शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा

गुरूवार, 9 ऑक्टोबर 2014 (16:03 IST)
शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा सुरू. काका-पुतण्याचं राज्य संपवा असं सांगत भाषणाची सुरुवातच मोदींनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.

नरेंद्र मोदींच्या मागे सव्वाशे कोटी भारतीय दिसतात म्हणून अमेरिकेसह जगात भारताचा डंका वाजत असल्याचं मोदींनी पुन्हा सांगितलं, व असंच बहुमत १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला द्या असं आवाहन मोदींनी केलं.
 
विकासाशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत असे सांगत विकास हाच खरा मार्ग असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 
सरकारं येतील, जातील परंतु सैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी राजकीय पोळ्या भाजणारी वाक्य बोलू नका असा इशारा मोदींनी विरोधकांना दिला आहे.
 
काँग्रेसचं राज्य असताना, निवडणुकांमध्ये आम्ही सीमेवरील हल्ल्याचा राजकीय लाभ घेण्याचा फायदा कधी केला नाही, उलट राष्ट्रभक्तीचं प्रदर्शन केलं होतं असं सांगत, सीमेवरील हल्ल्याचं मतांसाठी राजकारण करू नका असं आवाहन मोदींनी पवारांचं नाव न घेता केलं.
 
तुम्ही ज्यावेळी संरक्षणमंत्री होतात, त्यावेळी चीन व पाकिस्तानने हल्ले केले होते, त्यावेळी तुम्ही सीमेवर गेला होतात का असा सवाल मोदींनी शरद पवार यांना केला. तसेच, सीमेवर हल्ला होतो, त्यावेळी भारतीय जवानांच्या बंदुका चालतात असे सांगत भारतीय सैन्यानं पाकिस्तानला योग्य जबाब दिल्याचं मोदी म्हणाले.
 
गरीबी मी स्वत: बघितलीय, अनुभवलीय, त्यामुळे हे सरकार गरीबांसाठी आहे तसेच लहान शेतक-यांसाठी आहे असं सांगत, तुमच्यासाठी काही करण्यासाठी मला साथ द्या असं आवाहन मोदींनी केलं आहे.
 
आपली सामान्य पार्श्वभूमी पुन्हा सांगत, मी मंत्र्याच्या वा मुख्यमंत्र्याच्या घरात जन्माला आलो नसून तुमच्यासारख्या सामान्य घरात जन्माला आलोय, त्यामुळे मी तुम्हाला मी माझ्या कामाचा हिशोब द्यायला बांधील असल्याचे मोदी यांनी सांगितले.
 
साठ वर्षांमध्ये सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने आपल्या कामाचा हिशोब दिला नसल्याचं सांगत मोदी यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. हे सगळे सत्ताधारी स्वत:ला राजेमहाराजे मानत असल्याची टीका मोदींनी सत्ताधा-यांवर केली.
 
धनगर समाजानं माझा विशेष सन्मान केल्याचं सांगत मी त्यांचे विशेष आभार मानतो असे मोदी म्हणाले व मोठ्या संख्येने असलेल्या धनगर मतदारांना त्यांनी भाजपाकडे खेचण्याचा प्रयत्न केला.
 
दहा वर्षात दहापट भ्रष्टाचार केल्याची खूण म्हणजे त्यांचं दहा दहाची वेळ दाखवणारं चिन्ह असल्याचं मोदी म्हणाले. १५ ऑक्टोबर रोजी पवारांच्या सत्तेतून स्वतंत्र होण्याची संधी असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
अजित पवारांच्या धरणात लघवी करू का या वक्तव्याचा संदर्भ देत मोदी यांनी अशी भाषा बोलणारे मंत्री होतात असं सांगत ही नामुष्की असल्याचे सांगितले.
 
पाणी, वीज, ऊसाला भाव अशा प्रत्येक गोष्टीसाठी इथल्या सर्वसामान्य शेतक-याला पवारांकडे हात पसरावे लागतात असा आरोप करत पवारांचं राज्य संपवा असे आवाहन मोदी यांनी बारामतीच्या मतदारांना केले.
भारताला तर स्वातंत्र्य मिळालं असा लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत, पवारांपासून बारामतीला स्वतंत्र करण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा