विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून शिवसेना आणि भाजप यांचतील संबंध कमालीचे ताणले गेले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन चुलतभैयूमध्ये दिलजमाई घडवून आणण्याच्या छुप्या हालचाली सुरू झाल आहेत आणि त्यांचा सूत्रधार आहे. बडय़ा नेत्यांचा राजकीय युवा गुरू विशेष म्हणजे सत्ताधारी आघाडीतील एका नेत्याच्या घरातून या हालचालीची ‘तट’बंदी करण्यात येत आहे. मात्र त्याला अद्याप तरी दोन्ही बाजूंकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमधील वाद टोकाला गेला आहे. त्यांच्या पंचवीस- तीस वर्षाचा संसार तुटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काडीमोड झालाच तर पुढे कोणकोणते पर्याय असू शकतात, याची दोन्ही पक्षांकडून चाचपणी केली जात आहे. भाजपने मनसेशी हातमिळवणीची आशा सोडलेली नाही. दुसरीकडे शिवसेना-मनसेने एकत्र यावे, या चर्चेलाही अजून पूर्णविराम मिळालेला नाही. एकंदर शिवसेना आणि भाजपसाठी मनसे हा पर्याय अजूनही खुला आहे, असे मानले जाते.