अजित पवारांच्या गाडीत सापडली पाच लाखांची रोकड

गुरूवार, 9 ऑक्टोबर 2014 (11:24 IST)
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड परळी नाक्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची पाच लाखांची रोकड पोलिसांना सापडली. जिंतूरचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचाराच्या गाडीत 4 लाख 85 हजार रुपयाची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. धक्कादायक म्हणजे ही रोकड अजित पवार यांची असल्याचे स्पष्ट झाले. पक्षाने राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांना काही पैसे खर्चासाठी दिले आहेत, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. 
 
पोलिसांनी कारवाई केलेल्या गाडीत ही रक्कम सापडली, त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कपड्याची बॅग तसेच व्हिजिटिंग कार्ड मिळाले आहेत.  तसंच अजित पवार यांचे पीए देशमुख आणि सुरक्षा अधिकार्‍याची बॅगही याच गाडीत सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असून अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
 
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडत आहे. यापूर्वी इंदापूरमध्या 5 कोटी, 
बुलडाणा चिखलीमध्ये 80 लाख, परभणीमध्ये 4 लाख 85 हजार, गंगाखेडमध्ये 51 हजार 100 रूपये, 
परभणीमधील खळी गावात 1 लाख 87 हजार, औरंगाबादमध्ये 16 लाख तर बीडमध्ये 2 लाख रुपये सापडेले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा