रिंगण सोहळ्यासाठी उसळला भक्तिसागर

WD
पंढरपूर (पांडुरंग यलमार) आध्यात्माचे माहेर घर असणा-या पंढरीच्या राजाचा जयघोष पंढरीसमीप आलेल्या लाखो भाविक भक्तांनी आपल्या नयनांचे पारणे फे डणारे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आश्वांचे बाजीराव विहीरीजवळी गोल रिंगण अनुभवुन रिंगण सोहळ्यात हरीनामाचा जयघोष केला. या भक्ती सोहळ्यासाठी संबंध आध्यात्मीक क्षेत्रातील भक्तीसागर उसळला होता. त्यामुळे या ठिकाणचे वातावरण हरीनामाने दुमदुमले होते. रिंगण सोहळ्यातील आश्वांच्या पायाखालच्या मातीला इश्वर चरणधुळीचे महत्व असल्याचे भाविक मानतात. त्यामुळे बाजीराव विहीरीवरील रिंगण सोहळा संपन्न होताच आश्वाच्या पायाखालची माती आपल्या भाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली व या भक्तीमय क्षणी हरीनामाचा गजर केला.

आज दुपारी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भंडीशेगाव येथुन दुपारी एक वाजता वाखरीकडे जाण्यासाठी प्रस्थान केले. वाखरी आणि भंडीशेगाव आवघे सात किमीचे अंतर असल्याने व बाजीराव विहरीवर गोल व उभे रिंगण असल्याने भाविकांच्या आनंदाला पारावार राहीला नव्हता. सकाळीच बाजीराव विहीरीजवळ चोपदाराने गोल रिंगण आखुन घेतले होते. भाविकांची चेंगराचेंगरी होऊ नये म्हणुन पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. दुपारी चार वाजता बाजीराव विहीरीजवळील रिंगण आखुन ठेवलेल्या ठिकाणी दिंड्यांनी प्रवेश केला. या मैदानाला गोल रिंगण करीत पालखीसह पताकाधारी वारकरी रिंगणाच्या आत आले. यावेळी चोपदाराने आश्वला रिंगणाचा मार्ग दाखविला. व रिंगणासाठी आश्वला सोडले. यावेळी आश्वंचा पाठशिवणीचा खेळ लाखो भाविकांनी आपल्या नयनात साचविला. ज्ञानोबा -तुकारामचा जयघोष झाला. बाजीराव विहीरीवरील गोल रिंगण प्रसिध्द असुन हे रिंगण पाहण्यासाठी पंढरपूरहुन जादा बससेची सोय केल्याने बाहेर गावांहुन आलेल्या भाविकांनीही गर्दी केली होती. रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी भाविकांचा एकच जनसागर उसळला होता.

संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी बारा वाजता वाखरीकडे जाण्यासाठी पिराचीकुरोलीतुन प्रस्थान केले. भंडीशेगाव येथे विसावा घेतल्यानंतर ही पालखी वाखरीकडे मार्गस्थ झाली. तर अन्य साधुसंतांच्या पालख्या वाखरीकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्या मात्र संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सर्वात शेवटी रिंगणस्थळी थांबली.यावेळी टाळ-मृदुंगाच्या गजराने या ठिकाणचे वातावरण आगदी भक्तीमय झाले होते. सर्वात शेवटी उशीरा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. नगरपालिकेने पालख्यांच्या स्वागताची जय्यत तयारी वाखरी पालखीतळा लगत केली होती. यावेळी नगरपालिकेच्यावतीने साधु संतांच्या पालख्याचे स्वागत करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा