अभिनेता शाहरुख खानच्या सासूबाई सविता छिब्बर यांच्या अलिबागमध्ये असलेल्या बंगल्याला तीन कोटींचा दंड सुनावण्यात आला आहे. भाडेकरार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप छिब्बर यांच्यावर आहे. शाहरुखच्या सासूबाई अर्थात निर्माती गौरी खान यांच्या मातोश्री सविता छिब्बर आणि बहीण नमिता छिब्बर या ‘देजाऊ फार्म्स प्रा. लि.’च्या संचालिका आहेत. अलिबागमधील थळ परिसरात छिब्बर मायलेकींच्या मालकीचं आलिशान फार्महाऊस आहे. 2008 मध्ये हा बंगला बांधण्यात आला होता.
प्लॉट खरेदी करताना मूळ जागेवर असलेलं फार्महाऊस तोडून त्याजागी नवीन फार्महाऊस बांधण्यात आलं होतं. हे ‘बॉम्बे टेनन्सी एक्ट’ म्हणजेच भाडेकरार कायद्याच्या कलम 63 चं उल्लंघन असल्याचं नोटिशीत स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार फार्महाऊसच्या मालकांना समन्स बजावण्यात आलं. त्यानंतर 20 जानेवारी 2020 रोजी काढलेल्या ऑर्डरमध्ये 3 कोटी 9 लाख रुपयांचा दंड जमा करण्याचे आदेश देण्यात आले.