महाराष्ट्र ही संतांची भूमी. या पवित्र भूमीत संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, या चार भावंडांसोबतच, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, कर्ममेळा, गोरा कुंभार, सावता माळी, संत जनाबाई, कान्होपात्रा, नरहरी सोनार यांसारख्या संतांची मांदियाळी निर्माण झाली. चार्तुवर्णाधिष्ठित समाजव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि क्षुद्र असे चार वर्गाचे समाजात विभाजन झाले होते.
वेद पुराणातील तत्त्वज्ञान समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचू शकत नव्हते. संस्कृतसारख्या अवघड भाषेतील तत्त्वज्ञान सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडील होते. आणि म्हणूनच बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदिपिका) सारखा गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला.
'अमृतालाही पैजेवर' जिंकणार्या या रसाळ भाषेतून त्यांनी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान त्यांनी सोप्या भाषेतून सांगितले. समाजातील अनिष्ट रुढी, परंपरांचा अतोनात त्रास त्यांना सहन करावा लागला. समाजात धर्माचा खरा अर्थ सांगण्यासाठी त्यांनी या यातना सोसल्या. त्यांच्या या समाजप्रबोधनाच्या कार्यात संत तुकाराम, संत नामदेव, यांचाही मोलाचा वाटा होता.
सुमारे 700 वर्षांपूर्वी याच संतांनी भागवत धर्माचा पाया रचला. आणि विठ्ठल भक्तीचे माहात्म्य सामान्यांपर्यंत पोहचवून वारकरी संप्रदायाची रचना केली. ज्ञानेश्वरांनी स्थापिलेल्या या संप्रदायाचे स्वरूप धार्मिक असले तरी ते मानवतेवर आधारीत होते. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना वेद पुराणांचा अर्थ जाणून घेण्याचा अधिकार आहे हा संदेश त्यांनी दिला, आणि म्हणूनच सर्व धर्मीयांना 'विठ्ठल' आपला वाटू लागला.
यापुढील काळात संतांनी याच माध्यमातून पंढरपुरातील विठ्ठलाला आराध्य दैवत करत समाजातील तेढ कमी करण्यासाठी आपल्या अभंगांची रचना केली. आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना 'शब्दांमृत' मिळाले. रात्रंदिवस जपमाळ घेऊन जप करणे हे सर्वांना शक्य नव्हते, आणि म्हणूनच संतांनी आपले कुटुंब आणि व्यवसाय सांभाळत समाजाचे प्रतिनिधित्व करत पदांची, अभंगांची रचना केली. संत सावता माळी व्यवसायाने माळी. त्यांनी अभंगांची रचना करताना आपला विठ्ठल माझ्यासवे शेतातच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माजी लसूण, मिरची कोथिंबिरी अवघा माझा झाला हरी'
काम करताना संतांना प्रत्येक रूपामध्ये विठ्ठल दिसतो.
नरहरी सोनार म्हणतात, 'देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार'
तत्कालीन जाती व्यवस्थेमुळे विठ्ठलाचे दर्शन घेताना संत चोखा मेळाला काही नतदृष्ट लोक मारहाणही करतात, तेव्हा आपल्या जखमांना विसरत चोखा मेळा पांडुरंगाकडे त्यांची तक्रार करतात आणि म्हणतात,
MH GOVT
धाव घाली विठू आता चालू नको संथ, बडवे मज मारिती ऐसा काय अपराध विठोबाचा हार तुझे कंठी कैसे आला, शिव्या देऊनी महारा देव बाटविला असे आरोपही त्यांच्यावर झाले. मग ते म्हणतात 'मज दूरदूर हो म्हणती, तुझ भेटू कवण्या रिती' चोखामेळांचा मुलगा कर्ममेळाही आपले गार्हाणे विठोबाकडे मांडताना दिसतो.
'आमुची केली हीन याती, तुझ का न कळे श्रीपती'
या अभंगातून केवळ या बापलेकांचे गार्हाणेच त्यांनी विठ्ठलाकडे मांडले नाहीत, तर समाजातील सामान्य माणसाला होणारा त्रास त्यांनी विठ्ठलाकडे सांगितला आणि म्हणूनच सामान्यांना विठू आपला वाटू लागला. आपले गार्हाणे ऐकून घेणारा देव त्यांना संतांच्या माध्यमातून मिळाला. संत जनाबाईंनाही हा त्रास सोसावा लागला. आणि म्हणूनच त्या आपल्या अभंगात विठ्ठलाला म्हणतात,
MH GOVT
मज ठेविले द्वारी, नीच म्हणूनी बाहेरी
यातून त्यांची विठ्ठलाची ओढ दिसून येते, त्या संत असल्या तरी त्यांना त्या काळात मंदिरात प्रवेश करण्यासाठी अनेकांनी विरोध केल्याने त्यांनी विठ्ठलाकडे आपली व्यथा मांडली आहे. संत नामदेवांनाही वर्णव्यवस्थेचा अन्याय सहन करावा लागला. ते म्हणतात,
माझे याती कूळ नाही त्वा पुसिले अन्याय साहिले कोट्यानुकोटी
अशा अनेक संतांना जातिव्यवस्थेच्या या निखार्यांवरून चालावे लागले, परंतु तरीही या संतांनी समाजप्रबोधनाचे कार्य अखंड सुरू ठेवले. अखेर सार्यांना एकत्र करण्यासाठीच वारीची योजना झाली आणि माउलीच्या पायाशी सारेच सारखे हा संदेश देत वारकरी आजही वारीत मोठ्या उत्साहात दर्शनाला जातात.
वारीचे अथवा दिंडीचे आजचे स्वरूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की हा पाया रचण्यासाठी अनेक संतश्रेष्ठांना आपल्या आयुष्याची आहुती द्यावी लागली. त्यांनी निर्माण केलेल्या अभंग, निरूपणे, रचना यांच्या माध्यमातूनच वारकरी घडत गेला आणि त्याचा पाया आणखी भक्कम होत गेला. वारकरी संप्रदायाची भूमिका आणि व्याख्या वारकर्यांच्या या वारीतच आपल्याला दिसून येतात.
विठूनामाचा गजर करत सारे एका लयीत नाचत पांढरीकडे प्रयाण करतात. यात कोणालाही त्याची जात विचारली जात नाही, कोणालाही त्याचे कूळ विचारले जात नाही. दिंडीत फक्त माणूस श्रेष्ठ मानला जातो. माणसातील देवपण ज्याला उमगले, त्यालाच वारीचा, वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ उमगला असे म्हणावे लागेल. लाखोंच्या संख्येने वारकरी सारे भेदभाव विसरत एकत्र येतात, एकत्रीकरणातून आपला धार्मिक आनंद साजरा करतात सावळ्या विठ्ठलाला आपल्या मनात साठवतात आणि म्हणूनच प्रत्येक वारकरी एकमेकांना 'माउली' म्हणतो.