एकत्र आलो असतो परंतु उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही- राज
गुरूवार, 9 ऑक्टोबर 2014 (17:07 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राज ठाकरे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, शिवसेना-भाजप युती तुटल्यावर शिवसेनेसोबत एकत्र येण्याबद्दल उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर शिवसेना नेत्यांनी आमच्याशी संपर्कच न साधल्याने ही युती होऊ शकली नाही.
उद्धव यांच्या फोनची वाट पाहात आम्ही एबी फॉर्म वाटणेही थांबवले होते, मात्र शिवसेना नेत्यांनी प्रतिसाद न दिल्याने अखेरीस दुस-या दिवशी संध्याकाळी पाच वाजता आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटले असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेला जोर चढला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात याविषयी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यावर कोणती प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.