'स्वाइन फ्लू' पुणे शहरासाठी डोकेदुखी ठरला असून या आजाराची व्याप्ती वाढत चालल्याने शासनासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पुण्यातील गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाइन फ्लूचा वाढता प्रभाव पाहता प्रशासनासमोर या आजारावर नियंत्रणासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. या काळात पुण्यात सर्वाधिक गर्दी असते. त्यामुळे आजाराचा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुणे शहर हे उत्सवांचे महोत्सवांचे शहर. त्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सवात पुण्यात लाखोंच्या संख्येने बाहेर गावच्या व्यक्ती येतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी या आजाराचा संसर्ग होणार अशी पाल प्रत्येकाच्या मनात चुकचुकत आहे. दरम्यान तज्ज्ञांनी गणेश मंडळांना योग्य खबरदारी घ्यावयाचे आवाहन केले आहे. तसेच हा आजार बरा होणारा आहे याबाबत नागरिकांमध्येही जनजागृती करावी असे आवाहनही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
मे, २००९ मध्ये स्वाइन फ्लू या आजाराची चर्चा मोठया प्रमाणात सर्वत्र सुरु झाली. पहिल्या काही दिवसांमध्ये परदेशी नागरिकांची तपासणी करण्यासाठी विमानतळांवर, बंदरांवर तपासणी कक्ष उभे राहिले. काही ठिकाणी हे रुग्ण आढळलेही. पण त्यांना योग्य उपचारामुळे दिलासा मिळाला. टॅम्बी फ्लू या औषधी शासनाने सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या. या दरम्यान पुणे शहरात या आजाराने डोके वर काढले. जुलैच्या पहिल्या आठवडयापासून शहरात एक दोन दिवसाआड स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येऊ लागले.
विशेष म्हणजे या आजाराचा संसर्ग झाला तो शाळकरी मुलांना. त्यामुळे एकापाठोपाठ एक अशा सात आठ शाळाही पुण्यात काही काळासाठी बंद झाल्या. दुसरीकडे महाराष्ट्र शासन, पुणे महापालिका आरोग्य विभागाने जाहिरांतीव्दारे हा आजार बरा होणारा आहे हे सांगण्याचा मोठा प्रयत्न केला. तो कसा होतो, त्याची लक्षणे काय, आजार झाल्यास काय करावे, त्यावर कोणती औषधी घ्यावी आदींची माहिती जनतेपर्यंत पोहचविली.