Adnan Sami : पाकिस्तानी वायुसेना अधिकाऱ्याचा मुलगा ते पद्मश्री पुरस्कार - अदनान सामीचा वादग्रस्त प्रवास
मंगळवार, 28 जानेवारी 2020 (16:51 IST)
प्रवास
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये एक नाव पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं - गायक अदनान सामीचं.
अदनान सामीनं या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना 'मेरे देश की धरती' या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त केलं.
मात्र मूळ पाकिस्तानी असलेल्या आणि चारच वर्षांपूर्वी भारताचं नागरिकत्व स्वीकारलेल्या अदनान सामीला पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अनेकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
अमेय खोपकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, की "मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या 'पद्मश्री' पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे."
मनसेपाठोपाठ काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनीही अदनान सामीच्या पद्मश्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "हा प्रतिष्ठित सन्मान देण्यासाठी आता 'भाजप सरकारचं लांगूललाचन' हा एक निकष बनला आहे," असं जयवीर शेरगील म्हणाले.
"कारगिल युद्धात पाकिस्तानविरोधात लढलेल्या मोहम्मद सनाउल्लाह यांना NRCच्या माध्यमातून घुसखोर म्हणून घोषित केलं गेलं आणि पाकिस्तानच्या वायुसेनेतील अधिकाऱ्याच्या मुलाला मात्र पद्मश्री सन्मान...? पद्मश्रीसाठी समाजाप्रति योगदान आवश्यक आहे की सरकारचं गुणगान?" असा जयवीर शेरगील यांचा प्रश्न आहे.
अर्थात, अदनान सामीसाठी नागरिकत्व आणि निष्ठांमुळे भारतात आणि पाकिस्तानातही निर्माण होणारे वाद हे नवीन नाहीत. बॉलिवुडमध्ये मिळालेल्या यश आणि कौतुकासोबतच अदनान सामीला अनेक प्रसंगी टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे.
CAA वरून रझा मुरादांवर टीका
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दलच्या एका प्रश्नावर उत्तर देताना ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी म्हटलं होतं, की जर तुम्ही अदनान सामीला नागरिकत्व देऊ शकता तर इतरांना का नाही?
रझा मुराद यांनी पुढं बोलताना स्पष्ट केलं होतं, की नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा घटनाविरोधी आहे. तुम्ही धर्म किंवा जातीच्या आधारे लोकांमध्ये भेदभाव करू शकत नाही. तुम्ही अदनान सामीलाही नागरिकत्व दिलंच ना! तो पाकिस्तानी मुस्लीम आहे. त्याचे वडील पाकिस्तानी हवाई दलामध्ये अधिकारी होते. मला एवढंच म्हणायचं आहे, की तुम्ही लोकांना धर्माच्या आधारे वेगळं काढू शकत नाही.
अदनान सामींनी मात्र रझा मुराद यांच्या वक्तव्यावर उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त केली: "मला वाटत होतं की हे गृहस्थ फक्त चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करतात आणि पडद्यावरच निरर्थक बडबड करतात."
सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन
उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर अदनान सामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं होतं. त्यावेळी अदनान सामी यांना भारतीय नागरिकत्व मिळून काही महिनेच झाले होते.
अदनान सामी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, "दहशतवादाविरोधात अतिशय शानदार, यशस्वी आणि विचारपूर्वक केलेल्या स्ट्राईकसाठी पंतप्रधान कार्यालय आणि आपल्या लष्काराच्या वीर जवानांचं खूप खूप अभिनंदन."
अदनान सामींच्या या ट्वीटवर पाकिस्तानातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
"आपलं भारतीय नागरिकत्व हिरावून घेतलं जाऊ नये, या भीतीनं तुम्ही अशी विधानं करत आहात," असं एका ट्विटर युजरनं म्हटलं होतं.
"ज्या व्यवस्थेला तुम्ही दहशतवादी म्हणून संबोधत आहात, तुमचे वडीलही त्याच व्यवस्थेचा भाग होते," असं म्हणत एका ट्विटर युजरनं अदनान सामींना त्यांचे वडील हे पाकिस्तानी हवाई दलात कार्यरत असल्याची आठवण करून दिली.
कोण आहे अदनान सामी?
अदनान सामींचा जन्म 1971 साली लंडनमध्ये झाला. त्यांचे वडील अर्शद सामी खान हे पाकिस्तानी हवाई दलामध्ये पायलट होते. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचे राजदूत म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये भूमिका बजावली.
लंडनमध्येच शिक्षण घेतलेल्या अदनान सामींनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच पियानो वादनाला सुरुवात केली. ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्याकडून त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.
उत्तम पियानोवादक, संगीतकार आणि गायक असलेल्या अदनान सामींचा कीबोर्ड या मासिकानं 'the fastest man on keyboard in the world' या शब्दांत गौरव केला होता.
1993 साली अदनान सामींचा विवाह पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियार यांच्याशी झाला. झेबा हिचा ऋषी कपूरसोबतचा 'हिना' हा बॉलिवुडपट गाजला होता.
मात्र तीन वर्षांतच अदनान आणि झेबा विभक्त झाले.
2001 मध्ये सामी यांनी सबा गलदारी यांच्याशी विवाह केला. पण हे नातंही दीड वर्षंच टिकलं.
2008 मध्ये अदनान सामी आणि सबा यांनी पुन्हा विवाह केला. पण एक वर्षातच ते विभक्त झाले.
29 जानेवारी 2010 रोजी अदनान सामींनी रोया सामी खान यांच्याशी विवाह केला. या दांपत्याला एक मुलगीही आहे.
भारतीय नागरिकत्वाचा स्वीकार
1 जानेवारी 2016 साली अदनान सामींना भारतीय नागरिकत्व मिळालं. 2013 सालीच अदनान सामींनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर सामींनी 2015 साली पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संबंधित विभागाकडे अर्ज केला होता.
27 मे 2010 रोजी इश्यू केलेल्या त्याच्या पाकिस्तानी पासपोर्टची मुदत 26 मे 2015 रोजी संपली होती. पाकिस्तान सरकारने पासपोर्टला मुदतवाढ दिली नव्हती. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनात आपलं भारतातील वास्तव्य कायदेशीर करावं, अशी विनंती अदनाननं तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली होती.
नागरिकत्व कायद्यातील कलम 6 अन्वये, विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रात योगदान देणार्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, अदनान सामीची नागरिकत्वाची विनंती मान्य करण्यात आली.
भारतीय नागरिकत्व स्वीकारल्यानंतर अदनानला आपल्या पाकितानी नागरिकत्वाचा त्याग करावा लागला होता. या सगळ्या प्रक्रियेबद्दल एका मुलाखतीमध्ये बोलताना अदनान सामी यांनी म्हटलं होतं, "की पाकिस्तानमधील लोकांनी माझी त्याकाळातील परिस्थिती समजून घ्यावी, अशी माझी इच्छा आहे. तिथल्या लोकांचं जसं माझ्यावर प्रेम आहे, तसंच माझंही त्यांच्यावर आहे. पण पाकिस्तानी सरकारनं ज्यापद्धतीनं मला वागणूक दिली, माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता."
व्हिसावरून झालेला वाद
2001 पासून व्हीजिटर्स व्हिसावर असलेल्या अदनान सामींना 2013 साली व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहिल्याबद्दल मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती. 6 ऑक्टोबर 2013 मध्येच त्यांच्या व्हिसाची मुदत संपली होती, मात्र त्यानंतरही ते भारतातच राहात होते.
नोटीस मिळाल्यानंतर अदनान सामींनी आपण मुदतवाढीसाठी संबंधित विभागाला अर्ज केला असून त्यासंबंधीच्या कायदेशीर प्रक्रियेचं पालन करत आहोत, असं म्हणत लेखी स्वरुपात आपली बाजू मांडली होती.
त्यानंतर 17 ऑक्टोबर 2013 मध्ये गृह मंत्रालयानं त्यांच्या व्हिसाची मुदत तीन महिन्यांनी वाढवून दिली होती. याच काळात अदनान सामींवर कर चुकवेगिरीचेही आरोप झाले होते.
बॉलिवुडमधली कारकीर्द
म्युझिक कॉन्सर्ट आणि शो करणाऱ्या अदनान सामींनी 1994 मध्ये पहिल्यांदा चित्रपटाला संगीत दिलं. त्यानंतर पाकिस्तानमध्ये अदनाम सामींची गायक आणि संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू झाली.
2000 साली आशा भोसलेंसोबत अदनान सामींनी भारतामध्ये 'कभी तो नज़र मिलाओ' हा म्युझिक अॅल्बम केला. या अॅल्बमला संगीतही अदनान सामीनंच दिलं होतं. हा अल्बम प्रचंड गाजला, अनेक महिने तो इंडिपॉप चार्ट्समध्ये टॉपवर होता.
2001 साली आलेल्या 'अजनबी' चित्रपटातल्या 'तू सिर्फ मेरा मेहबूब' या गाण्यानंतर अदनान सामींकडून बॉलिवुडमधल्या ऑफर्स येऊ लागल्या.
याच वर्षापासून अदनान सामी भारतात व्हिजिटर्स व्हिसावर राहू लागले.
तेरा चेहरा, 'बिग बी' अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं 'कभी नहीं' अशा म्युझिक अॅल्बममधल्या गाजलेल्या गाण्यांसोबतच साथिया, युवा, ऐतराज, सलाम-ए-इश्क, टॅक्सी नं. 9211 माय नेम इज़ खान, बजरंगी भाईजान या चित्रपटातील अदनान सामींची गाणीही हिट झाली.