एकदा तरी अनुभवावी पंढरीची वारी...

मंगळवार, 16 जून 2015 (12:25 IST)
वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच!
पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.
 
अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते.

संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान. संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी.
श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ सकाळची आरती होते.इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो. वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात. वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो.  संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत. 
वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत १) उभे, २) गोल. वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात.
त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात.
त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात.
या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ हा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो.
वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो.
रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात. सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो.
दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.
 
वारीसाठीची पूर्वतयारी संस्थान समिती, मालक, चोपदार हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या मार्गातील सर्व तहसील, ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य उपाययोजना सुचवितात. वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात कधीच कुठेही भांडणतंटा होत नाही. विशेष काही तक्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो.
 
वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये चालणार्या प्रत्येक वारकर्याची त्यात अंतर्गत भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या निधीतून केले जातात. काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात. रथापुढील दिंड्या माऊली चालायला लागली की चालणे सुरू करतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही जोवर माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत.
काही वारकरी वारीत फक्त पाणीवाटपाची सेवा देतात. वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी वाटपाचेच असते.  काही वारकरी संपूर्ण वारीत अनवाणी चालतात, तर काही वारीत एकच वेळ जेवण करून चालतात. वारी सोहळ्यातील काही दिंड्या ह्या लोकशाही पद्धतीने चालविल्या जातात. श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फड (रथामागे ७ क्रमांकाची दिंडी) हे या पद्धतीचे उदाहरण. फक्त वारीपुरतेच नाही तर वर्षभर ह्या दिंड्यांचे हरीभक्तीचे कार्यक्रम आपापल्या गावी सुरू असतात. संपूर्ण वारी सोहळ्यात एकच जरीपटका असतो, असे सर्वश्रुत आहे. पण वास्तवात वारीच्या व्यवस्थेच्या दृष्टीने एकूण तीन जरीपटके असतात. 
 
श्री माऊलींचे धाकटे बंधू श्री सोपानकाकांची पालखी वेळापूर समोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्री माऊलीस भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात. हा अतिशय भावूक प्रसंग असतो. या वेळी दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात व मानकरी आणि विश्वस्त मंडळी दर्शन घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात. वेळापूर येथे भारुडाचा मान हा शेडगे दिंडीकर्यांना आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या तत्कालीन बहुजनसमाजाला आध्यात्मिक ज्ञानदान करण्याचा श्री एकनाथ महाराजांचा उद्देश त्यांच्या भारुडातून आपल्यासमोर साकारतो.
श्री ज्ञानोबारायांना अखिल मानवजात ‘माऊली’ असेच म्हणते. लेकराचे हित चिंतते ती माऊली! विश्वातल्या यच्चयावत जीवांना त्रैलोक्यातील सर्व सुखे प्राप्त व्हावीत, असे मागणे ज्ञानोबाराय पसायदानामध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात म्हणून ज्ञानोबाराय हे ‘माऊली’ आहेत. आमच्या नामदेवरायांनी तर ज्ञानोबारायांना ‘योग्यांची माऊली’ म्हणून गौरविले.
 
नाथरायांनी ‘साधकांचा मायबाप’ असा ज्ञानोबारायांचा महिमा गायला. श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपण ‘ज्ञानोबा’ असे मोठ्या प्रेमादराने संबोधतो. ‘बा’ हे आदरार्थी वचन आहे. ज्ञानोबारायांच्या ठायी असणारे साधकाचे मातृत्व ‘माऊली’ या संबोधनाने तर साधकाचे पितृत्त्व ‘बा’ या शब्दाने सूचीत होते. जगी ऐसा बाप व्हावा| ज्याचा वंश मुक्तीस जावा॥पोटा येतां हरले पापा| ज्ञानदेवा मायबापा॥असे तुकोबाराय म्हणतात. श्रींचे वारी सोहळ्यात होणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोऽहं साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा उच्छ्श्वास आहे, आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे भजन म्हणजे मध्यमपदलोपी समास आहे. या दोन नामांत माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातील सर्व संत सामावलेले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा