशन हे देखील निधन पावले."
हाच तो काळ होता जेव्हा एवढी आव्हानं समोर असताना देखील राज कपूर यांनी चित्रपटाद्वारे एक नवी प्रेमकथा आणण्याचा निर्णय घेतला. पण चित्रपटासाठी पैशांची गरज होती ज्यासाठी हिंदुजा कुटुंब पुढे आलं. त्यावेळी हिंदुजा कुटुंब परदेशात विशेषतः इराणमध्ये हिंदी चित्रपटांचे वितरण करून आपला व्यवसाय वाढवत होते.
जयप्रकाश चौकसे यांच्या म्हणण्यानुसार, "चित्रपट बनवून तयार होता. राजसाहेब चित्रपटासाठी जास्त किंमत मागत होते. तो काळ राजेश खन्नाचा होता. राज कपूर राजेश खन्नाच्या चित्रपटापेक्षा एक लाख जास्त मागत होते. शशी कपूर हे पहिले वितरक होते ज्यांनी दिल्ली आणि उत्तरप्रदेश घेतलं. एक वकील होते, ज्यांनी पंजाबासाठी वितरक म्हणून हक्क घेतले. बाकी चित्रपट कुठेही विकला गेला नाही. चित्रपटात गुंतवणूक केलेल्या हिंदुजा कुटुंबामुळे परिस्थिती कोर्टापर्यंत गेली."
"राज कपूर यांना वाटत होतं की, चित्रपट हिट झाला तर इतर ठिकाणचेही हक्क विकले जातील. पण हिंदुजा यांचं म्हणणं होतं की, केवळ दोन ठिकाणच्या हक्कांमधून पैसे कसे कमावणार.
त्यांनी राज कपूर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात खटला भरला. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी राज कपूर यांनी हिंदुजाचे पैसे परत केले.
इकडेचित्रपटाचा पहिला शो हाऊस ठरला, चित्रपट तुफान वेगाने कमाई करू लागला. चित्रपसृष्टीतील लोक पुन्हा एकदा राज कपूर यांना महान दिग्दर्शक मानू लागले. यात असेही लोक होते जे कधीकाळी राज कपूर दिग्दर्शन विसरलेत म्हणून हिणवत होते."
राज कपूर यांनी आरके स्टुडिओ गहाण ठेवला होता
ऋषी कपूर त्यांच्या 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रात लिहितात, "राज कपूर यांना चित्रपटसृष्टीचं इतकं वेड होतं की ते चित्रपटातून कमावलेले सर्व पैसे चित्रपटातच गुंतवायचे. 'मेरा नाम जोकर' या चित्रपटानंतर त्यांनी आरके स्टुडिओ गहाण ठेवला होता. राज कपूर यांच्याकडे स्वतःचं घरही नव्हतं. बॉबीच्या यशानंतर त्यांनी स्वतःचं घर विकत घेतलं. बॉबीची निर्मिती मला लाँच करण्यासाठी नव्हे तर आरके बॅनर उभारण्यासाठी करण्यात आली होती. हा चित्रपट नायिकेवर केंद्रित होता. जेव्हा डिंपलचा शोध पूर्ण झाला तेव्हा मला आपसूकच नायक म्हणून निवडलं गेलं. डिंपलने लग्न केल्यामुळे मला सर्व श्रेय मिळालं ही दुसरी गोष्ट."
असं म्हणतात की, बॉबी बनवताना इंडस्ट्रीतील मोठे कलाकार जसं की, धर्मेंद्र, प्राण, राजेंद्र कुमार यांनी आरके बॅनर पुन्हा उभा करण्यासाठी कोणतेही पैसे न घेता काम करण्याचं मान्य केलं होतं. पण राज कपूर यांनी सर्वांचे आभार मानले आणि म्हणाले, "यावेळी माझे चित्रपट फ्लॉप झाले आहेत, त्यामुळे मी खालच्या पातळीवर आहे. तुम्ही वरच्या पातळीवर आहात. आपण एकाच पातळीवर आलो की एकत्र काम करू. आणि राज कपूर यांनी ते करूनही दाखवलं."
'बॉबी' प्रदर्शित झाल्यानंतर ऋषी कपूर-डिंपल या जोडगळीने खळबळ उडवून दिली. बॉबी हा केवळ चित्रपट नव्हता तर फॅशन स्टेटमेंटही होता. डिंपलचा तो मिनी स्कर्ट, पोल्का डॉट शर्ट, हॉट पँट, मोठा चष्मा, पार्ट्या... राज कपूर यांनी भारताला एका नव्या जीवनशैलीची ओळख करून दिली होती.
अमृत गंगर हे चित्रपट इतिहासातील तज्ञ आहेत. बीबीसीच्या सहयोगी पत्रकार सुप्रिया सोगळे यांच्याशी बोलताना ते म्हणाले, "बॉबी ब्रागांझा म्हणजेच बॉबीचं आज 50 वर्षांनंतरही आकर्षण आहे.
ही समाजतील वेगवेगळ्या थरातील तरुणांची गोष्ट होती. राजा (ऋषी कपूर) हे हिंदू श्रीमंत कुटुंबातील होते आणि बॉबी ख्रिश्चन कुटुंबातील होती. तिचं कुटुंब मासेमारीवर अवलंबून होतं. हा तो काळ होता जेव्हा देश 1971 च्या युद्धाच्या वातावरणातून बाहेर पडत होता. मेरा नाम जोकर चित्रपट फ्लॉप झाला होता. अशा परिस्थितीत देशाला, तरुणांना एक बदल हवा होता. या वातावरणात बॉबीने येऊन धुमाकूळ घातला."
राजेश खन्ना यांनी ऋषी कपूर यांची अंगठी फेकली
बॉबीचं शूटिंग अंतिम टप्प्यात असताना डिंपल कपाडियाने राजेश खन्नासोबत लग्न केलं.
डिंपल कपाडियाला नायिका म्हणून निवडण्यामागची गोष्ट सांगताना जयप्रकाश चौकसे म्हणाले होते की, "किशन धवन एक चरित्र कलाकार होते. त्यांची पत्नी बुंदी धवन ही राज कपूर यांची पत्नी कृष्णाची मैत्रीण होती. त्यांनी डिंपल कपाडियाचं नाव सुचवलं होतं. आरके स्टुडिओमध्ये डिंपलचे सीन्स स्क्रिप्टसह अजूनही ठेवले आहेत.
ते पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की ही तीच डिंपल कपाडिया आहे. त्यावेळी डिंपल जेमतेम 15 किंवा 16 वर्षांची असावी."
हा चित्रपट 1973 मध्ये म्हणजेच 20 व्या शतकात प्रदर्शित झाला. बॉबीच्या एका दृश्यात डिंपल म्हणते, मी 21 व्या शतकातील मुलगी आहे, मला कोणी हात लावू शकत नाही. तिला मध्येच हटकून ऋषी कपूर म्हणतात अजूनही 20 वं शतक सुरू आहे. यावर डिंपल म्हणते, 20 वं शतक म्हातारं झालं आणि मला माझं संरक्षण कसं करायचं माहिती आहे. डिंपल कपाडिया तिच्या खऱ्या आयुष्यात देखील याच ढंगात जगली आहे.
खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रात ऋषी कपूर लिहितात, "डिंपल आमच्या घराचा एक भाग बनली होती. मी राज कपूर यांना पापा म्हणायचो आणि डिंपलही त्यांना पापा म्हणायची. नंतर मी त्यांना राज जी म्हणू लागलो पण डिंपल शेवटपर्यंत त्यांना पापा म्हणत राहिली."
"बॉबीच्या काळात मी यास्मिनसोबत नात्यात होतो. तिने मला अंगठी दिली होती. पण शूटिंगदरम्यान अनेकदा डिंपल ती अंगठी काढून स्वतः घालायची. राजेश खन्ना यांनी डिंपलला मागणी घातल्यावर तिने अंगठी काढून समुद्रात फेकली. माध्यमांमध्ये याविषयी बरीच चर्चा झाली. त्यानंतर आमच्याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध झाल्या. पण आमच्यात तसं काही नव्हतं. पण नायिका म्हणून मला तिच्याविषयी काळजी होती.
अमृत गंगर सांगतात, "राज कपूरना जे अपेक्षित होतं ते ऋषी आणि डिंपलने पडद्यावर उत्तम पद्धतीने उतरवलं. चित्रपटात ऋषी कपूर आणि डिंपलची पहिली भेट त्याच क्षणाची पुनरावृत्ती होती जेव्हा राज कपूर आणि नर्गिस पहिल्यांदा भेटले होते. ख्वाजा अहमद अब्बास यांनी एक दुःखद शेवट लिहिला होता जो नंतर आनंदी शेवटात बदलण्यात आला."
जेव्हा राज कपूर यांनी लतादीदींच्या वाटेचं गाणं गायलं
बॉबीच्या यशात आनंद बक्षी यांची गाणी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताचा मोठा वाटा आहे. राज कपूर यांनी ऋषी कपूरसाठी शैलेंद्र सिंग हा नवा गायक आणला.
शैलेंद्र सिंह यांनी काही वर्षांपूर्वी दुबईहून फोनवर बॉबीच्या आठवणी सांगितल्या होत्या.
जुन्या दिवसांची आठवण सांगताना शैलेंद्र म्हणाले होते, "राज कपूर यांना नवा आवाज हवा होता. ते म्हणायचे की हिरो हा 16 वर्षांचा मुलगा आहे, त्यामुळे गायकही त्याच वयाचा असावा. अशा प्रकारे बॉबी चित्रपटातून माझ्या करिअरची सुरुवात झाली. बॉबी चित्रपटाचा शुभ मुहूर्त माझ्या 'मैं शायर तो नही' या गाण्याने करण्यात आला.
बॉबी आणि राज कपूर यांची आठवण करून देताना शैलेंद्र सिंह म्हणाले, "राज कपूर यांना गाणी आणि संगीताची उत्तम जाण होती. एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लताजी आल्या नव्हत्या. यावेळी मी गाण्यात माझ्या वाट्याचे बोल गात होतो तर लताजींच्या वाट्याचे बोल राज कपूर गात होते. त्यांना सगळं गाणं लक्षात होतं."
प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा
बॉबीबद्दल बोलायचं तर, त्यात दाखवलेली प्रेमकथा आणि राज कपूरची यांची कथा सांगण्याची पद्धत या दोन्ही गोष्टींनी चित्रपटाच्या यशात मुख्य भूमिका बजावली.
चित्रपटात सहाय्यक पात्र असलेल्या दुर्गा खोटे, मच्छिमाराच्या भूमिकेतील जॅक ब्रागांझा उर्फ प्रेम नाथ, ऋषी कपूरच्या गर्विष्ठ वडिलांच्या भूमिकेतील प्राण आणि खलनायक प्रेम चोप्रा यांनीही तितकीच महत्वाची भूमिका बजावली.
प्रेम चोप्रा यांच्या पत्नी आणि राज कपूर यांची पत्नी, दोघी बहिणी होत्या. या चित्रपटात प्रेम चोप्रा यांनी एक छोटासा कॅमिओ केला आहे. चित्रपटाच्या शेवटच्या भागात ते येतात. घरातून पळून गेलेल्या बॉबीचा हात पकडताना ते म्हणतात, "प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा."
संजीव कुमार (कोशिश), अमिताभ बच्चन (जंजीर), धर्मेंद्र (यादों की बारात) आणि राजेश खन्ना (दाग) यांच्यामधून ऋषी कपूर यांना बॉबीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रात ऋषी कपूर लिहितात की, "पैशाच्या बदल्यात मला कोणीतरी पुरस्काराची ऑफर दिली होती. मी ही यासाठी तयार होतो. मला आज याचं वाईट वाटतं. त्यावेळी मी फक्त 20-21 वर्षांचा होतो. बॉबीमुळे मी अचानक स्टार झालो. ते पैसे प्रत्यक्षात आयोजकांपर्यंत पोहोचले की नाही हे मला माहीत नाही. मात्र मी त्याला 30 हजार रुपये दिले होते."
विशेष म्हणजे शैलेंद्र सिंह यांनीही त्यांच्या मुलाखतीत मला असंच सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, "मला बॉबीसाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार ऑफर करण्यात आला होता, पण मी नकार दिला. मी कारण सांगू शकत नाही. भारतात पुरस्कारांना महत्त्व नाही, चांगल्या गाण्यांना पुरस्कार मिळत नाहीत.
गाण्यांव्यतिरिक्त बॉबीची मजबूत बाजू म्हणजे त्याची पटकथा. जी पी साठे यांनी ख्वाजा अहमद अब्बास यांच्यासोबत ही पटकथा लिहिली होती. त्यावेळी अब्बास साहेब 58 वर्षांचे होते. बॉबीचा नॉस्टॅल्जिया अजूनही कायम आहे, तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दिसत असतो.
उदाहरणार्थ, काश्मीरमध्ये ज्या हॉटेलमध्ये 'अंदर से कोई बहर ना आ सके' हे गाणं चित्रित झालं होतं ती खोली आजही बॉबी हटच्या नावाने प्रसिद्ध आहे आणि लोक ती पाहण्यासाठी येतात. ऋषी कपूर एकदा सलूनमध्ये केस कापत होते. एका रशियन चाहत्याने त्यांना ओळखलं आणि त्याच्या फोनवरून मैं शायर तो नहीं है गाणं वाजवलं.
अडथळे पार करणारी, गरिबी आणि श्रीमंती लांघून प्रेम करणारी, फॅशन स्टेटमेंट देणारी ही प्रेमकथा आजही सर्वोत्कृष्ट टीन एज लव स्टोरी म्हणून लोकांच्या स्मरणात आहे.