आधार-पॅन लिंक केले का, शेवटची मुदत कधी आहे, दंड किती भरावा लागेल- वाचा
मंगळवार, 28 मार्च 2023 (11:23 IST)
आता या पुढच्या सगळ्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी पुढील माहिती महत्त्वाची आहे. म्हणूनच आज जाणून घेऊया पॅन आधारशी कसं जोडायचं, का जोडायचं आणि नाही जोडलं तर काय होईल?
पॅन आणि आधार म्हणजे काय हे सुरुवातीला समजून घेऊया… पॅन म्हणजे पर्मनंट अकाऊंट नंबर.
आकडे आणि अक्षरं यांचं मिश्रण असलेला हा दहा डिजिट नंबर आहे. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी पॅन अनिवार्य आहे आणि आयकर विभागच तुम्हाला पॅन नंबर आणि लॅमिनेटेड ओळखपत्र देत असतं.
बँकेत खातं उघडताना आणि जवळ जवळ सगळ्याच आर्थिक व्यवहारांच्या वेळी पॅन क्रमांक लागतो. आणि त्याच्या मदतीने आयकर विभागही तुम्ही करत असलेल्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवत असतो.
मोठे गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारला याचा उपयोग होतो. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही केंद्रसरकारची एक संस्था आहे. आणि ते आधार ओळखपत्र तुम्हाला देतात. हा एक बारा आकडी क्रमांक आहे जो प्रत्येक नागरिकासाठी वेगळा आहे.
तुमचं नाव, जन्मदिवस, वय, लिंग, निवासाचा पत्ता आणि बरोबरीने तुमच्या बोटाचे ठसे आणि डोळ्यांचं बायोमेट्रिक स्कॅन घेऊन तुम्हाला आधार क्रमांक दिला जातो.
प्रत्येक नागरिकाकडे एक युनिक असं एकच ओळखपत्र असावं आणि हळुहळू रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि शक्य झालं तर वाहन चालवण्याचा परवानाही आधारशी जोडून वेगवेगळी ओळखपत्र बाळगण्याच्या झंझटीतून लोकांची सुटका व्हावी यासाठी केंद्राचा हा प्रयत्न आहे.
विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य आहे. तर अशी ही दोन अतिशय महत्त्वाची सरकारी ओळखपत्र आहेत. 31 मार्च 2023 हा आधार आणि पॅन जोडण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.
पॅन कार्ड आधारशी का जोडायचं?
ठरलेल्या मुदतीत तुम्ही पॅन कार्ड नाही जोडलंत आधारशी तर काय होईल? तुमचं पॅन कार्ड रद्द होईल.
आणि एकतर आयकर कायदा 272B नुसार तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड नसताना तुम्ही जवळ जवळ कुठलेच मोठे आर्थिक व्यवहार करू शकणार नाही.
50 हजारांच्या पुढच्या रोख व्यवहारांसाठीही हल्ली पॅन अनिवार्य आहे.
आधार पॅन जोडलेले आहे की नाही कसं ओळखायचं?
पॅन आणि आधार एकमकेांशी जोडलेले आहेत का हे तपासण्यासाठी आयकर विभागाच्या साईटवर जाऊन To view status if you already submitted link Aadhaar status वर क्लिक करावे. यासाठी https://www.utiitsl.com/ किंवा https://www.proteantech.in/ यांचा वापर करू शकता.
तिथं आपला पॅन आणि आधार नंबर टाकायचा.
View Link Aadhaar Status वर क्लिक करा. तिथं आधार आणि पॅन लिंक आहे की नाही समजेल.
आधार आणि पॅन लिंक आहे का हे एसएमएसद्वारे समजण्यासाठी
"UIDPAN <12 digit Aadhaar number> <10 digit PAN number>" या फॉरमॅटमध्ये 567678 किंवा 56161 ला मेसेज करा. तुम्हाला त्याचं उत्तर एसएमएसद्वारे समजेल.