पंकजा मुंडे-पालवे : संघर्ष यात्रा

बुधवार, 20 ऑगस्ट 2014 (15:38 IST)
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी 1995च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीअगोदर राज्यात काढलेल्या संघर्ष यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि त्यावेळी शिवसेना-भाजप युतीचे सरकार अधिकारावर आले. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री, तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री. या जोडीने चांगला कारभार केला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या दोघांना मार्गदर्शन होते. मुंडे हे प्रभावी व आक्रमक नेते म्हणून प्रसिध्द होते. विधानसभेत त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली होती. सरकार पक्षात व विरोधी पक्षामध्ये असताना त्यांनी आपला चांगलाच प्रभाव पाडला होता. सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जडलेला नेता अशी त्यांची ख्याती होती. नवी दिल्लीतील अपघाती निधनानंतर परळी येथे निघालेल्या अंत्ययात्रेला जी अलोट गर्दी उसळली होती त्यावरून त्यांच्या लोकप्रितेची प्रचिती सार्‍या महाराष्ट्राला आली होती. आता आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यादेखील महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढणार आहेत, त्याचा आगामी निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्तविली जाते. 
 
पंकजा मुंडे-पालवे ही नियोजित संघर्ष यात्रा येत्या 27 ऑगस्ट ते 17 ऑक्टोबर दरम्यान काढणत येणार आहे. वंजारी व इतर मागासवर्गीय यांचे कैवारी म्हणून कै. गोपीनाथ मुंडे यांचा लौकिक होता. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे-पालवे या करणार आहेत. ही संघर्ष यात्रा राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीपर्यंत जाणार आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांतील 79 विधानसभा मतदारसंघांमध्ये ही संघर्ष यात्रा चौदा दिवस चालणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीयमंत्रीद्वय नितीन गडकरी व प्रकाश जावडेकर हेदेखील संघर्ष यात्रेत सामील होणार असल्याचे भाजपच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा भाजपचा प्रयत्न नक्कीच फलदायी ठरेल, असे विधान महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी वर्तविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेना, भाजप, रिपब्लिकन महायुतीची सत्ता आणण्याला पंकजा मुंडे-पालवे यांची संघर्ष यात्रा नक्कीच उपयोगी ठरणार आहे. मंत्रालयावर भगवा झेंडा पुन्हा फडकावा यासाठी पंकजाताईंच्या या  उपक्रमाला राज्याची जनता प्रतिसाद देईल यात शंका नाही. 

वेबदुनिया वर वाचा