पालखीचा आज सराटीत मुक्काम

WD
पर्जन्य पडावे आपूल्या स्वभावे ।

आपूलाल्या दैव पिसे भूमी ।

बीज तेंचि फळ येईल शेवटी ।

लाभाहानी तुटी ज्यांची तया ।

निसर्गाचे अतुलनिय आणि अनमोल देणे म्हणजे पाऊस, आणि हाच पाऊस इंदापूर शहरात दोन दिवसासाठी (गुरुवार ता.११) पासून मुक्कामी पालखी दाखल झालेपासून संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यांतील वारक-यांचे अखंड हरिनाम यामुळे इंदापूरकरांना मिळणारा आनंद व ग्रीष्मातील दाहक उन्हाने अक्षरश: पोळून निघालेल्या धर्तीला चिंब भिजवणारा रिमझिम पाऊस, या पाऊसाने प्रत्येक मनामनाला ओलेचिंब करत इंदापूरकरांना व इथल्या प्रत्येक जिवाला सुखक्वायचे भाग्य पालखीतील हरिनामाला व पाऊसाच्या सरीला प्राप्त झाले आहे. त्यामुळे रिमझिम पाऊसाने पालखीतील वारक-यांचे स्वागत केले.

इंदपूर शहरात पालखी संत तुकोबांची दाखल झाली, अन् रिंगणसोहळा आटोपला हेच गोलरिंग नयनरम्य ठरले. पालखी तळावर पालखी सोहळा दाखल होताच रिमझिम पाऊसाने सुरूवात केली. तरीही पालखीतील वारकरी मंडळी आनंदाने विठूरायांचे मुखाने नाम घेत होती. इंदापूरकर आणि संत तुकाराम महाराज पालखीचे ऋणानुबंध वेगळेच असल्याने वारकरी हा देवासमान मानून अन्नदान, राहण्यांची व्यवस्था फारच काळजीने इंदापूरकर घेत होते. शहरातील शाळांच्या खोल्या, भव्य प्रसिध्द मंदीरे, समाज मंदिरे, अनेक संस्थांच्या खोल्या वारक-यांना राहण्यासाठी खुल्या केल्याने कोणत्याही दिंडयातील वारक-यांची हेळसांड झाली नाही. उलट दोन दिवस मुक्काम झाल्याने पडणारा पाऊस पाहून वारकरी आनंदीत झाला.

ऊन-वारा पाऊसाची आम्हां काय तमा ।

माऊलीच्या जय घोषाने टाळ वाजे घन-घना ।

मात्र संत तुकाराम महाराजांच्या पंक्तीचा बोध घेवून चालणा-या वारक-यांनी या ऊनाची अन् वा-याची आम्हांला काही तमा नाही, काळजी नाही, उलट ज्ञानोबा तुकाराम... ज्ञानोबा तुकाराम चे भजन म्हणत, हरिपाठ, गौळणी भारुडे गात गगणभेदी माऊलीच्या जय घोषाने टाळ आणि मृदुंगाच्या निनादाने इंदापूर भक्तीमय होवून भक्तीच्या सोहळ्यांत वाहले.

शुक्रवार (ता.१२) रोजी संत तुकाराम महाराज पालखीतील पादुकांची पहाटे महापूजा अरविंद वाघ व इंदापूर शहरातील नगरसेवक यांच्या हस्ते संपन्न झाली. पौराहित्य म्हणून टंगसाळे गुरूजी यांनी विधीवत केले. सकाळच्या प्रहरापासून पाऊसाची रिमझिम चालू असल्याने दिवसभर वेगवेगळी खाद्य पदार्थांची दुकाने, छोटे-मोठे व्यवसायिक गि-हाईक नसल्याने व्यापारी वर्ग चांगलाच अडचणीत आला. परंतू पालखी दर्शनाला मात्र इंदापूर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. छत्र्या घेऊन अबाल-वृध्दांसह इंदापूरकर दर्शनाला बाहेर पडले होते. इंदापूर तालुक्यात पालखी सोहळयांचे तब्बल सहा मुक्काम असतात. सगळ्यांत जास्त इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रमतो मुक्कामी.

आज शनिवार रोजी इंदापूर तालुक्यातील सहावा मुक्कामी सराटी (ता.इंदापूर) येथे संध्याकाळी पोहचणार आहे. राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री पाटील यांच्यासह तालुक्यातील हजारो वारकरी बावडा सराटी गावापर्यंत पायी चालणार आहेत. सराटी मुक्कामासाठी वारक-यांची व पालखी सोहळ्यांची पुर्ण व्यवस्था केली असल्याची माहिती गावक-यांनी कळविली आहे.

वेबदुनिया वर वाचा