योग्य निदान न झाल्यानेच रिदाचा मृत्यू- आझाद

प्रसार माध्यमांनी स्वाईन फ्ल्यू संदर्भातील घटनांचे वृत्तांकन करताना संयम दाखविणे गरजेचे आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. देशात स्वाईन फ्ल्यू ने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली आकाशवाणीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

पुण्यातील रिदा शेख या शाळकरी मुलीचा स्वाईन फ्ल्यूने नुकत्याच झालेल्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करताना आझाद यांनी रूग्णालयाला तिच्या आजाराचे योग्य निदान न करता आल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रसारमाध्यमांनी सबसे तेज वृत्त देण्याच्या नादात देशभरात भीतीचे वातावरण पसरविण्यास हातभार लावू नये असेही आवाहन केले.

सध्या जगभरातील बहुतांशी देशांना भेडसावणार्‍या स्वाईन फ्ल्यू या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने बहुआयामी कार्यपद्धतीची योजल्याची माहिती आझाद यांनी दिली. त्यात संशयीत रूग्णांची कसून तपासणी करणे, स्वाईन फ्ल्यू च्या निदानासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे, एच १ - एन १ चे विषाणू शरीरात आढळून आलेल्या रूग्णांवर योग्य ते उपचार करणे आदी उपायांचा समावेश आहे. संशयित रूग्णाच्या आजाराचे योग्य निदान करण्यासाठी देशात आणखी दोन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे देशभरातील अश्या प्रयोगशाळांची एकूण संख्या आता ४० होईल अशी माहितीही आझाद यांनी सांगितली.

देशभरात आत्तापर्यंत स्वाईन फ्ल्यू चे लक्षण आढळून आलेल्या ५९६ रूग्णांपैकी ४८२ जणांवर योग्य उपचार करून त्यांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे. तर उर्वरीत रूग्णांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत असून त्यांनाही लवकरच इस्पितळातून घरी सोडण्यात येईल असे आझाद यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी सरकारी यंत्रंणा तत्परतेने कार्य करत असून या कार्यात यशही येत असल्याचे आझाद यांनी सांगितले. देशात हा आजार आटोक्यात आणण्यासाठी पुरेसा औषध साठाही उपलब्ध आहे. या आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांनी व पॅरामेडिकलच्या अधिकार्‍यांनी कौतुकास्पद कामगिरी केल्याचे सांगत आझाद यांनी त्यांचा गौरव केला.

वेबदुनिया वर वाचा