पंजाब : नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा कधीही होऊ शकते, रंधावा यांचं नाव सगळ्यात पुढे

रविवार, 19 सप्टेंबर 2021 (17:48 IST)
पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा कधीही होऊ शकते.बीबीसीच्या पंजाबी सेवेनुसार, काँग्रेस हाकमांडची राहुल गांधी यांच्या दिल्लीस्थित घरी पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांसंदर्भात बैठक झाली.या बैठकीत नवज्योत सिंग सिद्धू, जय माकन, हरिश चौधरी आणि परगट सिंग सहभागी होते,अशी माहिती मिळाली आहे.
 
या बैठकीनंतर सिद्धू यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. तर मुख्यमंत्री पद निवडीचा निर्णय सोनिया गांधी करतील, असं परगट सिंग यांनी म्हटलं.या बैठकीत सुखजिंदर रंधावा, नवज्योत सिंग सिंधू आणि सुनील जाखड यांच्या नावावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.या शर्यतीत सध्या रंधावा सगळ्यात पुढे असल्याचं सांगितलं जात आहे.
 
मुख्यमंत्रिपदाला मी नकार दिलाय - अंबिका सोनी
दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, या चर्चांना स्वत: अंबिका सोनी यांनीच पूर्णविराम दिलाय.पंजाबचं मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास मी नकार दिलाय, असं अंबिका सोनी यांनी एएनआय वृत्तसेवा संस्थेशी बोलातना स्पष्ट केलं.
 
तसंच, "चंदीगडमध्ये पक्षाच्या सरचिटणीसांच्या चर्चा सुरू आहेत. निरीक्षक सर्व आमदारांची मतं ऐकतायेत," असं अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रिपदी कुणाला बसवलं जाईल, यावर बोलताना म्हटलं.
 
पंजाबचा पुढचा मुख्यमंत्री शिख असावा, अशी इच्छाही अबिका सोनी यांनी व्यक्त केली.
 
सिद्धू, जाखड, बाजवा की रंधावा.. पंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण होणार?
पंजाब काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांनी नवीन मुख्यमंत्री निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेत. पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सुनील जाखड, नवज्योतसिंह सिद्धू, सुखजिंदर सिंह रंधावा आणि प्रताप सिंह बाजवा ही चार नावं शर्यतीत असल्याचीचर्चा आहे.
 
पंजाबमध्ये पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मावळते मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी अवघ्या काही महिन्यांचाच कालावधी बाकी होता. त्यापूर्वीच पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षानंतर त्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांना काही महिन्यांचाच अवधी पदावरून काम करण्यास मिळेल.जानेवारी महिन्यापासूनच आचारसंहिता लागू केली जाऊ शकते. त्यामुळे पंजाबमध्ये जो कुणी नवीन मुख्यमंत्री बनेल, त्याच्याकडे केवळ जवळपास तीन महिन्यांचाच कालावधी असेल.
 
 
सुनील जाखड
बातमीनुसार, पंजाब काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. जर जाखड मुख्यमंत्री बनले, तर 1966 सालानंतर पंजाबच्या पुनर्गठनानंतर पहिल्यांदाच कुणी हिंदू मुख्यमंत्री बनले.सुनील जाखड हे शेतकरी कुटुंबातील असून, पंजाबच्या हिंदू समाजात त्यांना विशेष मान आहे आणि त्यांचं संपर्कही बराच आहे.अशाप्रकारे काँग्रेसला जाखड यांच्या रुपात दुहेरी फायद्याची शक्यता आहे.सुनील जाखड अबोहरचे प्रसिद्ध जमीनदार आहेत. लोकसभेचे माजी अध्यक्ष बलराम जाखड यांचे ते पुत्र आहेत. 67 वर्षीय सुनील जाखड अबोहर विधानसभा मतदारसंघातून 2002 ते 2017 या कालावधीत तीनवेळा निवडून आले, तसंच गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघाचंही त्यांनी नेतृत्त्व केलंय.2017 साली ते विधानसभा निवडणुकीत अबोहरमधून पराभूत झाले आणि त्यांना धक्का बसला. मात्र, 2017 साली पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी जाखड यांना नियुक्त केलं गेलं. त्यानंतर त्यांना 2019 मध्ये गुरुदासपूरमधून भाजप उमेदवार सनी देओलसमोर लोकसभा निवडणुकीतही पराभव पत्कारावा लागला.
 
सुखजिंदर सिंह रंधावा
62 वर्षीय सुखजिंदर सिंह रंधावा हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात तुरुंग आणि सहाकारिता मंत्री होते.
गुरुदासपूरचे रहिवासी असलेले रंधावा तीनवेळा काँग्रेसचे आमदार राहिलेत. 2002, 2007 आणि 2017 या निवडणुकांमध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. पंजाब काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी ही पदंही त्यांनी सांभाळली आहेत. ते मूळचेच काँग्रेस कुटुंबातील आहे.
सुखजिंदर सिंह यांचे वडील संतोख सिंह दोनवेळा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि माझा भागातील ते प्रसिद्ध नेते होते.
 
सुखजिंदर सिंह रंधावा हे बादल कुटुंबाविरोधात आक्रमक असतात. रंधावा यांनी 2015 साली पंजाबमध्ये गुरु ग्रंथ साहीबचा अवमान आणि त्यानंतर पोलीस गोळीबारात झालेल्या दोन तरुणांच्या मृत्यूचा मुद्दा उचलून धरला होता.
नंतर नवज्योतसिंह सिद्धू यांच्या सुरात सूर मिसळवून कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर काम करत नसल्याचा आरोप लावला आणि पक्षाअंतर्गत संघर्षात सिद्धूंच्या बाजूने राहिले.
 
प्रताप सिंह बाजवा
गुरुदासपूर जिल्ह्यातील 64 वर्षीय प्रताप सिंह बाजवा हे सुद्धा पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी शर्यतीत असल्याचं म्हटलं जातंय. ते पंजाबमधील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांपैकी एक आहेत. सध्या ते राज्यसभेत काँग्रेसचं प्रतिनिधित्त्व करत आहेत.प्रतापसिंह बाजवा यांचे वडील सतनाम सिंह बाजवा हेही काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते आणि मंत्रीही होते.
 
प्रताप सिंह बाजवा यांचे लहान भाऊ फतेह जंग सिंह बाजवा हेही काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. त्यांची पत्नी चरणजीत कौर बाजवा आधीच्या विधानसभेत आमदार होत्या.बाजवा हे पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही होते आणि 1997 ते 2007 या कालावधीत ते तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मंत्रिपदही त्यांनी सांभाळलं आहे.
 
गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणूनही निवडून आले होते.
 
नवज्योतसिंह सिद्धू
नवज्योतसिंह सिद्धू हे काँग्रेसमध्ये आल्यानंतर ज्याप्रकारे पंजाबमध्ये घडामोडी घडल्यात त्या काही आता लपून राहिल्या नाहीत.नवज्योतसिंह सिद्धू पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही सांभाळलं होतं. मात्र, नंतर राजीनामा दिला. पुढे मग कॅप्टन अमरिंदर यांच्याविरोधात सिद्धूंनी मोर्चाच उघडला. सार्वजनिक व्यासपीठांवरून अमरिंदर सिंह यांच्याविरोधात ते बोलू लागले.
क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या नवज्योत सिंह सिद्धू यांना कॅप्टन अमरिंदर सिंह याचा विरोध असतानाही पंजाब काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलं. आता तर अमरिंदर यांनाच मुख्यमंत्रिपदावरून बाजूला हटवण्यात आलंय.
 
अमृतसर लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा खासदार राहिलेले आणि भाजपकडून राज्यसभेसाठीचे उमेदवार राहिलेल्या नवज्योतसिंह सिद्धू पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये सर्वात तरुण आहेत.
 
2017 साली विधानसभा निवडणुकीआधी सिद्धू भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. इतर तीन काँग्रेस नेत्यांप्रमाणेच सिद्धू हेही काँग्रेसच्या विचारधारेच्या कुटुंबातूनच येतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती