मंत्रिमंडळ विस्तार: अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ - LIVE
सोमवार, 30 डिसेंबर 2019 (13:21 IST)
सरकार स्थापनेला जवळपास महिना उलटून गेल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होतोय.
मुंबईस्थित विधान भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणाऱ्या 35 मंत्र्यांची यादी राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांचंही नाव आहे.
9 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
पाहा ताजे अपडेट्स -
1 वाजून 10 मिनिटं- धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या धनंजय मुंडेंनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं आहे.
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा परळीमधून पराभव केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे- पाटील तसंच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
1 वाजून 4 मिनिटं- अजित पवार उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपविली जाईल, याची उत्सुकता आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं असलं तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र मंत्रीमंडळ विस्तारातून वगळण्यात आलं.
12 वाजून 52 मिनिटं- संजय राऊतांची अनुपस्थिती
शिवसेना खासदार संजय राऊत हे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे संजय राऊत नाराज असल्याची चर्चा होती. मात्र ANI शी बोलताना संजय राऊत यांनी आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे.
आम्ही पक्षाकडून मागणारे नसून पक्षाला देणारे आहोत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
12 वाजून 30 मिनिटं- नेते-कार्यकर्त्यांची गर्दी
विधान भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी संभाव्य मंत्र्यांचे कुटुंबीयही उपस्थित आहेत. तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्तेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत.
स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांना या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण नसल्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटलं, की सत्तास्थापनेच्या चर्चेमध्ये मित्र पक्षांना सन्मानं वागवलं गेलं. मात्र आता सत्ता स्थापन झाल्यानंतर मित्र पक्षांचा विसर पडला आहे. किमान समान कार्यक्रम तयार करत असतानाही आमचे मुद्दे विचारात घ्या, असं आम्ही म्हटलं होतं.
पण तेव्हाही आमचं मत विचारात घेतलं गेलं नाही. भाजप नीट वागलं नाही म्हणून आम्ही त्यांची सोबत सोडली. आता हे नीट वागत नसतील तर त्यांच्यामागे फरपटत जावं, असं नाही.
11 वाजता- आज होणाऱ्या कार्यक्रमात कोण घेणार शपथ?
पक्षनेतेखातं
काँग्रेसअशोक चव्हाण (कॅबिनेट)
काँग्रेसके.सी.पाडवी (कॅबिनेट)
काँग्रेसविजय वडेट्टीवार (कॅबिनेट)
काँग्रेसअमित देशमुख (कॅबिनेट)
काँग्रेससुनील केदार (कॅबिनेट)
काँग्रेसयशोमती ठाकूर (कॅबिनेट)
काँग्रेसवर्षा गायकवाड (कॅबिनेट)
काँग्रेसअस्लम शेख (कॅबिनेट)
काँग्रेससतेज पाटील (राज्यमंत्री
काँग्रेसविश्वजित कदम (राज्यमंत्री)
राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेसनवाब मलिक (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेसधनंजय मुंडे (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेसजितेंद्र आव्हाड (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेसहसन मुश्रीफ (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेसराजेंद्र शिंगणे (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेसराजेश टोपे (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेसबाळासाहेब पाटील (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेसअनिल देशमुख (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेसआदिती तटकरे (राज्यमंत्री)
राष्ट्रवादी काँग्रेसप्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री)
राष्ट्रवादी काँग्रेसदत्तात्रय भरणे (राज्यमंत्री)
राष्ट्रवादी काँग्रेससंजय बनसोडे (राज्यमंत्री)
शिवसेनाआदित्य ठाकरे (कॅबिनेट मंत्री)
शिवसेनागुलाबराव पाटील
शिवसेनाउदय सामंत
शिवसेनाअनिल परब
शिवसेनासंजय राठोड
शिवसेनादादा भुसे
शिवसेनाशंभूराजे देसाई (राज्यमंत्री)
शिवसेनासंदीपान भुमरे
शिवसेनाराजेंद्र पाटील-यड्रावकर (राज्यमंत्री)
शिवसेनाअब्दुल सत्तार (राज्यमंत्री)
प्रहार जनशक्ती पक्षबच्चू कडू (राज्यमंत्री)
अपक्षशंकरराव गडाख
शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी भास्कर जाधव, अब्दुल सत्तार यांच्या नावाचीही चर्चा आहे.