कोरोना लॉकडाऊन : मासेमारी आणि विक्री करणाऱ्या कोळिणींसमोर रोजगाराचा आव्हान
शुक्रवार, 1 मे 2020 (17:42 IST)
जान्हवी मुळे
सकाळची वेळ, खरेदीसाठी झुंबड, ताजी मासळी आणि भावासाठी घासाघीस. मुंबईच्या कुठल्याही मासळीबाजारातलं एरवीचं हे गजबजलेलं चित्र. पण कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे यातले बहुतांश बाजार सध्या शांत पहुडले आहेत.
एरवी पापलेट, बोंबिल, बांगडा, सुरमई, कोलंबी, चिंबोऱ्या, घोळ, तामोशी, रावस असं समुद्राचं वैभव इथं रितं झालेलं दिसतं. आता मासे खाणाऱ्यांच्या तोंडाला हे वाचून पाणी सुटलं असेल आणि मासे न खाणाऱ्या मंडळींनी कदाचित नाक मुरडलं असेल. पण मुंबईच्या अर्थव्यवस्थेत आणि संस्कृतीच्या दृष्टीनंही हे मासळी बाजार महत्त्वाचे आहेत.
सरकारी अंदाजानुसार मुंबईच्या मासळी बाजारांमध्ये दररोज किमान तीन-साडेतीन कोटींची उलाढाल होते. चोखंदळ गृहिणींपासून, हॉटेलमधले शेफ आणि खवय्ये मंडळी नीट निवडून मासळी विकत घेत असतात आणि पहाटेपासून कामात असूनही कोळिणी इथं उत्साहानं प्रत्येकाशी बोलत असतात.
पण लॉकडाऊननंतर ही उलाढाल थंडावल्यानं अनेकींसमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यात वरळी, माहिम आणि वर्सोवा या मुंबईतल्या तीन मोठ्या कोळीवाड्यांचा भाग कोरोनाविषाणूच्या संसर्गामुळे काही काळ सील झाला.
कोळिणींच्या व्यवसायावर परिणाम
"मी दीड महिना घरी आहे, बातम्या बघते आहे. शेतकरी, बेरोजगार यांचा विचार सरकार करतं, तसाच कोळी लोकांचाही विचार व्हायला हवा," असं मुंबईच्या कलिनामधल्या बाजारात मासेविक्री करणाऱ्या नयना पाटील सांगतात. त्या कोळी समाजातल्या महिलांसाठी कामही करतात.
केवळ मुंबई शहरातच नयना पाटील यांच्यासारख्या पंधरा हजार जणी या व्यवसायात आहेत. मुंबईतल्या तीन घाऊक मासळी बाजारांतून, किंवा छोट्या मोठ्या बंदरांतून त्या रोज पहाटे मासे विकत घेतात आणि बाजारात विकतात.
राज्यात इतर ठिकाणही साधारण हेच चित्र दिसतं. मासे पकडून आणायचं काम पुरुष करत असले तरी पुढची सगळी जबाबदारी बहुतेकदा महिलाच हाताळतात आणि आपापल्या कुटुंबाच्या गाड्याला हातभार लावतात. पण सध्या गाठीशी असलेला पैसाही मोडणं अनेकींना शक्य होत नाही, असं नयना पाटील सांगतात.
"सगळ्या महिलांचा रोजगार ठप्प आहे. काहींकडे शिल्लकही फारशी नाही. मग खाणार काय एवढी हालत खराब झाली आहे. समजा माझ्याकडे आठ-दहा हजार रुपये असतील, त्यातून रोज मासे आणून विकले तर पाचशे-आठशे सुटतात. या पैशातनं आमचा घरखर्च चालतो. आता मला प्रश्नही पडतो, मी घरात राहिले, हे दहा हजार खर्च केले, तर उद्या लॉकडाऊन उठल्यावर मला मासे आणायला पैसे कोण देणार? मला तिथे उधारी मिळणार नाही."
मुंबईजवळ ठाण्याच्या राबोडीमधल्या मासळीबाजारात आठवडाभरापासून मासेविक्री सुरू झाली आहे. पण लॉकडाऊनमुळे तिथंही धंद्याचं गणित बिघडलं आहे. तिथे मासेविक्री करणाऱ्या पद्मजा सध्याच्या परिस्थितीविषयी माहिती देतात.
"जवळपास महिनाभर सगळं बंद होतं. आधी आम्ही मुंबईहून मासळी आणायचो, पण तिथे सगळं बंद आहे. आता उत्तन, उरण, मढ आयलंड जिथे छोट्या बोटी येतात, तिथेच आली तर मच्छी मिळते."
त्यांच्या बाजाराचा सगळ्यांचा मिळून एक टेम्पो आहे, ज्याच्यासाठी त्यांनी पोलिसांकडून परवाना काढला आहे. जिथे मच्छी मिळणार असल्याचं समजतं, तिथे ही मध्यरात्री गाडी जाते आणि पाचसाडेपाचला माल घेऊन असं पद्मजा सांगतात.
"आधी नऊ वाजता दुकान लावायचो, आता नऊ वाजता बंद करायला घ्यावं लागतं. सात ते दहाच दुकान लावू शकतो. म्हणून मी माल येणार असेल तर नेहमीच्या गिऱ्हाईकांना फोन करते. एकाला सातची वेळ दिली तर दुसऱ्याला साडेसात अशी अर्ध्या अर्ध्या तासानं वेळ देते. कोणी मधे आलं तर मधल्या वेळात देता येतं."
माशांच्या होम डिलिव्हरीचा पर्याय
बाजाराच्या बदलेलल्या वेळा आणि माशांची घटलेली आवक यावर मग काही जणींनी होम डिलिव्हरीचा पर्याय निवडला आहे. थेट घरी नाही, तर बिल्डिंगच्या खाली जाऊन ऑर्डरनुसार मासळी दिली जाते.
मुंबईत चारकोपला राहणारे दर्शन किणी यांचं कुटूंब स्वतः मासेमारी आणि मत्स्यविक्रीच्या व्यवसायांत आहे. दर्शन यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या दुकानाची नोंदणीही केली होती आणि ऑनलाईन डिलिव्हरीची योजना आखली होती. पण मग लॉकडाऊन सुरू झालं.
"जवळपास आठवडाभर आम्ही घरीच होतो. मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मासेमारीला जाऊ शकता, तेव्हा आम्ही बोटीवर जाणं सुरू केलं. पण प्रश्न होता, विकायचं कसं? आम्ही मग एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला. तिथे फक्त अॅडमिन मेसेज करू शकतो. आम्ही मिळालेल्या माशांचे फोटो, किंमत तिथे टाकतो. कुणाला काय हवं तशी ऑर्डर लोक मेसेज करून देतात."
सध्या फक्त ते राहतात त्या चारकोप कांदिवली परिसरात दर्शन यांनी ही सुविधा देऊ केली आहे. काही गिऱ्हाईकं स्वतः येऊन ऑर्डर घेऊन जातात. ज्यांना शक्य नसेल आणि ते कंटेन्मेंट झोनमध्ये राहात नसतील तर दर्शन घरपोच मासळी पुरवतात. त्यासाठी त्यांनी दोघांना नोकरीवर ठेवलं आहे.
सध्याच्या परिस्थितीत मोठ्या व्यवसायांना पुन्हा सुरू व्हायला वेळ लागेल. पण छोट्या प्रमाणात कमीत कमी माणसांसह काम करता येतं असं दर्शन यांना वाटतं. शिवाय पैशाची देवाणघेवाणही ऑनलाईन होऊ शकते.
लॉकडाऊन असल्यानं सगळं जरा शांत आहे. पण एरवी पहाटेची किरणं दिसू लागण्याआधीच मुंबईतल्या बंदरांवर लगबग सुरू होते. बाजार भरतो तेव्हा, अनेकांची वर्षानुवर्ष कोळीण ठरलेली असते. मासे खायचा वार असेल तेव्हा बाजारात जायचं, नेहमीच्या त्या कोळिणीकडून मासे आणायचे हा त्यांचा शिरस्ता. ती कोळीणच नीट मासे साफही करून देते. आता साफ केलेले मासे घरपोच मिळत असतील, तर हा नवा पर्यायही मुंबईकर स्वीकारताना दिसतायत.
पण सगळ्याच कोळिणींना हे शक्य नाही, याकडे नयना लक्ष वेधतात. "आमच्या बायका त्या फार शिकल्या सवरल्या नाहीत. त्यांना पे-टीएम, गुगल पे वापरता येत नाही."
मासळी बाजारात सोशल डिस्टन्सिंग कसं जमणार?
कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातलं लॉकडाऊन उठल्यावरही बाजारपेठा, विशेषतः मासळी बाजारात काही काळ तरी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करावं लागू शकतं. पण ही गोष्ट सोपी नाही.
दर्शन किणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून काम करत आहेत. "मार्वेमध्ये माझी बोट आहे. समुद्रात खूप खोलवर आम्ही जात नाही आणि बोटीवर फक्त दोन माणसं असतात, वडील आणि मी. त्यामुळे व्यवसाय सुरू करायला अडचण आली नाही."
मासेमारी करण्यापेक्षै मासेविक्रीतील लोकांसमोरचं आव्हान मोठं आहे. नयना सांगतात, "मुंबईच्या घाऊक बाजारात आमच्यासारखे विक्रेते आणि किरकोळ खरेदी करणारे लोकही गर्दी करतात. काही दिवसांपूर्वीच एका बाजारात मासळी आली, तेव्हा एवढी गर्दी झाली, की पोलिसांना यावं लागलं, म्हणजे विचार करा. अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंग कसं पाळणार? त्यातून आजार पसरण्याची भीती आणखी वाढते उलट."
बाजारातली स्वच्छता राखणंही महत्त्वाचं आहे. पद्मजा ती काळजी घेत आहेत.
"आम्ही जिथे बसतो तो बाजार एकदा सकाळीच असतो. दुकान बंद करताना आम्ही सगळं स्वच्छ करतो, धुवून टाकतो. पण सगळ्याच बाजारात असं नसतं. काही जागी कधी कधी घाण असते, वास मारत असतो. ते सगळं नीट साफ ठेवलं पाहिजे." मासे विक्री करणाऱ्यांनी शक्य तितकी काळजी घ्यायला हवी आणि मास्क, हातमोजे घालूनच विक्री करावी असं त्या आवर्जून सांगतात.
तर दर्शन यांना वाटतं की, या कामात कोळीवाड्यातले गावकरी युवक पुढाकार घेऊ शकतात. "कोळीणींना मध्ये पुरेसं अंतर ठेवून बसवावं. येणाऱ्या गिऱ्हईकांना व्यवस्थित रांगेतून एकेक व्यक्तीला सोडावं. ग्लव्ज, मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा करावा" असे पर्याय ते सांगतात.
कोव्हिडच्या काळात मासेमारांसमोरच्या समस्या
मच्छिमार समितीचे दामोदर तांडेल माहिती देतात, की मुंबईत महानगरपालिकेची आणि कोळीवाडा गावठाणांची मिळून 102 मार्केट आहेत जिथे एरवी मासेविक्री होते. महाराष्ट्रातल्या 184 बंदरांमध्ये मासेमारी चालते.
सरकारनं मासेमारीसाठी परवानगी दिल्यावर काही ठिकाणी छोट्या बोटी मासेमारीसाठी जात आहेत पण बहुतांश मोठी बंदरं, बाजार बंद आहेत. तांडेल सांगतात, "आयुक्तांनी मासेमारी सुरू करण्यासाठी 43 अटी घातल्या आहेत ज्यांची पूर्तता करणं कठीण आहे. या बंदरांमध्ये आरोग्य केंद्र, कलेक्टरचा कक्ष, पोलिसस्टेशन सहाय्यक आयुक्ताचं कार्यालय आवश्यक आहेत. एवढे कर्मचारी सध्या आहेत का?"
केरळ सरकारनं अशा अटी न घालता निवडक खलाशांना घेऊन बोट नेण्यास परवानगी दिली आहे, याकडे ते लक्ष वेधून घेतात. शिवाय सामान्य व्यवसायिकांसमोर अवैध मासेमारी करणाऱ्यांचं आव्हानंही आहेच. लॉकडाऊन असतानाही मासेमारी केल्या प्रकरणी रत्नागिरी आणि अलिबागजवळ अवैध एलईडी पर्सिसीन बोटींवर काही दिवसापूर्वीच कारवाई झाली होती.
मासेमारीच्या व्यवसायासमोरचं आव्हान कोव्हिडमुळे वाडलं असल्याचं तांडेल यांना वाटतं.
"लॉकडाऊनमुळे आमचा महिला वर्ग महिनाभर घरी बसून आहे. चारपाच महिन्यांपूर्वी दोन वादळंही आल्यानं आमच्या मासेमारी व्यवसायाला आधीच फटका बसला आहे. त्याची आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, पण कोळी समाजाचा विचार होत नाही असं वाटतं."