भीमा कोरेगाव : अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न सरकारनं हाणून पाडलाय- प्रकाश आंबेडकर
भीमा कोरेगाव इथं आज विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम पार पडत आहे. 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमाच्या 'विजय दिवसा'ला हिंसाचाराचं गालबोट लागलं होतं. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
9 वाजून 57 मिनिटं - 'भीमा कोरेगावची लढाई प्रेरणादायी'
भीमा कोरेगावची लढाई ही प्रेरणादायी असल्याचं ट्वीट दलित काँग्रेसनं केलं आहे.
"भीमा कोरेगाव युद्धातल्या वीरांची आठवण करण्याचा हा दिवस. भीमा कोरेगावची लढाई 202 वर्षांपूर्वी 1 जानेवारी 1818ला भीमा नदीच्या काठावर झाली. अन्याय, असमानता आणि अत्याचारांविरूद्धच्या लढाईत ही घटना सतत प्रेरणा देत आहे," असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
8 वाजून 15 मिनिटं- 'अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न सरकारनं हाणून पाडलाय'
"सरकार बदलल्यानंतर 1 जानेवारीला काही अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न होता. पण शासनामधील पक्षांनी योग्य प्रकारचं योगदान दिलं आहे. हा कार्यक्रम शांततेनं पार पडेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो," असं वक्तव्यं प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
"दोन वर्षांपूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या सरकारला मी माझ्याकडे असलेली सर्व माहिती, ऑडिओ-व्हिजुअल पुरावे दिले आहेत. त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन काही घडू नये यासाठी घेतलेली दक्षता वाखाणण्याजोगी आहे," असंही आंबडेकर यांनी म्हटलं.
"शरद पवार यांनी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यासंदर्भात जी भूमिका घेतली आहे, ती मागेही व्यक्त केली होती. ही बनवाबनवी आहे. पुणे ग्रामीण पोलिस एक म्हणत आहे, पुणे पोलिस आयुक्त एक म्हणत आहेत. त्यामुळे जे कोणी यात गुंतले आहेत, त्यांना परिणामांनाही सामोरं जावे लागेल," असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
7 वाजता- अजित पवारांचं विजयस्तंभाला अभिवादन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भीमा-कोरेगाव इथं विजयस्तंभाला अभिवादन केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, की भीमा कोरेगामध्ये मधल्या काळात काही घटना घडल्या होत्या. पण, सरकार त्यासंदर्भात काळजी घेत आहे. आज कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कुणीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्यावर विश्वास ठेवू नये. शांतता ठेवावी, असं आवाहनही त्यांनी केली.
6.30 वाजता- अभिवादनासाठी गर्दी
भीमा-कोरेगाव इथं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गर्दी जमायला सुरुवात झाली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. याशिवाय सोशल मीडियावर देखील पोलिसांची करडी नजर आहे. सोशल मीडियावर अफवा पसरू नयेत यासाठी अनेक व्हॉट्स ग्रुप अॅडमिन्सना नोटीसा बजावण्यात आल्या. आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा, सणसवाडी, येथील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.