सरदारगृहः लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास जिथं घेतला त्या सरदारगृहाचं पुढे काय झालं?

सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (10:27 IST)
- ओंकार करंबेळकर
मुंबईतल्या प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटचा परिसर... सतत धावत्या रस्त्याच्या एका बाजूला तुम्हाला एक पिवळसर रंगाची इमारत लागते. ही इमारत मुंबईच्या इतर इमारतींप्रमाणेच गजबजलेली आहे. त्यात खाली असलेले हजारो लोक, तितकी दुकानं, विक्रेते यामुळे ती अगदीच इतर इमारतींसारखी वाटते.
 
सगळीकडे पडलेला कचरा, पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती यातून तुम्हाला लिफ्ट शोधावी लागते. ती मिळाली नाही तर तुम्हाला जिन्याचा वापर करावा लागतो.
 
सतत काहीतरी खोके, गठ्ठे वाहाणाऱ्या मजुरांच्या गर्दीतून तुम्ही चार मजले वर चढून जाता तेव्हा एका खोलीसमोर थांबायला होतं. मग कळतं ही आहे लोकमान्य टिळकांची खोली. आणि हा पत्ता आहे खोली नं 198, सरदारगृह.
 
गेल्या शंभर वर्षांहून अधिकचा काळ ही इमारत आणि हा सगळा परिसर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पण काळाच्या ओघात आणि शहराच्या नव्या वेगात त्याच्याकडे पाहायला कुणालाच वेळ नाही.
 
काळबादेवीला असणारी ही सरदारगृह इमारत भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील महत्त्वाची इमारत आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी तसेच अनेक महान नेत्यांचे पाय या इमारतीला लागले आहेत.
 
1 ऑगस्ट 1920 रोजी याच इमारतीमध्ये लोकमान्य टिळकांची प्राणज्योत मालवली. ज्या नेत्यानं अनेक वर्षं स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं, देशासाठी कारावास भोगला, आपल्या विचारांतून, लेखणीतून भारतीय समाजात असंतोषाची ठिणगी पेटवली त्या नेत्याने अखेरचा श्वास इथंच घेतला.
 
लोकमान्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारो स्त्री-पुरुषांनी 1 ऑगस्ट 1920 ला इथं गर्दी केली होती. स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या नेत्यांसह अनेक लोक इथं उपस्थित होते. गिरगाव चौपाटीवर टिळकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
 
पण इमारतीच्या प्रवेशद्वारावर टिळकांचा अर्धपुतळा त्यांचं एक वाक्य कोरलेली पाटी या पलिकडे बाहेरुन काहीही समजत नाही. जर चालताना तुमचं या पाटीकडे आणि पुतळ्याकडे लक्ष गेलंच तर ते तुमच्या लक्षात येईल. त्यातही आत काम करणाऱ्या, वर-खाली जिने उतरणाऱ्या लोकांना टिळकांच्या खोलीबद्दल माहिती असेलच असे नाही.
 
सरदारगृह इमारतीच्या या अवस्थेबद्दल अनेकदा चर्चाही होत असते. तिचा जीर्णोद्धार व्हावा किंवा तिथं टिळकांचं स्मारक व्हावं असाही विचार अधूनमधून येत असतो पण त्यावर फारसे काही होत नाही.
 
या जागी सध्या केसरी वर्तमानपत्राचं कार्यालय आहे. तेथे लोकमान्य टिळकांच्या काही वस्तू आणि छायाचित्रेही लावण्यात आली आहेत.
 
काही वर्षांपूर्वी लेखक सुधींद्र कुलकर्णी यांनी इथं लोकमान्य टिळकांचं यथोचित स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करावेत अशी राज्य सरकारला विनंती केली होती. मात्र त्यावरही पुढे प्रगती झालेली नाही.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मुंबईत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित अनेक स्थळं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सरदारगृह आहे. ते नीट जपलं पाहिजे, ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. मुंबईच्या या इमारतीत लोकमान्यांचं निधन होऊनही त्यांच्या स्मृतिची योग्य जपणूक झालेली नाही. ही त्यांची घोर उपेक्षाच आहे. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. राज्यपालांना भेटलो होतो मात्र त्यापुढे सरकारने अजूनही काही पावले उचललेली नसल्याचं दिसतं. लोकमान्यांच्या या उपेक्षेची मी निंदा करतो."
 
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबईस जाणार्‍या प्रत्येकास सरदारगृह हे नाव परिचित होतं. एजी नुरानी म्हणाले होते की, 1916 सालच्या सुमारास भारतात राष्ट्रीय चळवळीची केंद्रे दोन होती - एक, लोकमान्य टिळकांची सरदारगृहातली खोली, आणि दोन, बॅरिस्टर जिनांचे बॉम्बे हायकोर्टातील चेंबर.
 
महाराष्ट्रातले आणि हिंदुस्थानातले बहुतेक प्रमुख पुढारी, मोठे अंमलदार, धनिक, व्यापारी, संस्थानिक, सरदार या सर्वांचे उतरण्याचे ठिकाण सरदारगृह होते. हे बडे लोक तिथे उतरत असले तरी मध्यमवर्गातल्या बहुसंख्य कुटुंबांची मुंबईत राहण्याची ती हक्काची जागा होती.
 
सरदारगृह कोणी स्थापन केलं?
सरदारगृहाची स्थापना विश्वनाथ केशव साळवेकर यांनी केली. इतिहास अभ्यासक चिन्मय दामले यांनी साळवेकर यांच्या जीवनप्रवासाचा आणि या भोजनगृहाच्या वाटचालीचा अभ्यास केला आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, " साळवेकरांचा जन्म 2 सप्टेंबर 1862 साली वाई इथे झाला. शिक्षण आणि व्यवसायासाठी ते पुण्यात राहात होते.
 
1890 च्या सुमारास, परगावाहून येणार्‍यांसाठी एकही भोजनगृह किंवा गेस्टहाऊस नव्हतं.
 
काही खाणावळी होत्या, पण तिथली व्यवस्था फार काही बरी नसे. शिवाय तिथे महिन्याचे पैसे देणार्‍यालाच प्रवेश असे.
 
साळवेकर यांनी 1892 साली बुधवार पेठेतल्या माणकेश्वराच्या वाड्यात, म्हणजे आज जिथे वसंत टॉकिज आहे, 'अन्नपूर्णागृह' हे भोजनगृह सुरू केलं. पुणे शहरात त्यावेळी इतर दुसरे भोजनगृह नव्हते.
 
जेवणाबरोबरच राहण्याची सोय करावी, असं साधारण दोन वर्षांनंतर त्यांना वाटलं असावं. 1894 सालच्या सुमारास त्यांनी अन्नपूर्णागृहात राहण्याची सोयही उपलब्ध करून दिली. पुणे शहरातलं हे पहिलं भोजनवसतिगृह होतं.
 
इतिहासाचार्य राजवाडे यांचंही अन्नपूर्णागृह हे त्यांचं आवडतं खाद्यगृह होतं. तिथे ते सकाळ-संध्याकाळ जेवायला येत.
 
'काळ'कर्ते श्री. शिवराम महादेव परांजपे हे राजवाड्यांचे मित्र. तेही अन्नपूर्णागृहात जेवायला येत आणि राजवाड्यांना भाषांतराच्या कामी मदत करत. प्रो. चिं. ग. भानू आणि न. चिं. केळकर हेदेखील अन्नपूर्णागृहात जेवायला येत."
 
सरदारगृह मुंबईत आलं तेव्हा...
पुण्यातल्या भोजनगृहानंतर साळवेकर यांनी मुंबईत एक शाखा सुरू करण्याचे निश्चित केलं. त्यानंतर त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला.
 
चिन्मय दामले सांगतात, "साळवेकरांनी मुंबईला भोजनवसतिगृह सुरू केलं. या नव्या भोजनवसतिगृहाचं त्यांनी सरदारगृह असं नाव ठेवलं. पुण्यातल्या अन्नपूर्णागृहाचं नावही त्यांनी मुंबईतलं सरदारगृह सुरू व्हायच्या सहा महिने आधी सरदारगृह असं बदललं.
 
1896 सालच्या डिसेंबर महिन्यात केसरीत सरदारगृहाची जाहिरात प्रकाशित झाली होती. या जाहिरातीत मुंबईत लवकरच सरदारगृह सुरू होणार असून तिथे आणि पुण्यात परीक्षेसाठी येणार्‍या विद्यार्थ्यांच्या राहण्याजेवण्याची सोय केल्याचं लिहिलं आहे.
 
मुंबईतलं सरदारगृह 1897 साली ग्रॅण्ट रोडवर टोपीवाल्याच्या चाळीजवळ सुरू झालं. उत्तम स्वच्छता आणि जेवण यांच्यामुळे लवकरच तिथे पाहुण्यांची वर्दळ वाढली आणि जागा अपुरी पडायला लागली.
 
कुटुंबासह राहता येईल अशी मराठी भोजनवसतिगृहं त्यावेळी मुंबईत अगदीच कमी होती, त्यामुळे आणि साळवेकरांच्या अतिथ्यशील स्वभावामुळे सहकुटुंब राहायला आणि जेवायला सरदारगृह हे हक्काचं ठिकाण बनलं.
 
1902 साली बोरीबंदरजवळच्या सीताराम बिल्डिंगच्या प्रशस्त जागेत सरदारगृहानं आपलं बस्तान हलवलं. पण पुढच्या एकदोन वर्षांतच व्यवसाय इतका वाढला की ही जागाही अपुरी पडायला लागली.
 
साळवेकरांनी मग जवळच असलेली एक रिकामी जागा विकत घेतली आणि तिथे स्वत:ची इमारत बांधली. 1912 साली सरदारगृह स्वत:च्या मालकीच्या वास्तूत आलं. या नव्या जागेत राजेरजवाडे, सरदार, इनामदार, राजकीय नेते आणि कार्यकर्ते उतरू लागले."
 
शाहू महाराज ते लोकमान्य टिळक
सरदारगृहामध्ये लोकमान्यांचे एक नवाथे नावाचे स्नेही राहायचे त्यामुळे टिळकांचा या भोजनगृहाशी संबंध आला.
 
याबद्दल चिन्मय दामले सांगतात, "नव्या जागेतलं सरदारगृह प्रशस्त आणि देखणं असावं यासाठी मदत केली ती कोल्हापूरच्या छत्रपती शाहूमहाराजांनी. मुंबईत आले की ते सरदारगृहातच उतरत. साळवेकरांच्या उद्यमशीलतेचं त्यांना कौतुक होतं.
 
शाहूमहाराजांमुळे महाराष्ट्रातले इतर संस्थानिक, उद्योजक, नेते तिथे उतरू लागले. सोवळं पाळणारे आणि सुधारकी पद्धतीनं राहणारे यांपैकी कोणाचीही गैरसोय सरदारगृहात होत नव्हती. एवढंच नव्हे, तर पाहुण्यांपैकी कोणी आजारी पडल्यास साळवेकर स्वत; लक्ष घालून शुश्रुशा करत, तब्येत पूर्ण बरी झाल्याशिवाय पाहुण्यास परत जाऊ देत नसत.
 
शाहू महाराजांप्रमाणे औंधचे भवानराव पंतप्रतिनिधी, बॅ. विठ्ठलभाई पटेल, काकासाहेब गाडगीळही या भोजनगृहात उतरत असत.
 
1898 सालची गोष्ट. महाडचे नवाथे सरदारगृहात राहत असताना आजारी पडले. नवाथे हे टिळकांचे स्नेही होते. नवाथ्यांच्या तब्येतीचं कळल्यावर टिळक त्यांना भेटायला सरदारगृहात गेले. तिथे नवाथ्यांची ठेवलेली बडदास्त बघून टिळक म्हणाले, 'खरोखर कोणाला मरायचे असले तरी त्याने सरदारगृहात येऊन मरावे'.
 
दुर्दैव हे की, नवाथ्यांचा मृत्यू त्या आजारपणात सरदारगृहात झाला. टिळकांचं देहावसानही 1 ऑगस्ट, 1920 रोजी सरदारगृहात झालं."
 
टिळक सरदारगृहात कसे आले?
लोकमान्य टिळकांनी मुंबई मुक्कामात सरदारगृहातच राहाण्याचा निर्णय कसा घेतला याबद्दल दामले सांगतात,
 
"कामानिमित्त टिळकांचं मुंबईत सतत जाणंयेणं असे. 1907 सालापर्यंत ते दाजीसाहेब खर्‍यांकडे आंग्रेवाडीत उतरत. राजद्रोहाच्या आरोपावरून 1898 साली टिळकांवर पहिला खटला दाखल झाला, तेव्हा त्यांना खर्‍यांच्या घरीच अटक झाली होती.
 
1907 सालच्या सुरत कॉंग्रेसनंतर मात्र टिळकांना खर्‍यांच्या घरी उतरणं प्रशस्त वाटेनासं झालं कारण भेटायला येणार्‍यांच्या गर्दीचा खर्‍यांच्या कुटुंबीयांना त्रास होतो, हे टिळकांच्या लक्षात आलं.
 
एकदा साळवेकर खर्‍यांच्या घरी टिळकांना भेटले आणि त्यांनी सरदारगृहात राहावं, अशी विनंती केली.
 
सीताराम बिल्डिंगमध्ये असलेल्या सरदारगृहात तेव्हापासून टिळक उतरू लागले. टिळकांचं ते मुंबईतलं घर बनलं. पुढे नव्या इमारतीत साळवेकरांनी टिळकांसाठी चौथ्या मजल्यावर खास दोन खोल्या बांधून घेतल्या.
 
खरं म्हणजे त्या काळात टिळकांशी संबंध राखणं हे व्यवसायाच्या दृष्टीनं तसं जिकीरीचं होतं.
 
टिळकांशी जवळीक असणारा प्रत्येकजण राज्यकर्त्यांच्या रोषास पात्र ठरत असे. पण साळवेकरांनी या कशाची तमा बाळगली नाही. टिळकांना भेटायला येणार्‍या सर्व पुढार्‍यांचं सरदारगृहानं कायम स्वागतच केलं.
 
1908 साली टिळकांवर राजद्रोहाचा जो दुसरा खटला भरला गेला, त्यावेळी त्यांना सरदारगृहातूनच अटक करण्यात आली. त्यानंतर सहा वर्षं टिळक मंडालेच्या तुरुंगात होते.
 
या काळात सरदारगृहाचं नव्या इमारतीत स्थलांतर झालं. टिळक तुरुंगात असले तरी या नव्या इमारतीत टिळकांसाठी साळवेकरांनी सर्वांत वरच्या चौथ्या मजल्यावर दोन प्रशस्त खोल्या बांधून घेतल्या.
 
या खोल्या फक्त टिळक आले की उघडल्या जात. टिळकांवर राजद्रोहाचा तिसरा खटला दाखल झाला, त्यावेळी त्यांचं वकीलपत्र बॅ. जीनांनी घेतलं होतं.
 
टिळक आणि जीना सरदारगृहातच भेटत. पुढे 1918 साली गांधी आणि टिळक यांची भेटही सरदारगृहात झाली."
 
देहावसान
टिळकांचा अखेरचा मुक्काम सरदारगृहात झाला तो 1920 च्या 13 जुलैपासून 1 ऑगस्टपर्यंत.
 
जगन्नाथमहाराजांच्या इस्टेटीचा खटला बावीस-तेवीस वर्षं सुरू होता.
 
21 जुलैला खटल्याचा निकाल टिळकांच्या बाजूनं लागला.
 
जगन्नाथमहाराज हे बाबामहाराज पंडितांच्या इस्टेटीचे कायदेशीर वारस ठरले.
 
टिळकांच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं.
 
त्याच दिवशी त्यांना ताप यायला सुरुवात झाली आणि त्यातून ते उठले नाहीत.
 
1 ऑगस्टला रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी त्यांचं निधन झालं.
 
या सतरा-अठरा दिवसांच्या मुक्कामात गांधीजी त्यांना दोनदा भेटायला आले होते.
 
पहिल्यांदा आले तेव्हा खिलाफत चळवळीबद्दल, हिंदू-मुसलमान ऐक्याबद्दल दोघांची चर्चा झाली.
 
दुसर्‍यांदा आले तेव्हा टिळक शुद्धीवर नव्हते. त्यांना फक्त नमस्कार करून गांधीजी निघून गेले.
 
विश्वनाथ साळवेकरांनी शेवटच्या दिवसांत संन्यासाश्रम पत्करला होता. त्यांना श्रीशंकराचार्यांनी 'धर्मभूषण' ही पदवी दिली होती. साळवेकरांचं देहावसान 8 सप्टेंबर 1927 ला झालं.
 
सरदारगृहाबद्दल बोलताना नागरी इतिहासाचे अभ्यासक आणि खाकी टूर्सचे संचालक भरत गोठोसकर म्हणाले, "सरदारगृह हे त्या काळचं मराठी माणसाचं ताज हॉटेल म्हणता येईल. अनेक सरदार कुटुंबातले लोक इथं उतरत असत. मात्र सध्या या इमारतीची अवस्था फारशी चांगली नाही. त्याची स्वच्छता, दुरुस्ती यासाठी प्रयत्न करावेच लागतील. नूतनीकरण किंवा जीर्णोद्धार करायचा झाल्यास कायदेशीर बाबींचा प्रश्न सोडवूनच पुढे जाता येईल."
 
सरकारने पुढाकार घ्यावा- कुणाल टिळक
या इमारतीच्या आणि लोकमान्य टिळकांच्या स्मृती जतनासाठी काय करता येईल याबद्दल आम्ही लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक यांच्याशी संपर्क साधला.
 
"या इमारतीच्या डागडुजीसाठी किंवा इतर कामासाठी प्रयत्न करायचे झाल्यास सध्या त्या इमारतीतील दुकाने, घरे, भाडेकरू यांच्याशी संबंधित काही कायदेशीर प्रकरणं प्रलंबित आहेत का? याची तपासणी करावी लागेल", असं कुणाल यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, कोणत्याही बदलासाठी, नूतनीकरण किंवा जीर्णोद्धारासाठी सर्व भाडेकरू, दुकानदार यांना एकत्र करून त्यांच्या सहमतीने पुढे जाता येईल. यामध्ये सरकारने पुढाकार घेतला तर ते शक्य आहे. सध्या पुण्यातील केसरीवाड्यातील संग्रहालयाचे नूतनीकरण आणि घरातील संग्रहालयाचे काम याबद्दल सांस्कृतीक मंत्रालयाला प्रस्ताव दिले आहेत. रत्नागिरीतील टिळक जन्मस्थळवास्तू भारत सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येते. त्या वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न व्हावेत अशी विनंती त्या विभागाकडे केली आहे. टिळक कुटुंबानेही जन्मस्थळ वास्तूच्या कामासाठी तयारी दर्शवली आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती