Bapu Nadkarni: सलग 21 मेडन ओव्हर टाकणाऱ्या माजी फिरकीपटूचं निधन
शनिवार, 18 जानेवारी 2020 (11:50 IST)
भारताचे माजी फिरकीपटू बापू नाडकर्णी यांचं मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.
ते आपल्या अनोख्या फिरकी शैलीसाठी प्रसिद्ध होते आणि एका कसोटी सामन्यात सलग 21 मेडन अर्थात निर्धाव ओव्हर्स टाकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
रमेश गंगाराम नाडकर्णी असं पूर्ण नाव असलेल्या बापूंचा जन्म 4 एप्रिल 1933 ला नाशिकमध्ये झाला. पुणे विद्यापीठाकडून रोहिंग्टन बारिया ट्रॉफीच्या निमित्ताने त्यांनी 1950-51 क्रिकेटविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर महाराष्ट्रातर्फे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी प्रवेश केला. 1956 मध्ये त्यांनी भारतीय संघात प्रवेश केला.
त्यांनी भारतातर्फे 41 कसोटी सामने खेळले. त्यांनी अवघ्या 1.67च्या इकॉनॉमीने रन्स देत एकूण 88 विकेट्स घेतल्या. त्यांच्या गोलंदाजीवर धावा करताना फलंदाजांना घाम फुटायचा.
1960-61मध्ये पाकिस्तान भारत दौऱ्यावर असताना कानपूरच्या सामन्यात त्यांनी 32 षटकांत फक्त 23 धावा दिल्या होत्या. त्यापैकी 24 षटकं निर्धाव (मेडन) होती. म्हणजे त्यांच्या नावापुढे 32-24-23-0 असे आकडे होते.
पुढे दिल्लीत झालेल्या सामन्यात त्यांनी 34 षटकांपैकी 24 ओव्हर मेडन टाकले आणि 24 रन देत एक विकेटही घेतली. मात्र मद्रासमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी 32 ओव्हर्सपैकी 27 ओव्हर मेडन टाकत एक विक्रम रचला. (32-27-5-0) हे आकडे आणि बापूंचा हा अचाट विक्रम आजही अबाधित आहे.
सर्व स्तरांतून श्रद्धांजली
त्यांच्या निधनाने तमाम क्रिकेट विश्वात दु:ख व्यक्त केलं जात आहे. भारताच्या आजी माजी क्रिकेटपटूंनी तसंच राजकारण्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने त्यांना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केलंय. "बापू नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटलं. त्यांच्या 21 मेडन ओव्हरच्या विक्रमाच्या गोष्टी ऐकून मी मोठा झालो आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे."
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही बापूंना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणतात, "साठच्या दशकात ACC सिमेंटच्या क्रिकेट संघात बापू नाडकर्णींसह अर्धा डझन कसोटी क्रिकेटपटू होते. तर SBIच्या संघात अर्धा डझन. सिमेंट आणि बँ51159208 किंग या दोन संघांमध्ये भारतीय क्रिकेट टीम सुरक्षित होती.
"नाडकर्णींनी तर एकदा सलग 21 मेडन ओव्हर्स टाकले होते. आणि त्याच चिकाटीने बॅटिंगही करायचे. त्यांच्यासाठी 'खडूस' हा शब्द पुरेसा आहे."
"ते मुंबईतील 50 आणि 60च्या दशकातील पिढ्यांचे प्रतिनिधी होते. त्यातले सगळे महान क्रिकेटपटू आता आपल्यात नाहीत," असंही देसाई म्हणाले.