शिवप्रताप दिन: शिवाजी महाराजांनी अफझल खानाला कसं ठार मारलं?
आज शिवप्रताप दिन आहे. याच दिवशी म्हणजेच 10 नोव्हेंबर 1659 ला छ. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला होता.
प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार आणि शिवाजी महाराजांमध्ये झालेल्या संघर्षात शिवाजी महाराजांनी अफझल खानाला कंठस्नान घातले होते.
या दिवसाची आठवण म्हणून आजही महाराष्ट्रात शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
29 वर्षांच्या शिवाजी महाराजांनी वाघनघाच्या साहाय्याने अफझल खानाला ठार केले. हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या अफझल खानाला शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांच्या साहाय्याने मारले, ही घटना अत्यंत चमत्कृतीपूर्ण आहे.
पण त्याचसोबत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे की या घटनेमुळे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची चमक संपूर्ण देशाने पाहिली होती.
स्वराज्याच्या निर्मितीसाठी ही घटना अत्यंत महत्त्वाची होती. स्वराज्याचा विस्तार थांबवण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते त्याला शिवाजी महाराजांनी थेट आव्हान दिले होते आणि स्वराज्याचा विस्तार यशस्वीपणे सुरू ठेवला.
स्वराज्य विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रसंग
आपल्या जनतेचे राज्य असावे, रयतेचे राज्य असावे आणि त्यासाठी आपला स्वतंत्र, सार्वभौम भूभाग असावा म्हणजेच स्वराज्य असावे शिवाजी महाराजांची इच्छा होती.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात सर्व घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे.
त्यासाठी त्यांनी जावळीचा प्रदेश हस्तगत करून स्वराज्य विस्ताराची मुहूर्तमेढ रोवली होती. जावळीच्या प्रदेशात मोरे घराण्याचा वचक होता. मोरे घराणे हे सरदारांचे घराणे होते.
मोरे कुटुंबातील पुरुषांना चंद्रराव हा किताब असे. यशवंतराव मोरेंच्या कार्यकाळात जनतेला अधिकाऱ्यांच्या जाचाला सामोरे जावे लागायचे.
यांचा बंदोबस्त करुन हा प्रदेश स्वराज्यात घ्यायचा शिवाजी महाराजांनी ठरवले. शिवाजी महाराजांनी या घराण्यातील (चंद्रराव) यशवंतराव मोरे यांचा पराभव करून त्यांना जावळीच्या लढाईत 27 ऑगस्ट 1656ला ठार केले.
हा विजय शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचा विजय ठरला. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि स्वराज्य स्थापनेस अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली. जावळीच्या विजयामुळे पश्चिमेतील घाटांमध्ये आणि कोकणात शिवाजी महाराजांचा दरारा वाढला. पण त्याचवेळी आजूबाजूची राज्ये देखील सावध झाली.
शिवाजी महाराज हे आदिलशाहींच्या केंद्रावर हल्ले करत असत. त्याच वेळी त्यांनी मुघलांकडे असलेल्या जुन्नरवर देखील हल्ला केला. त्यावेळी औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करावा यासाठी मुघल सम्राटाचा मुलगा आणि दक्षिणचा सुभेदार असलेल्या औरंगजेबाचा दबाव होता.
विजापूरचे आदिलशाहीतील काही भागांवर शिवाजी महाराजांचे सातत्याने हल्ले होत असत. त्यामुळे शिवाजी महाराजांचा एकदाचा काय तो बंदोबस्त करून टाकला पाहिजे असे आदिलशाहीला वाटत होते.
या सर्व गोष्टी घडत असतानाच औरंगजेब दिल्लीत परतला आणि त्याने शाहजहानला नजरकैदेत ठेवून स्वतःला सम्राट घोषित केले. शिवाजी महाराजांनी त्यांना मानाची वस्त्रं पाठवली आणि औरंगजेबाने देखील प्रतिभेट म्हणून मानाची वस्त्रे पाठवली.
शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात सलोखा निर्माण झाला असे चित्र दिसत होते पण शिवाजी महाराजांच्या कारवाया वाढत होत्या. त्या रोखाव्यात यासाठी दिल्लीने विजापूरवर दबाव टाकला.
अफझल खानाची निवड
शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहने अफझल खानाची निवड केली. अफझल खान हा भोसले घराण्याचाच वैरी होता. त्याने शहाजी महाराजांना अटक केले होते तर शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजी महाराज यांना कर्नाटकच्या लढाईत ठार केले होते. तोच अफझल खान शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी त्यांच्याच मुलुखात येणार होता.
जेव्हा अफझल खानाने शिवाजी महाराजांना पकडून आणण्यासाठी विडा उचलला तेव्हा तो काय म्हणाला याबद्दल सभासदाच्या बखरीत एक वाक्य आहे. तेव्हा खान म्हणाला, शिवाजी महाराजांना चढ्या घोड्यानिशी जिवंत कैद करून आणतो. म्हणजे सहज शिवाजी महाराजांना अटक करता येईल असा आत्मविश्वास तो बाळगून होता. पण खरी गोष्ट अशी होती की विजापूरच्या राजाने अफझल खानाला स्पष्टपणे सांगितले होते की शिवाजी महाराजांचा नाश करावा. अफझल खानाची मोठ्या फौजेनिशी स्वराज्याच्या मुलुखात आला. जनतेला जाच देण्यास त्याने सुरुवात केली. जेणेकरुन शिवाजी महाराज समोर येतील आणि त्यांना जेरबंद करता येईल.
खानाजवळ 12,000 अश्वदळ होते, 10,000 पायदळ होते. 75 मोठ्या तोफा आणि 450 पहाडी तोफा होत्या. खानाचा उपद्रव वाढत चालला होता.
त्यात शिवाजी महाराजांच्या वकिलांमध्ये आणि खानाच्या वकिलांमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. तेव्हा शिवाजी महाराज आणि अफझल खान यांनी प्रत्यक्ष भेटून यावर तोडगा काढावा असे दोन्ही पक्षांचे म्हणणे आले.
अफझल खानाला ठार मारले
शिवाजी महाराजांच्या मुलुखात असलेल्या प्रतापगडाच्या माचीवर शामियाना उभारून त्या ठिकाणी दोघांनी भेट घेण्याचे ठरले. दोघांसोबत प्रत्येकी दोन सेवक आणि काही अंतरावर 10 अंगरक्षक राहतील असे ठरले.
शिवाजी महाराजांनी आपल्या संरक्षणासाठी चिलखत आणि शिरस्त्राण घातले होते. त्यांच्यासोबत जीवा महाला आणि संभाजी कावजी हे दोन अंगरक्षक होते. खानासोबत सय्यद बंडा होता. शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हरकत घेत त्याला मंडपाबाहेर जाण्यास भाग पाडले.
शिवाजी महाराज आणि अफझल खान समोरासमोर आले. शिवाजी महाराजांना अलिंगन देण्यासाठी खानाने हात पसरले आणि त्यांचे मस्तक काखेत दाबून त्यांच्यावर जमदाडाने (खंजिराने) वार केला. पण शिवाजी महाराजांनी चिलखत घातलेली असल्यामुळे त्यांना काही झाले नाही.
शिवाजी महाराजांनी अत्यंत चपळाईने सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यांनी आपल्या अंगरख्यात आणलेल्या छोट्या कृपाणाने आणि वाघनख्यांनी अफजल खानाला ठार मारले.
हे कसे झाले याबद्दल, मराठाज् अँड दख्खनी मुसलमान्स या पुस्तकात आर. एम. बेंथम या इतिहासकाराने लिहिले आहे की.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाच्या वधासाठी नियोजन केल्यानंतर जिजाऊ माँसाहेबांचे आशीर्वाद घेऊन ते प्रतापगडावर आले. त्यांनी आपल्या सुती अंगरख्याखाली लोखंडी चिलखत, तसंच टोपीखाली लोखंडी शिरस्त्राण घातलं. उजव्या हाताच्या कोपऱ्यात त्यांनी छोटी कट्यार (बिचवा) लपवली. तर डाव्या हाताच्या बोटांच्या मधल्या भागात वाघनख्या हे छोटं शस्त्र बेमालूमपणे दडवून ठेवलं.
"भेटीसाठी जात असताना आपण घाबरलो आहोत, हे भासवण्यासाठी शिवाजी महाराज वारंवार काही ना काही कारणे दाखवून थांबत होते. भेटीवेळी अफझलखान शिवाजी महाराजांच्या दिशेने आला. गळाभेट करण्याच्या दरम्यान अफझलखानाने शिवाजी महाराजांना आवळण्याचा प्रयत्न केला असता महाराजांनी वाघनख्यांच्या मदतीने त्याचा कोथळा बाहेर काढला.”
अफझल खान ठार झाल्यावर पुढे काय घडलं?
खान ठार झाल्यावर त्याच्या सेवकानी महाराजांवर हल्ला चढवला. त्यांना महाराजांनी ठार केले. सय्यद बंडा तत्काळ आत आला. त्याला जीवा महालांनी ठार केले.
आता महत्त्वाची गोष्ट ही होती की खानाच्या सैन्याचे काय करायचे आहे. त्याचे सैन्य भरपूर मोठे होते आणि इतर अनेक सरदार त्याच्यासोबत आलेले होते. त्यांना हरवणे आवश्यक होते.
शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार तोफांचा इशारा देण्यात आला. अफझल खानाच्या तळावर हल्ला करण्याची नियोजन शिवाजी महाराजांनी करून ठेवले होते. त्यानुसार प्रतापगडाच्या पायथ्याशी, तसेच त्या भागातील जंगलात लढाया झाल्या. यामध्ये कान्होजी जेधे, सिंबिलकर देशमुख, बाजी सर्जेराव यांनी खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला.
अनेकांनी शरणागती पत्करली. त्यांना शिवाजी महाराजांनी अभय दिले. खानाकडील, हिरे-जवाहर, दाग-दागिने स्वराज्याच्या खजिन्यात घेण्यात आले. या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली जावळीचा प्रदेश आणि मावळ प्रदेश पूर्णपणे आला. अनेक वर्षांपासून जहागीरदारांच्या जाचाला कंटाळलेल्या जनतेने सुटकेचा नि:श्वास टाकला.
अशा रीतीने स्वराज्याच्या निर्मितीच्या इतिहासातील सोनेरी पान शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी लिहिले.
पुढील घोडदौड
अफजल खानाला ठार मारल्यावर विजापूरच्या सैन्याची दाणादाण उडाली तर इकडे शिवाजी महाराजांच्या सैन्याला मोठी लूट प्राप्त झाली.
नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महारांजांनी आदिलशाहीच्या प्रांतात आणि कोकणात मोठी मजल मारायला सुरुवात केली.
अफजल खानाच्य मृत्यूनंतर अगदी काही दिवसांच्या आत शिवाजी महाराजांनी कोल्हापूर, पन्हाळा आणि कोकणात मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.
शिवाजी महाराजांकडून हा प्रदेश आणि लूट परत मिळवण्यासाठी आलेल्या आदिलशाहीने पाठवलेल्या रुस्तुम-ए-जमान आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान यांचाही पराभव शिवाजी महाराजांनी केला.
अफजलखानाच्या पराभवानंतर आदिलशाहाच्या साम्राज्याला एका पाठोपाठ एक जबर धक्के देण्याचं काम महाराजांनी केलं होतं.