समीर वानखेडे कोण आहेत, त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा आहे?

गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (17:14 IST)
- मयांक भागवत
कस्टम विभागातील 'अप-राईट' अधिकारी, बॉलिवुड कलाकारांवर धडक कारवाई करणारे अधिकारी अशी ज्यांची ओळख आहे ते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बातमी मध्ये आहेत.
 
त्यांच्यावर महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विविध आरोप केल्यानंतर त्यांच्यावर विभागातर्फे चौकशी देखील लावण्यात आली आहे. यामुळे समीर वानखेडे कोण आहेत याची उत्सुकता वाचकांना आहे.
 
आर्यन खानला अटक करणारे NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी NCBवर खंडणी वसूल करण्याचे आरोप केलेत.
 
या प्रकरणी आता समीर वानखेडे आणि इतर अधिकाऱ्यांची NCBने विभागांतर्गत चौकशी सुरू केलीये.
 
आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून वानखेडेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई होऊ नये असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय.
 
कोण आहेत समीर वानखेडे?
समीर वानखेडे 2008च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत येण्याआधी 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये (Central Police Organization) रूजू झाले होते.
 
CPO मध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग, सीबीआय (CBI), नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (NCRB), नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजेंसी (NIA) यांसारखे विविध विभाग येतात.
 
त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास झाल्यानंतर समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले.
 
भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहायक आयुक्त (Assistant Commissioner Customs) म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं.
 
त्यानंतर महसूल गुप्तचर संचलनालय (DRI) आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या नॅशनल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सीतही (NIA) त्यांनी काम केलंय.
 
ऑगस्ट 2020 मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याच वर्षी वानखेडे यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ठ तपासासाठीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
 
समीर वानखेडे मूळचे कुठले आहेत?
समीर वानखेडे यांचं कुटुंब मूळचं महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातलं आहे. रिसोड तालुक्यातील भरुणतोफा हे गाव वानखेडेंच मूळ गाव.
 
समीर वानखेडे यांच्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. समीर वानखेडेंचे काका शंकरराव वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना "समीरच्या वडीलांचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे," अशी माहिती दिलीये.
 
समीर वानखेडे यांचे वडील महाराष्ट्र सरकारच्या अबकारी (State Excise) विभागात कामाला होते. साल 2007 मध्ये अबकारी खात्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडेंचं शिक्षण मुंबईत झालं. त्यांचे वडील 1970 च्या दशकात मुंबईत कामानिमित्त आले होते.
समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम?
गेल्याकाही दिवसांपासून सातत्याने समीर वानखेडे हिंदू आहेत की मुसलमान याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले आहेत.
 
काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जन्माचा दाखला ट्विटरवर शेअर केला. त्याचं खरं नाव 'समीर दाऊद वानखेडे' असं असल्याचा दावा मलिक यांनी केलाय.
 
तर या आरोपांना उत्तर देताना बीबीसीशी बोलताना समीर वानखेडे म्हणाले, "मी हिंदू आहे. माझे वडीलही हिंदू आहेत. माझी आई मुस्लीम होती. पण आईवडिलांनी दोघांनी धर्म बदलला नाही."
 
समीर वानखेडेंच्या आईचं नाव झहीदा असून 2015 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. "मी धर्मनिरपेक्ष कुटुंबातून येतो," असं समीर वानखेडे बीबीसीशी बोलताना सांगतात.
 
समीर वानखेडेंवर होणाऱ्या आरोपांचं खंडन करण्यासाठी त्यांचे वडीलही प्रसारमाध्यमांसमोर आले. ते म्हणाले, "माझं नाव दाऊद नाही. माझं नाव ज्ञानदेव कचरुजी वानखेडे आहे."
 
बुधवारी (27 ऑक्टोबर) ला समीर वानखेडेंचा निकाहनामा नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला. या निकाहनाम्यात समीर वानखेडेंचं नाव 'समीर दाऊद वानखेडे' असं लिहीण्यात आलंय.
 
मग निकाहनाम्यात नाव दाऊद का? यावर बोलताने ते म्हणतात, "प्रेमाने माझी पत्नी मला दाऊद म्हणून हाक मारायची. त्यांनी तसं नाव ठेवलं असेल."
 
2006 मध्ये समीर वानखेडे यांचं लग्न डॅा. शबाना कुरैशी यांच्यासोबत झालं होतं. पण 10 वर्षानंतर त्यांनी 2016 साली घटस्फोट घेतला होता.
 
नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर समीर वानखेडे माध्यमांशी बोलण्यास तयार नाहीत. पण त्यांचे निकटवर्तीय नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात,
 
"समीरने मुस्लीम पद्धतीने लग्न करावं अशी त्याच्या आईची इच्छा होती. त्यानुसार समीरने लग्न केलं. म्हणून तो मुसलमान होत नाही. तो हिंदूच आहे."
 
ते पुढे सांगतात, "समीरचं आंतरधर्मीय लग्न विशेष विवाह कायद्यानुसार रजिस्टर करण्यात आलं. त्याचा घटस्फोटही रजिस्टर करण्यात आला आहे."
 
समीर वानखेडेंचं बॉलिवुड कनेक्शन काय?
समीर वानखेडेंवर नेहमीच बॉलीवूडला टार्गेट केल्याचा आरोप केला जातो. पण त्यांची दुसरी पत्नी क्रांती रेडकर या मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत.
 
2017 साली समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचं लग्न झालं.
 
बॉलिवूड-ड्रग्ज आणि NCBची कारवाई
बॉलिवूडविरोधात ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मोहीम उघडल्यामुळे समीर वानखेडे पहिल्यांदा चर्चेत आले ते 2020 मध्ये.
 
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन एनसीबीच्या रडारवर आलं. बॉलिवूड आणि ड्रग्जची चर्चा सुरू असतानाच सुशांतची गर्लफेंड रिया चक्रवर्तीवर ड्रग्जप्रकरणी आरोप झाले.
 
एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली. त्यानंतर समीर वानखेडे यांनी आपला मोर्चा बॉलिवुडकडे वळवला. दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकूलप्रित सिंह आणि श्रद्धा कपूरची एनसीबीने कसून चौकशी केली. तर, प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज सेवन प्रकरणी अटक करण्यात आली होती.
 
बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीने चौकशी केली. तर, टीव्ही सिरीयलची अभिनेत्री प्रतिका चौहानवर कारवाई करण्यात आली.
 
ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे म्हणतात, "गेल्यावर्षभरात एनसीबीने अनेक कारवाया केल्या. या कारवाया मीडियामध्ये झळकल्या. पण केस पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे."
 
नार्कोटिक्स कंट्रोल विभागाने ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयालाही अटक केली होती.
 
बीबीसीशी बोलताना समीर वानखेडे म्हणतात, "गेल्या वर्षभरात एनसीबीने मुंबईत 94 आणि गोव्यात 12 कारवाया केल्या आहेत. यामध्ये ड्रग्ज रॅकेटच्या 12 गॅंग पकडण्यात आल्या आहेत."
 
समीर वानखेडेंवर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवुडला टार्गेट केल्याचे आरोप झाले. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी त्यांच्यावर खंडणीचा आरोप करण्यात आला.
 
समीर वानखेडेंवर करण्यात येणाऱ्या आरोपांबद्दल बोलताना त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर म्हणतात, "समीर वानखेडे खंडणीवर विश्वास ठेवत नाहीत. ज्या व्यक्तीने विविध कारवायातून सरकारला कोट्यावधी रूपये मिळवून दिले. त्याला खंडणीची काय गरज?"
बॉलिवुडकडून टॅक्स वसूली
समीन वानखेडे आणि वाद हे नातं तसं जुनचं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात कार्यरत असतानाही त्यांच्यावर बॉलिवुडला टार्गेट करण्याचे आरोप झाले होते.
 
एअरपोर्टवर सहायक आयुक्त असताना वानखेडे यांनी परदेशातून येणाऱ्या बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींवर कस्टम ड्युटी टाळल्याप्रकरणी कारवाई सुरू केली.
 
शाहरुख खानला 2011 मध्ये समीर वानखेडे यांच्या टीमने मुंबई एअरपोर्टवर थांबवलं. शाहरुख लंडनवरून भारतात परतत होता. परदेशातून आणलेल्या वस्तूंवर कर भरल्यानंतर शाहरूखला सोडण्यात आलं.
 
त्यानंतर मिनिषा लांबा, गायक मिका सिंग यांना कर चुकवल्याप्रकरणी समीर वानखेडे यांनी दंड ठोठावला होता.
 
कस्टम विभागात कार्यरत असताना समीर त्यांनी बॉलिवुड सेलेब्रिटींसह अनेकांवर कर चुकवल्याप्रकरणी कारवाई केली होती, असं त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर सांगतात.
 
"समीर यांनी आजवर कोट्यवधींचं सोनं पकडून दिलं. नाहीतर तेव्हाच सेटलमेंट केली असती," असं क्रांती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय.
 
2011 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपची ट्रॉफी मुंबई एअरपोर्टवर आली होती. ही ट्रॉफी सोन्याची होती. कस्टम ड्युटी भरल्यानंतरच ही ट्रॉफी सोडण्यात आली. समीर वानखेडे त्यावेळी कस्टम विभागात कार्यरत होते.
 
तुळशीदास भोईटे सांगतात, "कस्टममध्ये असताना बॉलिवुडवर कारवाई केली. आता एनसीबीमध्ये पुन्हा बॉलिवुड त्यांच्या टार्गेटवर आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होणं सहजिकच आहे."
 
समीर वानखेडेंना ओळखणारे काय म्हणतात?
समीर वानखेडेंसोबत काम केलेले अनेक अधिकारी सद्यस्थितीत सरकारी सेवेत कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये दोन मतप्रवाह ऐकायला मिळतात.
 
नाव न घेण्याच्या अटीवर समीर वानखेडेंसोबत कस्टम विभागात काम केलेले अधिकारी सांगतात, "समीर वानखेडेंना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडतं. वादात चर्चेत सतत रहायला आवडतं."
 
समीर वानखेडेंच्या सहकाऱ्यांमध्ये त्यांची प्रतिमा उद्धट, हेकेखोर आणि आक्रमक अधिकारी अशी आहे.
 
समीर वानखेडेंचे बॅचमेट नाव न घेण्याच्या अटीवर म्हणाले, "समीरवर आरोप खूप करण्यात आलेत. या आरोपात तथ्य असेलही. पण त्याच्या कारवाईमुळे कायद्याला न जुमानणारे बॉलिवुड कलाकार कायदा पाळू लागले. हे सत्य नाकारता येणार नाही.
 
"समीर वानखेडेंच्या कारवायांनंतर बॉलिवुड कलाकार टॅक्स देत आहेत अशी चर्चा व्हायची. आता ते लोक वानखेडेंच्या दबदब्यामुळे कर देऊ लागले की कारवाईनंतर होणाऱ्या बदनामीला भिऊन कर देऊ लागले हे सांगणं कठीण आहे, पण ते कर देऊ लागले ही गोष्ट खरी आहे," असं ते अधिकारी बीबीसीला म्हणाले.
 
मुक्त पत्रकार धर्मेश ठक्कर समीर वानखेडेंना 2008 पासून ओळखतात. ते म्हणाले, "समीर वानखेडे एक नो-नॉन्सेन्स, अप-राईट अधिकारी आहेत. कस्टममध्ये असताना अनेक प्रकरणात त्यांची भेट झालीये. तो कायद्याने वागणारा अधिकारी आहे."
 
समीर वानखेडेंना ओळखणारे वरिष्ठ IRS अधिकारी त्यांना 'अप-राईट' म्हणून ओळखतात.
 
एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "केसचा फॉलोअप आणि इंटेलिजन्स लीडवर काम करण्यात समीरचा हातखंडा आहे. आम्ही अनेक लीड्सवर काम केलंय. पण सद्यस्थितीत मीडियाकडून त्याच्याविरोधात अन्याय केला जातोय."
 
तुळशीदास भोईटे बाबत सांगतात, "समीर वानखेडेंची प्रतिमा एक चांगला अधिकारी म्हणून होती. पण जेव्हा प्रसिद्धीची नशा चढते तेव्हा अडचणी सुरू होतात. तसंच वानखेडेंच्या बाबतीत होताना दिसून येतंय."
 
सुशांत प्रकरणात त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले नाहीत. पण, आता मनिष भानुशाली आणि किरण गोसावी यांच्यासारख्यांना साक्षीदार केल्याने समीर वानखेडेंच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती